लेखिका - किरण बेदी
अनुवाद - लीना सोहनी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
आपल्या देशात जेव्हा जेव्हा वशिल्याशिवाय बदली होते तेव्हा खरंतर ती पाठवणी असते. फक्त त्याला नेमणूक असं गोंडस नाव असतं. ती पाठवणी म्हणजे कानाकोपऱ्यातील कोणत्यातरी ठिकाणी, आणि म्हणूनच अशा ठिकाणी कोणीतरी अपात्र अयोग्य व्यक्ती जाऊन पोहोचते. कधी तरी याच्या उलटही घडतं.
सरकारनं त्यांची नवी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये तुरुंग महानिरीक्षक, इन्स्पेक्टर जनरल प्रिझन म्हणून नेमणूक केली, ती त्यांच्यासाठी इतर कुठं जागा नव्हती म्हणून नाही तर जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशानेच.
नावडत्या वरिष्ठ आधिकार्यांना त्यांना कुठंतरी स्थान द्यावंच लागलं. हे असं ठिकाण होतं, ज्या ठिकाणी किरणना ‘अडकवून’ मग त्यांना विसरून जाता येणार होतं, पण त्यावेळी त्यांना अंदाज नव्हता की, किरण तिथं असा इतिहास घडवणार आहेत की, जो फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुरुंग यंत्रणांसाठी कायमचा अनमोल वारसा ठरणार आहे आणि याच कामासाठी त्यांना आशियातील सर्वांत प्रतिष्ठेची, प्रशंसेची पावती मिळणार आहे, ती म्हणजे सरकारी सेवेतील रॅमन मॅगसेसे पुरस्कार! (या पुरस्काराला आशियायी नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं.)
हे सगळं कसं घडलं.. तिहार तुरुंग ते आश्रम या बदलाची गोष्ट या पुस्तकातून उलगडते.
किरण बेदी यांनी पहिल्यांदा आशिया खंडातील सर्वांत मोठ्या तुरुंगात म्हणजेच तिहारमध्ये पाऊल टाकले तेव्हा त्या तुरुंगाची स्थिती एखाद्या कत्तलखान्यासारखी होती. भ्रष्टाचारी कर्मचारी, तुरुंगात सर्वत्र कैद्यांच्या माफिया टोळ्यांचे साम्राज्य, तेथील मादक द्रव्यांचा व्यवहार, तुरुंगातच जन्माला येऊन शिक्षण व आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली छोटी छोटी मुले, अनारोग्यपूर्ण व बेचव अन्न अशी स्थिती तेथे वर्षानुवर्षे चालत आली होती. भ्रष्टाचार आणि पिळवणूक यांचा तेथे सुळसुळाट होता. खेदाची बाब अशी की येथील ९० टक्के कैद्यांना रिमांडवर कोठडीत ठेवले होते. त्यांच्यापैकी अनेक कैदी या तुरुंगात इतकी वर्षे रिमांडवर होते की जरी समजा त्यांना त्यांच्यावर आरोप असलेल्या गुन्ह्यासाठी मुक्रर असलेली जास्तीत जास्त शिक्षा कोणी ठोठावली असती तरी ती सुद्धा या कालावधीहून कमीच झाली असती. शिवाय गुन्हा खरोखरच त्यांच्या हातून घडल्याचं सिद्ध झालं असतं तरच.
भारतातील पहिली पोलीस अधिकारी होण्याचा मान ज्या स्त्रीस मिळाला तिच्या हातात ही तिहारची सूत्रे आता देण्यात आली होती. या स्त्री ऑफिसरविषयी मनात असूया असणारे अनेक सहकारी होते. तेव्हा ही स्त्री आता उलट्या काळजाच्या, निर्ढावलेल्या कैद्यांच्या या तुरुंगात पाऊल टाकताच डगमगणार अशी स्वप्ने या सहकाऱ्यांनी नक्कीच मनोमन पाहिली असतील. या निडर स्त्री ऑफिसरला वठणीवर आणण्यासाठी यापूर्वीही अनेकदा प्रयत्न झालेलेच होते. परंतु या स्त्रीने, म्हणजेच किरण बेदीने दरवेळेप्रमाणेच याही बदलीचा एक आव्हान म्हणून स्वीकार केला. संपूर्ण तिहारचा कायापालट करून दाखवला.
कामाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इतक्या थोड्या अवधीत जेलचा कायापालट झाला की तुरुंगाच्या अंतर्भागात ज्या ज्या ठिकाणी ‘तिहार जेल’ अशा पाट्या होत्या त्या त्या पाट्यांवरील जेल हे शब्द पुसून टाकून तेथे ‘तिहार आश्रम’ असे शब्द तिने लिहायला लावले. आणि ‘आश्रम’ हा शब्द काही नुसता देखावा नव्हता. तुरुंगाचं संपूर्ण परिवर्तन करून जणू एका मठात रूपांतर केलं. आत्मपरीक्षण, शिक्षा व काम, ध्यानधारणा या सर्वांच्या माध्यमातून कैद्यांस एक गोष्ट शिकवण्यात आली ती म्हणजे बंदिवासात असणं ही काही केवळ शारीरिक स्थिती नाही, तर तो एक दृष्टिकोणही आहे. व्यवस्थापनाने कैद्यांना जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाह्य सोयी-सुविधा शिक्षणाच्या संधी, आरोग्य सेवा, कायद्याच्या बाबतीत मदत, रोजगार, पाळणाघरे उपलब्ध करून दिल्या.
ध्यानधारणेने कैद्यांना हे शिकवले की आपल्या वाट्याला आलेल्या बंदिवासाकडे सुद्धा आत्मपरीक्षणाची एक संधी म्हणून पाहावे...
जी काही परिस्थिती होती त्यातून सुधारणा घडून आणून, कायद्याच्या चौकटीत राहून, कोणताही घटनात्मक बदल न करता, तिहारमध्ये परिवर्तन घडून आलं. मानवाच्या अंतर्यामी असलेल्या सर्व उदात्त भावनांना जो सामूहिक आविष्कार मिळाला, त्यातून या तिहारचा पुनर्जन्म झाला. मानवी शक्तीचं ते दृश्य निधान बनलं.
स्वाभाविक चांगुलपणा, माणुसकी आणि सामूहिक निर्धार यांच्या जोरावर.. काहीही शक्य आहे.
या पुस्तकासाठी जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. या पुस्तकातून उभा होणारा निधी इंडियन विजन फाउंडेशनच्या कायमस्वरूपी उपक्रमास देण्यात येत आहे ज्या बालकांचे आई-वडील तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाबाहेर असून सुद्धा त्यांच्या शिक्षणाची हिल्सन करीत आहेत अशा बालकांना शिक्षण देण्याचे कार्य या उपक्रमाद्वारे केले जाते.