लेखिका - गुल इरेपोलू
अनुवाद - सविता दामले
प्रकाशक - पाॅप्युलर प्रकाशन
लेखिका गुल इरेपोलू यांना तुर्कीतील कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, शिवाय युनेस्को तुर्की राष्ट्रीय कमिशनच्या सदस्य आणि सांस्कृतिक वारसा विशेष समितीच्या अध्यक्षा आहेत. एकूण २६ हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत, कला इतिहास आणि साहित्य यावर आधारीत वेधक शैलीतील आहेत. गुल इरेपोलू २०१६ मध्ये भारतातील साहित्यिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या,
इतिहासाला कलेच्या नजरेतून बघणाऱ्या आणि प्राध्यापिका असलेल्या व्यासंगी लेखिकेच्या काॅन्क्युबाईन या तुर्की भाषेतील वेगळ्या आकृतीबंधातील कादंबरीचा हा अनुवाद.
अस्किदिल चा अर्थ होतो प्राणप्रिया, प्रेमतत्व!
शहजादा अब्दुल हमीद खान च्या पित्याची सत्ता त्याच्या चुलत्याने उलथवली होती तेव्हा शहजादा फक्त पाच वर्षाचा होता. तेव्हापासून तो नजरबंद झाला होता .सगळ्या सुख सुविधा होत्या, फक्त स्वातंत्र्य नव्हतं. तेव्हा धनुर्विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त करताच सगळी व्यवस्था केली गेली. त्याला यातच गुंतवून ठेवलं गेलं. धनुर्विद्या शिकवण्यासाठी कफूर ची नेमणूक करण्यात आली. राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्रच्या शिक्षणापासून जाणूनबुजून दुर ठेवलं गेलं. तसाही तो धाकटा होता. पण ध्यानीमनी नसताना चुलत्याच्या आकस्मिक मृत्युमुळे शहजादा सुलतान बनला.
धनुर्विद्या शिकवणाऱ्या आणि विश्वासपात्र बनलेल्या कफुरला सुलतानाने आगा म्हणजे जनानखान्याचा प्रमुख बनवलं. त्यासाठी मात्र कफुरला फार मोठा त्याग करावा लागला होता. शस्त्रक्रिया करून त्याला नपुंसक बनावं लागलं होतं.
शस्त्रक्रिया करणाऱ्या हकिमांना वाटणारी सहानुभूती दडवावी लागत होती. प्रौढ पुरुषाच्या खच्चीकरणाची शस्त्रक्रिया नेहमी घडणारा प्रसंग नव्हता. सुलतानाला नकार देण्याची हिंमत हाकिंमांकडे नव्हती. पण ते शांतचित्त दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. हाताची थरथर लपवत होते.
तेव्हा कफुर तारुण्याच्या ऐन भरात होता आणि सुलतान तारुण्याच्या उतारावर होता.
सुलतानाच्या बहिणीच्या आश्रयाखाली वाढलेली एक अनाथ असलेली अस्किदिल. राजघराण्यातली आश्रीत व एक मुलगी म्हणून तिचे खुप लाड झाले, शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं. ती जसजशी मोठी होत गेली तसतसा तिच्या सौंदर्याचा दिमाख वाढत होता. वयाच्या चौदाव्या वर्षी तिला सुलतानाच्या जनानखान्यात दाखल केल्यानंतर खास प्रशिक्षण दिलं गेलं ज्यात रती क्रिडा, श्रुंगार करणं, सुंदर दिसणं, थोडं फार संगीत, शायरी, बौध्दिकता सामील होतं. सुलतानाच्या जनानखान्यातील प्रत्येक स्रिला हे सगळं शिकावंच लागतं.जेणेकरून सुलतानला तुमच्या सहवासात कंटाळा यायला नको. तिच्या सौदर्याने मोहित होऊन तिला अस्किदिल हे नाव सुलताननेच दिलं होत़.
जनानखान्यातील स्त्रियांनाही वेगवेगळा दर्जा असतो. "कदिनफे़दी" म्हणजे ज्यांनी सुलतानाच केवळ हृदयात जिंकलेलं नाहीये तर त्याला अपत्यही दिली आहेत, भावी सुलतान दिले आहेत अशा भाग्यवती स्त्रिया. एकदाच सहवासात आलेल्या "इकबाल",आपण एकदा तरी सुलतानाला सुख दिलयं याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. आपल्यावर पुन्हा एकदा सुलतानाने मेहरनजर करावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. आणि अनेक जणी अशाही आहेत ज्यांना सुलतानने अद्याप दर्शनही दिलेलं नाही.
अस्किदिल फक्त एकदाच सुलतानाच्या सहवासात आली होती.ती रात्र दोघांसाठीही वेगळ्याच अनुभवाची होती. यापूर्वी सुलतानाच्या सहवासात अनेक स्त्रिया आल्या होत्या,पण अस्किदिल ने त्याला भोवळ आणणारा हवहवासा वाटणारा जणू काही अधिकार गाजवणारा अनुभव दिला होता. त्याला तो अनुभव परत हवासा वाटत होता पण अस्किदिलच्या वर्चस्वाखाली कुठेतरी त्याला कमीपणा वाटत होता म्हणून नंतर तो तिच्यापासून दुर राहिला होता. आणि अस्किदिल कोणताही पर्याय नसल्यासारखी सुलतानाच्या प्रेमात पडली होती. ती प्रेमपत्रे लिहित होती.परंतू पाठवू शकत नव्हती..
अस्किदिलचं सुलतानावर जडलेलं प्रेम, तिच्याबाबत सुलतानाचा मानसिक गोंधळ कफुरच्या लक्षात येत होता.आणि हळूहळू तो अस्किदिलच्या जवळ ओढला जात होता. ती जवळपास असतांना कफुरला आतल्या आत काहीतरी वेगळेपणा जाणवायचा.
सुलतान, अस्किदिल आणि कफुर यांच्या निवेदनातून उलगडणाऱ्या या कथानकातून अठराव्या शतकातील ओटोमन साम्राज्याच्या वैभवाचे इत्यंभूत चित्र डोळे समोर उभे राहते. एका वैभवशाली वातावरणाचा अनुभव ही कादंबरी वाचताना येतो. विलासी महालांचे, तिथल्या जनानखान्यातील जीवनाचे इतके रंगबिरंगी, कलात्मक वातावरण इतक्या प्रभावीपणे रंगवले आहे की आपणही त्या झगमगाटात रंगून जातो. या झगमगाटाला जनानखान्याची पार्श्वभूमी असुनही कुठेही अश्लिलता डोकवत सुध्दा नाही. हे लेखिकेचं कौशल्य आहे. तसेच सुलतानच्या राजघराण्यातील हेवेदावे,मतभेद, शत्रूत्व, सामाजिक चालीरीती, याचाही परिचय होतो.
संवाद नसलेल्या आगळ्या वेगळ्या आकृतीबंधातील ही ही मनोवेदक कादंबरीचा तितकाच उत्कंठावर्धक, सुरस आणि प्रवाही अनुवाद झालेला आहे.