मालगुडीचा सन्यासी वाघ

पुस्तकाचे नाव - मालगुडीचा सन्यासी वाघ 
लेखक - आर के नारायण 
अनुवाद - नंदिनी उपाध्ये 
प्रकाशक - रोहन प्रकाशन 


नेहमी आपल्या धुंदीत राहणाऱया माणसाला पुसटशीही कल्पना नसते की, अन्य प्राण्यांनाही स्वाभिमान असू शकतो! त्यांची स्वतःचीही काही नीतिमूल्यं, सनातन धर्मही असू शकतो! त्यांचेही काही ठाम दृष्टिकोन असू शकतात. न बोलताही दुसऱयाशी संवाद साधण्याची क्षमता त्यांच्यातही असू शकते. माणसाला वाटतं की, जगात तोच एक महत्त्वाचा आहे.

ह्या पुस्तकातील मुख्य पात्र आहे एक वाघ. या वाघाच्या चष्म्यातून नारायण यांनी आपलं जग व त्यातील सर्व मानवी व्यक्तिरेखा व त्यांच्यातील नातेसंबंध, त्यांच्या प्राण्यांबद्दलच्या भावना आणि प्रतिक्रिया यांचं खूप बारकाईने चित्रण केलं आहे. हे करताना कोणताही अभिनिवेश नाही. अत्यंत साध्या, सरळ परंतु नम्र विनोदी पद्धतीने ही कथा हळूहळू पुढे सरकते. वरवर पाहता एका साध्या सरळ वाटणाऱया कथेतील प्रतिकं कधी आपल्या मनाची पकड घेतात ते आपल्याला समजत नाही. 

प्राणी संग्रहालयातला एक वाघ जो आता वृध्द झालेला आहे तो आपले आत्मकथन करतो आहे. तो जेव्हा जंगलात मुक्तपणे राहत होता तेव्हाचा त्याचा दरारा आणि रुबाब आणि कालांतराने एका गावात सहज मिळालेल्या शिकारीला भुलून त्याने गावाच्या आसपास मुक्काम ठोकला. गावातील लोकांच्या तक्रारीवरून एका सर्कसीच्या मालकाने त्याला जाळ्यात पकडले आणि उपाशी पोटी ठेवून धाकदपटशा दाखवून जसं शिकवलं तसं करुन दाखवायला लावलं. दरम्यान सर्कशीतल्या एका माकडाने इथे कसं राहायचं याचा सल्ला दिला. तसं वागल्यावर आपोआपच उपाशी पोटी राहणं बंद झालं. मालकाकडून होणारी मारहाण कमी झाली. खरं तर माकडाने त्याला मालकाशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता.

वाघ आणि बकरी एकाच भांड्यात सोबतीने दुध पितात हा प्रसंग सर्कशीच्या प्रेक्षकांना खुप आवडायचा. या प्रसंगी वाघाला मनावर फार संयम राखावा लागायचा. लुसलुशीत  बकरी मोहात पाडायची, पण मनातली चलबिचल थोडी जरी जाणवली की हंटरचा फटका बसायचा.

एका चित्रपट निर्मात्याला या आणि अशा काही प्रसंगाचे चित्रिकरण करायचे होते. या चित्रिकरणाच्या गोंधळात मनावरचा संयम सुटल्यामुळे संधी साधून बकरी स्वाहा करून वाघाने धुम ठोकली. चित्रिकरणाच्या ठिकाणी एकच हलकल्लोळ उडाला. सगळेजण सैरावैरा पळू लागले.  वाघ नेमका गावात पोहोचला आणि  भरवस्तीत बावरलेल्या अवस्थेत भटकू लागला. सहाजिकच घाबरलेले लोक त्याला पकडून देण्याचा, जमलच तर ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच एक साधू तेथे आला. या साधूने आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दींचा उपयोग वाघाला वाचवण्याकरता आणि त्याची आत्मोन्नती करण्यासाठी केला. त्याच्या मनात एकच विचार होता की बाह्य रंग रूप काहीही असू दे प्रत्येक प्राणीमात्राच्या व्यक्तिमत्त्वाचा आंतरिक गाभा एकच असतो.

कथेच्या ओघात कष्ट न करता शिकार मिळवण्यासाठी वाघाने केलेली तडजोड, नंतर सुखासीनतेने जगण्यासाठी स्विकारलेली गुलामगिरी. आणि अत्यंत लोभी आणि स्वार्थी माणसांच्या गर्दीत साधूचं वागण्यातून जो संदेश मिळतो, तो अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. खुसखुशीत शैलीत मनोरंजनातून उद्बोधक विचार मांडणारे उत्कंठावर्धक कथानक अगदी सुरस व ओघवत्या अनुवादामुळे मनाला भिडते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.