(७ ऑक्टोबर १८६६ - ७ नोव्हेंबर १९०५)
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. केशवसुतांनी काव्याच्या बाह्यांगातही परिवर्तन घडवून आणले. काव्याची खरी प्रकृती कथनाची व वर्णनाची नसून आत्मलेखनाची आहे.
असे आत्मलेखन एकेका उत्कट अनुभूतीचे असते व म्हणून ते स्फुट स्वरूपाचे ठरते अशा स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक अनुकूल असतात, हे सर्व त्यांनी दाखवून दिले. इंग्रजी काव्यातील सुनीत हा छंदःप्रकार त्यांनी मराठीत प्रथमच रूढ केला. शिवाय काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली.
सृष्टीतील सौदर्य काव्याला प्रेरक ठरते व तीत मानवी जीवनातील विषमतेचा अभाव असल्याने निसर्गसहवास सुखद ठरतो, अशा दृष्टीने केशवसुत निसर्गाकडे बघतात. ‘भृंग’ (१८९०), ‘पुष्पाप्रत’ (१८९२) व ‘फुलपांखरूं’ (१९००) या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता होत. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार ओजस्वीपणे व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, ‘तुतारी’ (१८९३), ‘नवा शिपाई’ (१८९८) व ‘गोफण केली छान’ (१९०५) या होत.
केशवसुत हे आधुनिक मराठीतील सर्वांत जास्त वादग्रस्त कवी आहेत. त्याचे कवित्व, कवीपण, काही दृष्टिकोन, काही कविता, क्रांतिकारकत्व व श्रेष्ठत्व हे सर्वच वादाचा विषय ठरले. एकांगी समीक्षेने पुष्कळदा अशा वादाचा जन्म होतो. ही वादग्रस्त केशवसुतांच्या श्रेष्ठत्वाचाच पुरावा होय. केशवसुतानंतर गेल्या ७०/८० वर्षात आधुनिक मराठी काव्यात कितीतरी प्रयोग व परिवर्तन झाले. तथापि केशवसुतांच्या काव्याची प्रेरकता व महत्त्व कायमच राहिले. महाराष्ट्र शासनातर्फे १९६६ ला केशवसुतांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने केशवसुतांच्या काव्यसंग्रहाच्या हस्तलिखिताची आवृत्ती प्रकाशित केली.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)