पठ्ठे बापूराव
(११ नोव्हेंबर १८६६–२२ डिसेंबर १९४५).
प्रसिद्ध मराठी शाहीर. मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला.
श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’
ह्या जिद्दीने कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले.बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९५८).तथापि त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात.
त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पवळाच्या निधनानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला.
पठ्ठे बापूरावांच्या जीवनावर त्यांच्याच नावाचा मराठी चित्रपट इ.स. १९५० मध्ये निघाला. राजा नेने दिग्दर्शक होते.
( संकलीत)