लेखक - रंगनाथ पठारे
प्रकाशक - शब्दालय प्रकाशन
ही कादंबरी फक्त वाचली जात नाही, वास्तवतेच्या भावनिक कल्लोळात लेखकाच्या शाब्दिक नखाने वाचकाला बोचकारत राहते. त्याच्या हृदयात एक वादळ घोंघावत राहतं जे शेवटपर्यंत पाठ सोडत नाही,
कथानकाचा निवेदक नायक मध्यमवर्गीय, मध्यमवयीन प्रोफेसर वालझाडे जे कुटुंबवत्सल आहे. ज्या संस्थेच्या काॅलेजमधे ते शिकवतात त्या संस्थेच्या अध्यक्षाबद्दल आदर बाळगून आहेत. अध्यक्ष सूध्दा प्रोफेसर वालझाडेंच्या अनुभवाचा, ज्ञानाचा सन्मान करतात.म्हणूनच साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षांनी प्रोफेसर वालझाडेंना दिलेली आहे. बेचाळीसच्या अंदोलनात दहा आकरा वर्षाचा मुलगा भाग घेऊन स्वातंत्र्य सैनिक कसा काय होतो. त्याच निकषावर स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन कशी मिळवतो हा प्रश्न कसा सोडवायचा, अध्यक्षांच्या चरित्रात याची सा़गड कशी घालायची या कोड्याचं उत्तर काही सापडत नाही.
परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करणाऱ्या समाजसेविका मिसेस गोपाळे अधूनमधून प्रोफेसर वालझाडेंच्या घरी येवून चर्चा करीत. काय घडतंय, त्या काय करताहेत याची माहिती देत असतात. एका परित्यक्ता तरुण स्रीच्या अकस्मात मृत्यूची माहिती देऊन त्याची चौकषी करतांना त्यावर आंदोलनाची तयारी करताना प्रोफेसरांनाही सामील करून घेतात.
प्रोफेसर ज्या काॅलेजमधे शिकवतात त्याच काॅलेजमधे त्यांची
मुलगी सुध्दा शिकते आहे. मुलगा मात्र शिक्षण अर्धवट सोडून गॅरेज चालवतोय. एकदा त्यांच्या मुलीशी बोलतो म्हणून एका मुलाला मारहाण करण्यात आली. प्रोफेसरांच्या मुलानेच ही मुले पाठवली होती. तो अजून काय काय करतो हे प्रोफेसरांसाठी धक्कादायक होते. गॅरेजसोबत व्हिडिओ पार्लर ही चालवत होता, शिवाय एका भाजीवल्या बाईशी त्याचे संबंध होते. ही सगळी माहिती त्यांच्या मुलीनेच पुरवली होती.
एकदा प्रोफेसरांना त्या परित्यक्ता स्रीच्या प्रेताच्या पोस्टमार्टम बद्दल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करीत असलेल्या त्यांच्या एका माजी विद्यार्थ्यांकडून माहिती मिळते. ती आत्महत्या नसून खून आहे असं सुचवणारी माहिती समाजसेविकेला सांगीतल्यावर मग ज्या काही घटना घडतात त्यातून घर आणि काॅलेज या मऱ्यादित विश्वात जगणाऱ्या साध्या भोळ्या प्रोफेसरला आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या मानवरुपी श्वापदांची ओळख होऊ लागते.
ही केवळ स्षत्रीच्या शोषणाची कथा होत नाही, समाजात स्त्रीच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, तिचे भावविश्व, आणि तिचा आत्मशोध यातून वाचक म्हणून अंतर्मुख होतो. पारंपरिक समाजातील नैतिकता, आदर्श आणि मूल्ये यांच्यावर प्रश्न उभे केलेले आहे.
कथानकात राजकीय आणि शैक्षणिक घटना, कॉलेजमधील संस्थाचालक आणि प्राध्यापकांमधील छळ, मार्क वाढवण्यासाठी टाकलेला दबाव, असे प्रसंग शैक्षणिक शोषण आणि नैतिक पतन अधोरेखित करतात.
आपल्या मुलाच्या गैरकृत्याला पाठीशी घालणारी प्रोफेसर वालझाडेंची पत्नी किंवा भावाची गैरकृत्ये सांगणाऱ्या बहीणीच्या डोळ्यातही प्रोफेसर वालझाडेंना श्वापदाची झाक दिसते. मिसेस गोपाळेंना जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी मिळते त्यासाठी अगदी सहजपणे त्या आंदोलनातून अंग काढून घेतात, आणि प्रोफेसर वालझाडेंवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवतात तेव्हा या श्वापदाच्या रुपातले भयावह वर्तमान किती दाहक आहे हे जळजळीत वास्तव मनावर ओरखडे उमटतात.