युद्ध आणि शांती

पुस्तकाचे नाव - युद्ध आणि शांती 
लेखक - लिओ टॉलस्टॉय 
अनुवाद - आ.ना.पेडणेकर
प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ 



या महाकादंबरीची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतींमध्ये केली जाते. १८६९ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी केवळ एका ऐतिहासिक घटनेचे वर्णन नाही, मानवी अस्तित्वाची, जीवनाच्या विविध पैलूंची आणि इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची एक विशाल गाथा  असलेली ही 'महाकादंबरी' वाचकाला १८०५ ते १८२० च्या दरम्यानच्या फ्रेंच युद्धांच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाच्या अंतरंगात घेऊन जाते.

'वॉर अँड पीस' ची कथा प्रामुख्याने रशियन समाजातील काही प्रमुख खानदानी कुटुंबांभोवती फिरते: बुद्धिमान आणि आदर्शवादी पिएर बेझुखोव उत्साही आणि आकर्षक नताशा रोस्तोवा आणि कठोर, तत्त्वज्ञानी व वीर सैनिक प्रिन्स आंद्रे बोल्कोन्स्की या तिघांच्या वैयक्तिक कथा, त्यांचे प्रेमसंबंध, महत्त्वाकांक्षा, दुःख आणि आत्म-शोध कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. शिवाय यांच्या आसपास आणि युद्धभूमीवर असणाऱ्या पाचशे पेक्षा जास्त व्यक्तिरेखा  कथानकाच्या ओघात येतात. 

एकीकडे, कादंबरीमध्ये 'पीस' (शांती) चा भाग आहे, जिथे रशियन उच्चभ्रू समाजाचे वैभवशाली जीवन, त्यांचे नृत्य-समारंभ, शिकार, राजकीय चर्चा आणि कौटुंबिक गुंतागुंत रेखाटली आहे. दुसरीकडे, 'वॉर' (युद्ध) चा भाग आहे, जो नेपोलियनच्या रशियावरील आक्रमणाचे, लढायांचे थरारक आणि वास्तववादी चित्रण करतो.

टॉलस्टॉयने या दोन भागांचे इतके कुशल मिश्रण केले आहे की वाचकाला उच्चभ्रू वर्गाचे राहणीमान आणि रणांगणावरील सैनिकांचे कष्ट आणि पराक्रम या दोन्ही जगांची एकाच वेळी अनुभूती मिळते. कादंबरी जणू एक 'गद्य-महाकाव्य' आहे, जिथे व्यक्तिगत आणि ऐतिहासिक घटनांची गुंफण होते.

पिएर, जो सुरुवातीला एक अननुभवी आणि गोंधळलेला तरुण असतो, तो नंतर जीवनाचा अर्थ शोधणारा तत्त्वज्ञ बनतो. 
प्रिन्स आंद्रे, जो सुरुवातीला युद्धाच्या पराक्रमाला  मोठेपणा मानतो, तो युद्धाचे भयावह वास्तव पाहून जीवनातील मूल्यांचा पुनर्विचार करतो. नताशा, तिचे तारुण्यातील अल्लडपण, तिची उत्कटता आणि नंतरची तिची परिपक्वता, या सर्व व्यक्तिरेखांची मानसिक आणि भावनिक वाढ इतक्या बारकाईने टॉलस्टॉयने दर्शविली आहे की त्या वाचकाला खऱ्या वाटू लागतात.

टॉलस्टॉय व्यक्तीरेखांच्या द्वारे संघर्षांचे आणि नैतिक विचारांचे अत्यंत सखोल विश्लेषण करतात. इतिहासाचे आणि मानवी अस्तित्वाचे तत्त्वज्ञान मांडतात.

टॉलस्टॉयचा विश्वास आहे की इतिहास हा काही 'महान' व्यक्तींच्या इच्छाशक्तीचा परिणाम नसतो, तर तो कोट्यवधी सामान्य लोकांच्या सामूहिक इच्छेचा, त्यांच्या 'जनशक्ती'चा परिणाम असतो. लढाईचे वर्णन करताना तो सामान्य सैनिकांचे आणि रशियन जनतेचे महत्त्व अधोरेखित करतो, ज्यांनी केवळ देशप्रेमापोटी लढून नेपोलियनला हरवले. 

टॉलस्टॉयच्या मते, इतिहासाची गती ही एका अदृश्य, अटळ नियमांनुसार चालते, ज्याला नियंत्रित करण्याची शक्ती कोणत्याही एका व्यक्तीमध्ये नसते.


पिएर आणि आंद्रे यांच्या आत्म-शोधातून जीवनाचा खरा अर्थ काय आहे, हे समजवण्याचा प्रयत्न होतो. त्यांना सत्ता, सामाजिक प्रतिष्ठा किंवा युद्धातील गौरव यापैकी कशातही शाश्वत आनंद मिळत नाही. त्यांना खरा आनंद आणि शांती कुटुंबात, साधेपणात आणि इतरांवर प्रेम करण्यात मिळते.

'वॉर अँड पीस' ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही, तर ती मानवतेचा एक विशाल आरसा आहे. ती युद्ध, प्रेम, मृत्यू, विश्वासघात, आत्म-शोध आणि शांती यासारख्या सार्वत्रिक मानवी भावना आणि अनुभवांचा वेध घेते. टॉलस्टॉयने या कलाकृतीतून सिद्ध केले की, इतिहासाच्या महानाट्यात सामान्य माणसाचे जीवन आणि त्याची नैतिक मूल्येच शेवटी खरी आणि महत्त्वाची ठरतात.

बाराशे पानांच्या मुळ कादंबरीचे संक्षिप्तिकरण असलेला मराठी अनुवादही सातशे पेक्षा अधिक पानांचा आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर या कादंबरीचा मराठी अनुवाद इ - बुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.