लेखिका - उमा कुलकर्णी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस
अनुवादकाला केवळ दोन भाषा येणे पुरेसं आहे , असं नाही तर पूर्ण कलाकृतीचे संपूर्ण आकलन होणं महत्त्वाचं आहे. ते नसेल आणि दोन्ही भाषा जरी येत असल्या तरी अनुवाद फसतात. याच तत्वाचं पालन करून पंचावन्न पेक्षा जास्त उत्तमोत्तम कन्नड पुस्तकांचे अनुवाद करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केलेल्या सन्मानीत अनुवादिकेचे हे बालपणापासूनचे प्रांजळ आत्मकथन.
लहानपण बेळगावात गेलं त्यामुळे कन्नड भाषा अगदीच अनोळखी होती असं नाही. बोललेलं समजलं तरी व्यवस्थीतपणे बोलता येत नव्हतं. मग लिहिणं तर बाजूला राहीलं. लग्न झाल्यावर पुण्याला आल्यावर त्यांच्या पतीने विरुपाक्ष यांनी शिवराम कारंत या़ची कादंबरी वाचली. कादंबरीबद्दल सांगीतल्यावर उत्सुकता ताणली गेली आणि पुर्ण कादंबरी वाचून दाखवा हा पत्नीचा हट्ट पुर्ण केला. त्याच वेळी उमाताईंनी जे ऐकलं ते मराठीत लिहायला सुरुवात केली. नंतर हे सगळं व्यवस्थित पुनर्लेखन केले आणि त्याला शीर्षक दिले "मुकज्जीची स्वप्ने". अर्थात हा त्यांनी स्वतःसाठी कादंबरी समजावी म्हणून केलेला उपद्व्याप होता. सगळं लक्ष अशायाकडे असल्यामुळे बाकी अडचणी अजिबात जाणवल्या नाहीत. नंतर वर्तमानपत्रात वर्षभरात मराठीत प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथांचा आढावा घेणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता त्यात या कादंबरीच्या अनुवादाचा उल्लेख होता त्याच वेळेला वाटलं की लेखकाची परवानगी घेतली असती तर कदाचित आपण केलेला अनुवाद प्रकाशित करता आला असता....
त्यानंतर एका कन्नड पुस्तकाचा अनुवाद करण्याची लेखकाची परवानगी घेऊन पहिला खर्डा पुर्ण केल्यावर लेखकानेच काम थांबवलं. नंतर शिवराम कारंत यांच्या एका कादंबरीचे संक्षिप्तीकरण केल्याचं समजल्यावर त्या कादंबरीचा अनुवाद करण्याची परवानगीसाठी पत्रव्यवहार केला. दोन प्रकरणांचा अनुवाद कारंतांनी मागवला. त्यांच्या मराठीत पारंगत असलेल्या पत्नीने मान्यता दिली आणि उमा कुलकर्णी यांच्या अनुवादिकेच्या साहित्यिक प्रवासास सुरुवात झाली.
शिवराम कारंत यांनी त्यांच्या पत्नीच्या मदतीनेच हरीभाऊ आपटे यांच्या पण लक्षात कोण घेतं चा कन्नड अनुवाद केला होता.
उमांचे पती विरूपाक्ष पुस्तक वाचायचे. त्याचवेळी त्याचं रेकाॅंर्डींग व्हायचं. मग ते मराठीत लिहिलं जायच़.काही शब्द अडायचे तेव्हा शब्दकोश मदतीला यायचा. काही शब्द तिथेही सापडायचे नाही तेव्हा कारंतांना पत्र लिहिलं तर कोणतेही आढेवेढे न घेता सगळी मदत केली.
मग पुढे एस एल भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड यांच्याही पुस्तकाचे अनुवाद केले. आणि विरुपाक्ष यांनी काही मराठी पुस्तकांचे कन्नड अनुवाद केले. पसायदानाचा कन्नडमध्ये केलेला अनुवाद महत्वाचा ठरला.
अनेकदा प्रादेशिकतेचा प्रभाव म्हणून काही बदल करावा लागायचा तेव्हा मुळ लेखकासोबत केलेली चर्चा एक वेगळा दृष्टिकोन द्यायची. पुढे शिवराम कारंत, एस एल भैरप्पा हे पुण्यात उमाताईंच्या घरी राहायचे. इतकी मोठी माणसं अगदी साधेपणाने राहायचे. पुढे भैरप्पांची पर्व आल्यावर त्यावर सर्वदूर झालेली चर्चा, वर्तमानपत्रात आलेली परिक्षणे, परिसंवाद नंतर पुणे विद्यापीठात भैरप्पाच्या साहित्यावर तीन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केले होते त्यात अनेक प्रस्थापित लेखकांनी सहभाग घेतला होता.
भैरप्पांच्या आवरण कादंबरीबद्दल जे काही वादविवाद झाले त्याचेही विस्तृतपणे विवरण दिले आहे.
ज्यावेळी उमाताईंना वंक्षवृक्ष साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ही बातमी अगोदर वडिलांकडून समजली. अधिकृतपणे काही समजलं नसल्यामुळे हे खरं की खोटं या विचारात घालवलेला अर्धा दिवस, यामागे झालेला गोंधळ मजेशीर होता.
उमा ताईंच्या लेखनात वाक्यरचनेच्या, शुद्धलेखनाच्या काही चुका वारंवार होताहेत हे त्यांची मैत्रीण शकुंतला पुंडे यांच्या लक्षात आल्यावर त्या चुका परत होऊ नये म्हणून ते शब्द दोन दोन पान लिहायला लावलेली शिक्षा दिली. याच शकुंतला पुंडेंच्या आईंच्या संघर्षावर लेख लिहिता लिहिता झालेली केतकर वहिनी ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली.
भारतीय मंदिर- शिल्प शास्त्रातील द्रविड शैलीची उत्क्रांती, विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये. या विषयावर केलेली पीएचडी...
असे काही किस्से, काही कहाण्या, अनुवादाविषयी मुळ लेखकाचे विचार, स्वतःचे साहित्यिक विश्लेषण, पुलं, सुनिताताई यांच्याशी जुळलेले भावबंध, नामांकित लेखकांचे ,थोरामोठ्यांचे प्रोत्साहन, टिव्ही सिरियल साठी केलेलं काम, त्यातून झालेला अपेक्षाभंग या सगळ्यांसोबत त्यांच्या खाजगी जीवनात आलेल्या अडचणी, पतीचे आजारपण, घरमालकाने कोर्टात गुदरलेला दावा याही गोष्टी सांगितल्या आहेत.
अनुवादकाला कलाकृतीचे मर्म किंवा बलस्थान समजणं आवश्यक आहे, त्यामुळे अनुवाद करताना नेमका कशाचा करायचा, आणि जर बळी देणं अपरिहार्य असेल तर, कशाचा द्यावा याचा निर्णय घेणे सोयीचं जातं. थोडक्यात समीक्षकांपेक्षा अनुवादकाला वेगळ्या प्रकारची साहित्यिक जाण असावी लागते. ही जाण उमाताईंना नक्कीच होती.
या आत्मकथनातून आपल्याला उमाताईंनी अनुवाद केलेल्या पुस्तकामागे असलेला एक अद्रुष्य हात दिसतो. त्यांचे पती विरुपाक्ष यांचा. जो अगोदर दिसत नव्हता, जाणवतही नव्हता.