लेखक - श्रीकांत बोजेवार
प्रकाशक - पुस्तककट्टा
व्यंगात्मक, उपरोधिक, लेखन मुळातच आव्हानात्मक असतो. पावनेदोन पायाच्या माणसाने हे आव्हान सहजपणे पेललं असे म्हटले तर वावगे ठरू नये. वाचतांना आपण हसत असतो, पण कथा संपल्यावर विचरमग्न होतो.
जन्मतः एक पाय अखुड असलेल्या पितांबरचं लंगड्या हे टोपणनाव नाव. . त्याचे सगळे मित्र दहावीच्या परीक्षेची तयारी करीत असतांना तो मात्र सातवीला तीन वर्षे मुक्कामी होता. शारीरिक अपंगत्व असूनही, त्याचे डोके अफाट वेगाने चालत असुनही, समोरच्या व्यक्तीचे गुपित ओळखणे, वेळेनुसार परिस्थितीचा फायदा घेणे आणि स्वतःचा उत्कर्ष साधण्यासाठी भले बुरे मार्ग शोधण्यात तो वाकबगार असला तरीही शाळेत
पीटी या विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाशी जमलं नव्हतं. शाळा सोडून कुठेतरी काम कर हे बापाच्या तोंडून ऐकायला असुसलेला होता. पण त्याचा बापही त्याला शिकवण्याचा हट्ट सोडत नव्हता. मोठ्या अपेक्षेने त्याने पितांबरला गेंगाणे मास्तरकडे शिकवणी लावली तर मास्तराची बायको एक टक पितांबरच्या आडदांड शरीराकडे बघत राहायची. मग शिकण्याकडे लक्ष कसं लागणार होतं.
एकदा त्याला शाळेच्या बाबतीत असे काही रहस्य समजले की मुख्याध्यापकांनीच त्याला थेट दहावीच्या परीक्षेला बसवून पास करण्यासाठी जी काही खटपट करावी लागत होती ती सगळी केली आणि लंगड्या पितांबरच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. एके काळी खांद्याला शबनम लटकवून, अंगठ्याला खिळा मारलेली चप्पल घालून फिरणाऱ्या एका पत्रकाराला थेट कारपर्यंत पोहोचताना बघीतल्यावर लंगड्यालाही अशीच गगनभरारी मरायची होती. पुढे बारावी पर्यंतच्या दोन वर्षात त्याने शाळेसाठी आणि गावांसाठी जी धडपड केली.त्यामुळे लंगड्या स्थानिक आमदाराच्या नजरेत आला आणि त्याच्या आयुष्याचा परीघच बदलू लागला.आता त्याला सगळेच जण "लंगड्या" नाही तर पितांबर या नावाने आणि आदराने संबोधू लागले.
धडधाकट असणाऱ्या दोन पायांनी धावणाऱ्या माणसांना मागे टाकून तो स्वतःच्या पावणेदोन पायांनी तो धावू लागला होता. त्याच्या ओळखी पाळखी वाढल्या होत्या एवढेच नव्हे तर लोक त्याच्याशी ओळख करण्यासाठी धडपडत होते.
एकदा आमदार साहेबांनी त्याला आपल्यासोबत मुंबईला नेल्यावर जणू त्याच्या अंगभूत हुषारीने त्याने राजकीय वर्तुळात प्रवेश केला. तो आता पितांबरचा पितांबर साहेब झाला. यानंतर त्याने जे कलं ते केवळ अचंबित करणारं होतं.
शारीरिक व्यंग शालेय प्रगतीचा अभाव घरची गरीबी यातून प्राप्त झालेल्या लंगड्या या नावालाच अपमानाचा झिड कारल्याचा एक गंध होता लहानपणापासूनच या गंधाचा त्याला तितकारा होता अभ्यासात आपल्याला गती नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा अभ्यास करून प्रगती करणाऱ्या भाग्यवंताशी आपली लाईन जुळत नाही हे त्यांना ओळखलं आणि प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल रिझल्ट मिळवून तूच आहेस तुझ्या आयुष्याचा मूर्तिकार या ब्रीदाचा पाठलाग सुरू केला. आता तो आयुष्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर येऊन उभा होता.
या ज्यावेळी तो सातवीत होता त्यावेळी मांजरींशी फार शत्रूत्वाने वागायचा. रस्त्याने जाता येता मांजर आडवी गेली की त्याचा संताप व्हायचा. एकदा एका मांजरीने त्याच्यावर हल्ला करुन त्याच्या गळा पकडला होता. तरीही इथपर्यंतच्या प्रवासात त्याला अकल्पनिय साथ मिळाली मार्जार कुळाची. मांजराच्या मदतीशिवाय तो इतका यशस्वी होऊच शकला नसता.
पुस्तकातली गणितं कुचकामी ठरवुन जगराहटीची नवी समीकरणे त्याने स्वतःच्या सुत्राने सोडवली. त्यामुळे अगोदर त्याचं लंगड्या हे नाव गळुन पडलं. मग पितांबरचं पितांबरजी झालं. गाडी आली. बंगला बांधला. बँकेतल्या पैशांच्या शिलकेवर शुन्य चढू लागले.
तरीही तो अस्वस्थ होता.
एकंदरीत समाजव्यवस्थेवर, राजकारणावर व्यंग करणारी, ही कादंबरी कथानकातून मानवी स्वभावातील नैतिकता आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष, तसेच राजकारण आणि सामाजिक व्यवस्थेवर उपरोधिक भाष्य करते. लंगड्या पितांबरचा, पितांबरी, पितांबर साहेब होण्याचा प्रवास भौतिक यशाचा आहे की नैतिक अधःपतनाचा, हा मोठा प्रश्न वाचकांसमोर उभा राहतो. लेखक स्वतः व्यंगचित्रकार असल्यामुळे खुसखुशीत विनोदी मांडणीमुळे हसू येत असलं तरी शेवटी मात्र वाचक अंतर्मुख होतो.