डॉ. रत्नाकर मंचरकर ( ६ ऑक्टोबर १९४३ - २० फेब्रुवारी २०१२ ) जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इ. कार्य केले. विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही मंचरकरांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) आणि ‘समीक्षा आणि समीक्षापद्धती’ (११ लेख), असे बहुविध लेख लिहून त्यांनी समीक्षकाची योगदान करण्याची भूमिका पार पाडली . ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड पहिला : आख्यानक व स्फुट कविता’ (१९८३), ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड दुसरा : संक्षेपरामायण’ (१९८३),या दोन्ही खंडांना महाराष्ट्र शासनाचा ‘समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र’ या विभागातील सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (१९८४) मिळाला. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)