हे. वि. इनामदार ( ३ नोव्हेंबर १९२५ - २३ जुन २००५ )संत साहित्य आणि संत विचार यांचा वेध घेताना हेमंत विष्णू इनामदार खोलवर, मुळापर्यंत जाऊन भिडले. संत साहित्यात अखंड अवगाहन करत राहिले. संत साहित्याचे अध्ययन-अध्यापन, संकलन, संपादन, मार्गदर्शन यांत ते सदैव कार्यमग्न राहिले. त्यांच्या लेखनात सहजता, सुबोधता, प्रासादिकता आणि मुख्य म्हणजे अर्थपूर्ण प्रवाहिता नेमकेपणाने उतरली. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ‘संत नामदेव’ (नामा म्हणे), ‘भागवत धर्माची मंगल प्रभात’, ‘संत सावता दर्शन, (१९७०), ‘श्री ज्ञानेश्वर व संतमंडळ’, ‘ज्ञानदेवे रचिला पाया’, ‘एकनाथकालीन मराठी साहित्य’, (१९८३) ‘श्री नामदेव चरित्र’, ‘काव्य आणि कार्य’, ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’, ‘मराठेशाहीचा उत्तरकाळ’ अशी अकरा स्वतंत्र पुस्तके, संपादित सोळा ग्रंथ, नियतकालिकांचे संपादन (महाराष्ट्र साहित्य पुस्तिका, धर्मभास्कर, अबोली) याशिवाय विशेष प्रसंगी लेख, विविधांगी लेखनसंपदा म्हणजे त्यांच्या भरघोस साहित्य योगदानाची साक्ष होय. सकळ संत व्यासपीठ, गीता धर्म मंडळ, या संस्थांच्या कार्यातही त्यांनी मोलाची साथ दिली. भक्तिमंदिरातील नंदादीप, वेध ज्ञानेशाचा, अभंग नवनीत, आस्वाद ज्ञानेश्वरीचा, नामा म्हणे हे त्यांचे ग्रंथ विशेष गाजले.
प्राचीन साहित्याभ्यासकांच्या श्रेयनामावलीतील सर्वमान्य नाममुद्रा आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात त्यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकर्तृत्वाने आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. यशस्वी प्राचार्य, कुशल अध्यापक, प्रभावशाली वक्ता, चिंतनशील अभ्यासक आणि विचारांची बांधिलकी जपणारा अभ्यासू लेखक म्हणून त्यांची खास ओळख आहे (संदर्भ - महाराष्ट्रनायक)