डॉ. झिवागो विरुद्ध राजसत्ता



रशिया मध्ये लेनिनच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांत स्टालिन सर्वाधिकारी झाला आणि मग कला, वाङ्मय यांपासून सर्व क्षेत्रांत सरकारीकरण झाले. शिवाय दडपशाही आणि दहशत यांचे राज्य आले. लेखकांना संघटनेचे सभासदत्व स्वीकारणे सक्तीचे होऊन सुमार कर्तृत्वाचे कवी व लेखक वरचढ झाले. 

आपल्या लिखाणाचा कोण कसा अर्थ काढील याचा नेम नसल्याचे पाहून  बोरीस पास्तरनाक यांनी कविता लिहिण्याचे जवळजवळ थांबवले. रशियात लेखकांना सरकारी यंत्रणेच्या आधाराने काही काम मिळवून चरितार्थ चालवणे शक्य होते. पास्तरनाक यांनी तोच मार्ग स्वीकारून परकी वाङ्मयाचे रशियन भाषेत रूपांतर करून कमाई करण्यास सुरुवात केली. 

बोरिस पास्तरनाक हे मुख्यतः कवी होते. कवी म्हणून ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. परदेशांतही त्यांच्या कवितांचा चाहतावर्ग बराच मोठा होता. स्टालिन हा स्वतः ललित व गंभीर वाङ्मयाबद्दल अनभिज्ञ नसून चांगला जाणकार होता. त्याचे अखंड वाचन चालू असे. असंख्य सुमार कवी व लेखक त्याच्या कारकीर्दीत वर चढले असतील, पण उत्तम, अभिजात काय, हे तो ओळखत होता. यामुळे पास्तरनाक यांच्याबद्दल त्याला आदर होता. त्यातच मित्रमंडळींच्या मेळाव्यात स्टालिनने अपमान केल्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या पत्नीने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केल्यानंतर पास्तरनाक यांनी स्टालिनची एक व्यक्ती म्हणून काय मानसिक अवस्था आहे याचा विचार करून पाठवलेल्या छोट्या पण भावपूर्ण पत्राने स्टालिन भारावून गेला. यामुळे स्टालिनच्या मनात पास्तरनाक यांच्याबद्दल वेगळेच स्थान निर्माण झाले. 

यावेळी लेखक, कवी यांच्यापासून अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना कारावासात वा यमसदनास पाठवण्यासाठी यादी करण्यात आली, तेव्हा ‘पास्तरनाक यांचे काय करायचे’, असे विचारल्यावर स्टालिनने उत्तर दिले, ‘त्यांना वगळावे, स्वप्नभूमीत राहणारा तो एक वेडा आहे.’ पास्तरनाक हे नामवंत कवी असून लोकांत त्यांच्याबद्दल किती आपुलकी आहे याची जाणीव स्टालिनला होती. 

रशियात काही वेळा असे घडले आहे की, अनेक कवी प्रचारात्मक कविता म्हणत आणि श्रोते कंटाळत. पास्तरनाक आले की, अगोदर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होई.मग ते कविता म्हणू लागले की, अनेक जण त्यात सामील होत. एकापाठोपाठ एक अशा कवितांचा आग्रह होई, कारण त्यांच्या अनेक कविता लोकांना पाठ होत्या. 

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लोकजीवनात बदल होऊन काही स्वातंत्र्य मिळेल, ही पास्तरनाक यांची अपेक्षा फोल ठरली. मग त्यांच्या मनात काही काळ घोळत असलेल्या कादंबरीच्या कथानकास लेखनरूप देण्याचे त्यांनी ठरवले. आपली ही कादंबरी सरकारी रोषास कारणीभूत होईल याची त्यांना पूर्ण खात्री होती. तरीही त्यांनी लेखनास आरंभ केला. तीच डॉ. झिवागो ही कादंबरी.

डॉ. युरी झिवागो या डॉक्टर आणि कवी अशा व्यक्तीच्या पहिल्या महायुद्धाच्या आणि त्या पाठोपाठ रशियात झालेल्या क्रांतीच्या काळातील जीवनाभोवती कादंबरीचे कथानक फिरते.
अशा या कथानकाबद्दल सरकारी संक्रांत येण्याचे कारण नाही. पण कादंबरीत तेवढेच कथानक नाही. रशियात बोल्शेविकांच्या हाती सत्ता आल्यावर काय झाले याचे वर्णन आहे आणि झालेल्या बदलांबद्दल टीकाटिपणी आहे. सरकारी रोष त्यामुळे ओढवला.

स्टालिनच्या निधनानंतर रशियात सत्तांतर होऊन क्रुश्चॉव प्रमुख सत्ताधारी बनल्यावर एकंदर रागरंग पाहून पास्तरनाक यांना वाटले की, काही अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळेल. विशेषतः क्रुश्चॉव यांनी स्टालिनचे अवमूल्यन करणारे भाषण केल्यावर हा समज वाढणे साहजिक होते. पण पास्तरनाक यांना उलटा अनु़भव आला. यामुळे आपली कादंबरी रशियात प्रसिद्ध होणे अशक्य असून ती परदेशात प्रसिद्ध होणे जरुरीचे असल्याची त्यांची खात्री झाली. पण हे जमणार कसे, ते मात्र त्यांना समजत नव्हते. वास्तविक, इसाया बर्लीन या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या ज्ञानी आणि जगप्रसिद्ध लेखकाची व पास्तरनाक यांची मैत्री होती. इतकेच नव्हे तर पास्तरनाक व बर्लीन यांचे कादंबरी संबंधात बोलणेही झाले होते. . परंतु बर्लीन यांना पास्तरनाक यांची कादंबरी जगापुढे येणे आवश्यक असल्याचे पटले असले, तरी या प्रकाशनामुळे पास्तरनाक यांच्या जीवालाच धोका निर्माण होईल या भीतीमुळे परदेशी प्रकाशन लांबणीवर टाकण्याचा आग्रह बर्लीन करत होते. तरीही त्यांनी डॉ.झिवागो चे टंकलिखित आपल्या बरोबर लंडनला नेले. 

कादंबरीच्या प्रकाशनाचा मार्ग आकस्मिकपणे मोकळा होईल, असे पास्तरनाक यांना वाटले नव्हते. पण २० मे १९५६ रोजी व्ह्लादिमिरस्की हे रशियन आणि सर्गिओ दिअ‍ॅन्जेलो हे इटालियन गृहस्थ पास्तरनाक यांच्या निवासस्थानी हजर झाले आणि प्रकाशनाचा मार्ग दिसला. दिअ‍ॅन्जेलो हे इटालियन कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते. ते ‘रेडिओ मॉस्को’वर कामाला होते. एक दिवस पास्तरनाक यांची कादंबरी प्रसिद्ध होणार असून ती अभिजात ठरेल, असे एक छोटे वृत्त त्यांनी वाचले. इटलीहून मॉस्कोला येण्यापूर्वी त्यांचे आणि मिलान येथील तरुण व कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित फेल्ट्रिनेली यांच्याशी रशियातून काही नवे लिखाण मिळवण्याचे प्रयत्न करण्यासंबंधी एकमत झाले होते. पास्तरनाक यांच्या कादंबरीसंबंधी बातमी वाचल्यामुळे ती इटालियन भाषेत प्रसिद्ध करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी दिअ‍ॅन्जेलो आपल्या मित्राला घेऊन आले होते. दिअ‍ॅन्जेलो यांनी डॉ.झिवागो या कादंबरीचा विषय काढला, तेव्हा पास्तरनाक यांनी सांगितले की, ‘रशियन राज्यकर्त्यांच्या संस्कृतीस ती मानवणारी नसल्यामुळे ती रशियात प्रसिद्ध होणे शक्य नाही.’  

तसे पाहिले तर डॉ.झिवागो ही एक प्रकारे पास्तरनाक यांची स्वतःचीच वाङ्मयीन प्रतिमा आहे. लेखक आणि कादंबरीनायक हे दोघेही हरवलेल्या भूतकाळातील सुसंस्कृत, बुद्धिवादी रशियन आहेत. ही कादंबरी कधीही छापली जाण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे जो मागेल त्याला तिचे हस्तलिखित द्यावे, असे पास्तरनाक यांना वाटले. यामुळे ते दिअ‍ॅन्जेलो यांस म्हणाले की, ‘कादंबरीचे टंकलिखित तुम्हाला देतो. एक अट आहे की, ती प्रसिद्ध झाल्यावर काही महत्त्वाच्या देशांतील, विशेषकरून इंग्लंड व फ्रान्समधील, प्रकाशकांना तिची प्रत पाठवली जाईल असे आश्वासन फेल्ट्रिनेलींनी दिले पाहिजे. मिलानच्या कार्यालयास तुम्ही विचाराल काय?’ दिअ‍ॅन्जेलो यांनी लगेच होकार दिला. मग पास्तरनाक यांनी 433 पानांचे टंकलिखित दिअ‍ॅन्जेलोंच्या हवाली केले व म्हणाले, ‘मला फासावर देतील त्यावेळी हजर राहण्याचे मी तुम्हाला आमंत्रण देतो.’ 

ते टंकलिखित नेपल्सला फेल्ट्रिनेली यांच्याकडे पाठवणे दिअ‍ॅन्जेलो यांस अवघड गेले नाही. कारण ते स्वतः कम्युनिस्ट व ज्याच्याकडे धाडणार तेही कम्युनिस्ट. यामुळे विमानाने ते पार्सल पाठवताना मॉस्कोत तपासणी झाली नाही.
पास्तरनाक यांचे टंकलिखित मिळाल्यावर फेल्ट्रिनेलींनी ते रशियन जाणणाऱ्या त्यांच्या मित्रास दिले. त्याने वाचताच सांगितले की, ते प्रसिद्ध न करणे हा सांस्कॄतिक क्षेत्रातील गुन्हा ठरेल. मग फेल्ट्रिनेलींनी पास्तरनाक यांच्याशी गुप्तपणे पत्रव्यवहार करण्याची यंत्रणा निश्चित केली आणि प्रकाशनाचे कायदेशीर हक्क देणारा करारनामा करून घेतला. भाषांतर आणि मुद्रण इत्यादी व्यवहारही ठरवण्यास विलंब लागला नाही. रशियन सरकारला या सर्व व्यवहाराची माहिती ताबडतोब कळली. ‘के.जी.बी.’ चा प्रमुख सेरॉव्ह याने पोलिटब्युरोला कळवले की, पास्तरनाक यांचा फेल्ट्रिनेलींशी कादंबरीच्या प्रकाशनाचा करार झाला असून इंग्लंड व फ्रान्स येथील प्रकाशकांना प्रकाशनाचे अधिकार दिले आहेत. रशियात प्रकाशित करण्यास परवानगी नाही. यानंतर आठ दिवसांनी रशियन सरकारच्या सांस्कृतिक खात्यासाठी एक विस्तृत अहवाल तयार करण्यात आला. त्यात म्हटले होते की, डॉ.झिवागो मध्ये रशियातील ऑक्टोबर क्रांतीची व क्रांतीच्या नेतृत्वाची बदनामी करण्यात आली आहे. इटलीतसुद्धा ही कादंबरी प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध आणण्याचे प्रयत्न केले जातील.’

इटलीत पास्तरनाक यांची कादंबरी प्रसिद्ध होत असल्यामुळे तिचे प्रकाशन थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता रशियन सरकारने सेरॉव यास रोमला धाडले.
सेरॉव याने रोममध्ये व इतरत्र यासाठी बरेच प्रयत्न केले. कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रास मुलाखत दिली. पण त्याचे प्रयत्न फोल ठरले. मुख्य म्हणजे, प्रकाशक फेल्ट्रिनेली हे कोणत्याही दबावाला बळी पडणे शक्य नव्हते.
फेब्रुवारीत पास्तरनाक यांची इटालियन भाषेतील तार फेल्ट्रिनेली यांस आली. आपल्या कादंबरीचे प्रकाशन सहा महिने लांबणीवर टाकावे; 1957 च्या सप्टेंबरमध्ये रशियात ती प्रसिद्ध होईल तोपर्यंत थांबावे. तारेचे उत्तरही मागवण्यात आले होते. तथापि, याआधी पास्तरनाक यांनी फ्रेन्च भाषेत मिलानच्या पत्त्यावर पत्र पाठवून आपण दबावाखाली तार पाठवली आहे, असे लिहिले. पण ‘तू सहा महिने प्रकाशन थांबव आणि नंतर मुळात मी लिहिली आहे तशी, बदल न करता प्रसिद्ध कर. रशियन सरकार माझ्या कादंबरीत बदल करून ती प्रसिद्ध करणार आहे. यामुळे मला होणारे दुःख तूही रशियन सरकारच्या आवृतीवर आधारलेली इटालियन भाषेतील आवृत्ती प्रसिद्ध केल्यास अधिकच वाढेल.’ फेल्ट्रिनेली यांनी पाठवलेल्या उत्तरात कादंबरीचे प्रकाशन सहा महिने लांबणीवर टाकण्याचे मान्य केले. त्यांनी ही कादंबरी वास्तववादाचा उत्तम नमुना असल्याचे सांगून, हा वास्तववाद सध्याची फॅशन म्हणून नाही, तर ही खरी कला असल्याचा अभिप्राय दिला होता.

डॉ.झिवागो या कादंबरीच्या इटालियन आवृत्तीच्या प्रकाशनाच्या मार्गात अनेक अडथळे येऊनही ती 15 नोव्हेंबर 1957 रोजी प्रसिद्ध झाली. त्याच्या थोडे दिवस आधी पास्तरनाक यांचे पत्र प्रकाशकास आले. त्यात त्यांनी प्रकाशकाचे मनापासून आभार मानून फ्रेन्च, इंग्रजी, जर्मन इत्यादी भाषांत कादंबरीचे प्रकाशन मार्गावर असल्याचे लिहिले होते. या कादंबरीबद्दल अगोदरच रशियातच नव्हे तर अनेक देशांत चर्चा झाल्यामुळे तिला वाचकांचा जोमदार प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत थोड्या अवधीत साडेआठ लाख प्रती संपल्या. 

डॉ.झिवागो ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर नोबेल पारितोषिक समितीने तिला 1958 सालचे पारितोषिक जाहीर केले. पास्तरनाक यांना पारितोषिक मिळण्याची खात्री होती. 23 तारखेला घोषणा झाली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा मॉस्कोतील प्रतिनिधी मॅक्स फ्रॅन्केल हा आदल्या दिवशीच पास्तरनाक यांच्या निवासस्थानाच्या जवळ मुक्कामाला आला. पारितोषिक जाहीर झाल्यावर पास्तरनाक यांचा रशिया वगळून इतर जगात सार्वत्रिक गौरव झाला. रशियन सरकार व लेखक संघटना यांनी टीकास्त्र सोडले. सरकारी दबावामुळे पास्तरनाक यांना नोबेल पारितोषिक व त्याची रक्कम यांना मुकावे लागले आणि समारंभात भाग घ्यायचा प्रश्नच आला नाही.

ज्या परदेशी प्रमुख व्यक्तींनी याची दखल घेतली, त्यात नेहरूंचा समावेश होतो. त्यांनी वृत्तपत्र परिषदेत पास्तरनाक यांचा गौरव केला. तसेच क्रुश्चॉव यांना पंतप्रधान या अधिकारात नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेखक संघटनेचा सदस्य म्हणून पत्र पाठवून पास्तरनाक यांना नोबेल पारितोषिक घेऊ द्यावे, असे म्हटले. 

रशियन सरकारची बंधने आणि टीका थांबली नाही. पास्तरनाक यांना डॉ.झिवागो या कादंबरीच्या युरोपमधील प्रकाशनामुळे मानधनाचा ओघ सुरू झाला असला, तरी त्याचा उपभोग घेणे कठीण झाले. पण प्रकाशकाने रूबल्समध्ये मिळकत होईल अशी व्यवस्था केली. सरकारी निर्बंध जाचक होऊ लागल्यामुळे पास्तरनाक यांनी क्रुश्चॉव यांना पत्र लिहिले. ते वाया गेले. यातच पास्तरनाक यांची प्रकृती ढासळत जाऊन हृदयरोग बळावून फुप्फुसाच्या कर्करोगाने पास्तरनाक यांचे 30 मे 1960 रोजी निधन झाले. रशियातील एका नियतकालिकात मागच्या पानावर दोन ओळीत बातमी आली. जगभर मात्र बातमी व लेख यांनी अंकच्या अंक भरले होते.

पुढे क्रुश्चॉव हे पदच्युत झाल्यावर त्यांच्या मुलाने त्यांना डॉ.झिवागो कादंबरी दिली. ती वाचल्यावर, ‘बंदी घातली ही चूक झाली’, असे ते म्हणाले. 

पास्तरनाक यांची प्रेयसी, ओल्गा व तिची मुलगी यांना परकी चलन वापरल्याबद्दल जबर शिक्षा झाली. सरकारने मग ही शिक्षा कमी केली. नंतर 1991 साली कम्युनिस्ट राजवटच संपुष्टात आली आणि डॉ.झिवागो कादंबरी व पास्तरनाक यांच्या कवितांच्या संग्रहांवर लोकांच्या उड्या पडू लागल्या. अशा रीतीने राज्यकर्त्यांवर एका कवीने मात केली.

संदर्भ -  विविध स्रोतांद्वारे संकलीत 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.