१८५७ चे स्वातंत्र्य समर... ग्रंथ नव्हे बाॅम्ब

सावरकर लंडनला गेले तेव्हा मुखर्जी नावाचे एक गृहस्थ भारत निवासाचे व्यवस्थापक होते. मुखर्जीची पत्नी इंग्रज होती. तिच्या वतीने भारतमंत्र्याच्या कार्यालयातील ग्रंथालयाचा उपयोग करण्याची आवश्यक ती अनुमती सावरकरांनी मिळवली. 

या ग्रंथालयात बसून सावरकरांनी मूळ पत्रे, गुप्त कागदपत्र,लोकसभेचे गुप्त कागद आणि सैनिकी खलिते यांचे प्रचंड ढीग वाचून काढले, ब्रिटिश म्यूझियममध्ये १८५७ वर काही ग्रंथ होते. तेही त्यांनी पाहिले. 'शिपायांचे बंड' हे रजनीकांत यांनी लिहिलेले बंगाली पुस्तक त्यांनी वाचले. अठरा महिन्यांहून अधिक काळपर्यंत सखोल अभ्यास नि चिकाटीचा उद्योग करून, १९०८ सालच्या एप्रिलच्या सुमारास 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर' हा आपला संस्मरणीय मराठी ग्रंथ त्यांनी लिहून पुरा केला. 

या ग्रंथाचे हस्तलिखित त्यांनी नाशिकला बाबाराव सावरकरांकडे पाठवून दिले. गुप्त पोलिसांना याचा वास लागला आणि ते हस्तलिखित जप्त करण्यासाठी, त्यांनी महाराष्ट्रातल्या कित्येक छापखान्यांवर एकाच वेळी आकस्मिक छापा घातला, पण या कारवाईत त्यांना यश आले नाही. भीतीमुळे भारतातील कोणताही छापखाना तो ग्रंथ छापून प्रसिद्ध करण्यास धजेना. तेव्हा ते हस्तलिखित पॅरिसला सावरकरांच्या एका स्नेह्याकडे परत पाठविण्यात आले. सावरकरांच्या स्नेह्यांनी हा मराठी ग्रंथ छापून घेण्याचा प्रयत्न केला. त्या छापखान्यात संस्कृत ग्रंथ छापण्यात येत असल्यामुळे, हे मराठी पुस्तक येथे छापून घेणे शक्य वाटले होते. पण तिथल्या जर्मन जुळाऱ्यांना मराठी कंपोज साधेना; त्यामुळे शेवटी हा प्रयत्नही सोडून द्यावा लागला. 

लंडनमधील अभिनव भारताचे सदस्य वामनराव फडके यांनी इतर काही सदस्यांच्या सहकार्याने नि अय्यर यांच्या देखरेखीखाली, या हस्तलिखिताचा इंग्रजी अनुवाद तयार केला. या महान ग्रंथाच्या प्रकाशनासाठी अभिनव भारताच्या सदस्यांनी आपसांत निधी गोळा केला. 
स्कॉटलंड यार्डच्या गुप्त पोलिसांनी आपल्या एका हस्तकामार्फत मूळ हस्तलिखिताचे एक प्रकरण हस्तगत करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारला नि हिंदुस्थान सरकारला या आगामी ग्रंथाची बातमी लागली होती. 'क्रांतिकारक, स्फोटक नि राजद्रोही' या शब्दांत ब्रिटिश गुप्त पोलिसांनी या ग्रंथाचे वर्णन केले होते. या दोन्ही सरकारांनी या आगामी ग्रंथाचा इतका धसका घेतला की, त्या भयग्रस्त बेचैनीच्या भरात त्यांनी तो ग्रंथ घाईघाईने आक्षिप्त ठरवून जप्त करून टाकला! तो ग्रंथ आक्षिप्त ठरवताना तो अद्याप प्रसिद्धही झाला नव्हता हे सुद्धा त्यांनी मान्य केले! 

अशा रितीने सावरकरांच्या ग्रंथाने जागतिक साहित्य भांडारात स्वयंविशिष्ट पहिले स्थान पटकावले! प्रसिद्धीचा प्रकाश पाहण्यापूर्वीच तो ग्रंथ अंधारात लोटला गेला होता. हा अजोड सन्मान प्राप्त झालेला नि या दृष्टीने वाङ्मयाच्या विश्वात अनन्यसाधारण ठरलेला हा एकमेव लेखक होय! 

सावरकरांनी हे जप्तीचे आव्हान स्वीकारले आणि ब्रिटिश, अमेरिकन नि युरोपियन वृत्तपत्रांमधून दोन्ही सरकारांना हास्यास्पद ठरवून त्यांची खमंग रेवडी उडविली. काही ब्रिटिश वृत्तपत्रांनी आपल्या सरकारच्या लज्जास्पद वृत्तीविषयी संताप व्यक्त केला. 

त्यानंतर, अभिनव भारताने तो ग्रंथ चोरून प्रकाशित करू नये यासाठी स्कॉटलंड यार्डने कसून पाळत ठेवली होती. परंतु काय वाटेल ते करून ते पुस्तक प्रसिद्ध करायचेच अशा जिद्दीने अभिनव भारताने आपली लढत सुरू ठेवली होती. 

फ्रान्स आणि जर्मनी या दोन्ही देशामध्ये हा ग्रंथ छापण्याच्या कामी ब्रिटिश पोलिसांनी अडथळा आणला; पण अखेर त्यांच्यावर मात करून सावरकरांनी तो ग्रंथ १९०९ साली हॉलंडमध्ये 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ १८५७' ह्या नावाने छापून घेतला. 
पॅरिसमध्ये राणा यांच्या घरी ह्या ग्रंथाच्या प्रतीचा साठा ठेवण्यात आला. अशा रितीने एक इतिहास लिहीत असतानाच सावरकर दुसरा इतिहास घडवीत होते!  

या ग्रंथाच्या प्रतींचे वाटप नि वितरण यांचा इतिहासही तितकाच उदात्तरम्य आहे. हिंदुस्थान, अमेरिका, जपान, चीन या देशांत या ग्रंथाच्या प्रती अगदी सुखरूप जाऊन पोचल्या. कारण त्या सर्व प्रतीवर “पिकविक पेपर्स,' 'स्कॉटचे ग्रंथ' असे मथळे छापून घेतलेली खास वेष्टने गुंडाळलेली होती! काही ठिकाणी एका प्रतीला तीन तीनशे रुपये ही अकल्पित किंमत देऊन लोकांनी हा ग्रंथ विकत घेतला होता! 'दुर्मिळ भेट' म्हणून अनेक इंग्रजांनी आपल्या मित्रांना ह्या ग्रंथाच्या प्रती दिल्या! महमद अलींनी हा ग्रंथ सर चार्लस क्लीव्हलँड यांच्याकडून उसना मागून वाचला होता! युरोपियन ग्रंथकार नि इतिहासकार यांनी हा ग्रंथ सोत्कंठ जिज्ञासेने वाचला. साऱ्या जगभर या ग्रंथाचा बोलबाला झाला आणि मागाहून अनेक भाषांमधून त्याच्या कितीतरी आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. आला. अशा रितीने एक इतिहास लिहीत असतानाच सावरकर दुसरा इतिहास घडवीत होते!   

ह्या महाग्रंथाचे पडसाद नि परिणाम १९१४ सालात उमटलेले आढळून आले. त्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या दुसऱ्या युद्धाला त्याने स्फूर्ती दिली. गदर पक्षाच्या ज्या नेत्यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला नि त्याचा संदेश सर्वत्र फैलावला,त्यांनीच कोमागाटामारू बंड उभारले. त्यांनी धर्मनिष्ठेने या पुस्तकाचे पठण केले होते आणि त्यातून अमर स्फूर्तीचा आवेश मिळविला होता. भगतसिंग नि त्यांचे सहकारी यांनी क्रांतीच्या ज्वाला पेटत ठेवण्यासाठी नि आपल्या पक्षाला द्रव्यसाहाय्य मिळविण्यासाठी १९२८ सालात या ग्रंथाची एक भूमिगत आवृत्ती काढली होती. ते या महाग्रंथाला 'क्रांतिकारकांची गीता' म्हणत असत.

सतत अडतीस वर्षेपर्यंत सावरकरांचा हा ग्रंथ जप्तीच्या अंधारात पडलेला होता. एक कट्टर सावरकरवादी मो. शि. गोखले यांनी मुंबईत हा ग्रंथ गुपचूप छापून प्रसिद्ध केला आणि त्याच्यावरील बंदीला उघडपणे आव्हान दिले. लोकमताचे अत्यंत दडपण पडल्यामुळे अखेरीस, अहिंसा-देवाला भजणाऱ्या मुंबईच्या काँग्रेस सरकारने त्या ग्रंथावरील बंदी उठवली. पण तोपर्यंत त्या ग्रंथाचे इष्टकार्य जवळजवळ सफळ झाले होते. 

त्या ग्रंथाची उदात्तरम्य कथा अजूनही संपली नव्हती. त्याच्या जन्माच्या वेळच्या वादळीकाळात त्याचे मूळ हस्तलिखित एका ठिकाणी जपून ठेवण्यासाठी पाठविण्यात आले होते. मूळचे गोव्याचे जे. डी. एस. कुटिन्हो हे अभिनव भारताचे एक कट्टर अनुयायी होते. त्या गडबडीच्या काळात, पोर्तुगीज वकिलातीकडे असलेल्या आपल्या वशिल्याचा उपयोग करून ते पोर्तुगालला सटकले आणि तेथून अमेरिकेत गेले. जाताना त्यांनी ते हस्तलिखित बरोबर नेले होते. भारतीय क्रान्तिकारक म्हणून त्यांना अनेक अडचणी सोसाव्या लागल्या नि अनेक घोक्यांना तोंड द्यावे लागले. पण या सर्व बिकट काळात, “एक संस्मरणीय दस्तऐवज' म्हणून हे हस्तलिखित त्यांनी मोठ्या भक्तीने जतन करून ठेवले होते. वॉशिंग्टनला एका कॉलेजात ते प्राध्यापक म्हणून काम करीत होते आणि अडतीसएक वर्षेपर्यंत त्यांनी ते हस्तलिखित आपल्याशी बाळगले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, डॉ. डी. वाय. गोहोकर यांच्यामार्फत त्यांनी ते सावरकरांकडे पाठवून दिले. 

सावरकरांच्या दुसऱ्या एका महान ग्रंथाला भारत मुकला आहे. तो म्हणजे १९०९ सालच्या अखेरीस सावरकरांनी जवळजवळ पुरा लिहून काढलेला 'शिखांचा इतिहास' हा होय. या ग्रंथाचे हस्तलिखित प्रसिद्धीसाठी भारतात पाठविण्यात आले होते. ते वाटेतच गहाळ झाले. हिंदुस्थानच्या टपाल खात्यानेच ते गिळून टाकले असे म्हणतात.

संदर्भ - स्वातंत्र्यवीर सावरकर, धनंजय कीर 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.