बाळ गाडगीळ ( २९ मार्च १९२६ - २१ मार्च २०१०
गाडगीळ यांनी मराठी साहित्यसृष्टीत विनोदी कथाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली . त्यांच्या या कथा बहुतांश मध्यमवर्गीय मानसिकतेवर बेतल्या असल्या तरी वेगळी शैली, अनुभवांचे वैविध्य, रोचक भाषा यांमुळे त्या स्वतंत्र अंगाच्या, वेगळ्या ढंगाच्या झाल्या . समाजातील व्यथा, वेदना, विसंगती, कारुण्य, स्वार्थ अशा अनेक गोष्टींना गाडगीळांच्या कथालेखनातून नेमकेपणाने स्थान मिळाले .‘माशाचे अश्रू’ (१९५८), ‘गबाळ ग्रंथ’ (१९६२), ‘चोर आणि मोर’ (१९६७), ‘बंडल’ (१९९१) असे त्यांचे अनेक विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांची संख्या तीसच्या पुढे आहे. ‘रेखा’, ‘आकार रेषा’ या कथासंग्रहांतूनही गाडगीळ यांची कथालेखनातील स्वतंत्र वाटचाल निदर्शनास येते. विनोदी आणि ललित शैलींतील त्यांचे काही निबंध आणि वृत्तपत्रीय सदरलेखनही प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहे. त्यामध्ये ‘म्यां, माझा बाप आणि ह्येचा बाप’ याचा विशेष उल्लेख करता येईल. ‘विनोद तत्त्वज्ञान’ या ग्रंथातून गाडगिळांनी विनोद या साहित्य प्रकाराचे मूलगामी तत्त्वनिष्ठ आणि या आकृतिबंधाचे श्रेष्ठत्व व वेगळेपण दाखविणारे विवेचन केले . ‘विनोद केवळ हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही. त्यामागे एक जीवनदृष्टी आहे’, अशी भूमिका घेऊन त्यांनी सर्व अंगांनी विनोद विवेचन केले. ‘सिगारेट आणि वसंतऋतु’ या वेगळ्या प्रकारच्या प्रवासवर्णनातून अमेरिकेचे खेळकर, प्रसन्न आणि तरीही चिंतनशील दर्शन घडते. ‘लोटांगण’ (१९६१) या त्यांच्या विनोदी लेखनाला १९६१सालचा महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट विनोदी लेखनाचा’ पहिला पुरस्कार विभागून मिळाला. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)