१९०८ साली जेव्हा पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.
यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.
हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये १९१० साली मांडली होती.
त्या परिषदेला १७ देशांमधून १०० महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.
त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस १९११ साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी २०१२ साली साजरी झाली.
महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता १९७५ साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली १९९६ साली. पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’
सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो.
तसंच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनंही केली जातात.
क्लारां झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती. ती तारीख ठरली १९१७ साली.
तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यादरम्यानच रशियन महिलांनी ‘भाकरी आणि शांतता’ अशी मागणी घेऊन संप पुकारला. चार दिवसांनी राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
रशियात तेव्हा ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला त्या दिवशी तारीख होती २३ फेब्रुवारी. ग्रेगोरियन कॅलेंडर (जे आज आपण सगळीकडे वापरतो) त्यानुसार ही तारीख होती ८ मार्च. त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून ८ मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो.