वसंत आबाजी डहाके


वसंत आबाजी डहाके ( ३० मार्च १९४२ ) कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक आहे. जागतिक महत्त्वाच्या घटनांचा, समकालीन विचारप्रवाहाचा आणि वाङ्मय प्रकारात घडलेल्या नव्या परिवर्तनांचा संस्कार त्यांनी मनात मुरवून घेतलेला आहे. सार्‍या मंथनप्रक्रियेतून डहाके यांची कविता नवी प्रतिमासृष्टी घेऊन जन्मास येत होती. समकालीन कवींच्या समानधर्मीपणाशी ती संवाद साधत होती. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी झालेली स्थलांतरे त्यांच्या अनुभवविश्वात नवी भर टाकत होती. त्यांच्या चित्तातील अस्वस्थता भावात्मक आणि सर्जनात्मक अनुभूतींना नवी प्रेरणा देत होती. समकालीन समाज-वास्तवाचा सारा दाह आणि व्यक्तिमनातील प्रक्षोभ, उद्वेग त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या पहिल्या कविता  संग्रहातून  व्यक्त होतो.
१९८७ मध्ये त्यांचा ‘शुभवर्तमान’ हा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.‘अधोलोक’ ही त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली. ती एक गंभीर शोकात्मिका आहे. भीती, अपराध, लाचारी, क्षुधा, व्यक्तित्वहीनता आणि असंबद्धता, आणि या सगळ्यांवर आपले वर्चस्व गाजविणारी विराट सत्ता आणि तिच्या टाचेखाली चिरडून पराभूत झालेल्या एका माणसाची कथा या कादंबरीत गुंफली आहे. ‘प्रतिबद्ध’ आणि ‘मर्त्य’ या डहाके यांच्या लघु-कादंबर्‍या आहेत. या दोन्ही कादंबर्‍यांत प्रयोगशीलता आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी ‘कविता म्हणजे काय?’ (१९९१), ‘समकालीन साहित्य’ (१९९२), ‘नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य’ (२००१) हे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. शिवाय ‘निवडक कविता’ (१९९१) हे पुस्तक संपादित केले आहे... त्यांनी सहकार्याने संपादित केलेल्या महत्त्वपूर्ण ग्रंथांत ‘शालेय मराठी शब्दकोश’ (१९९७), ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’, भाग १ (१९९८), ‘कविता विसाव्या शतकाची’ (२०००), ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पनाकोश’ (२००१), ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’ भाग २ (२००४), यांचा समावेश आहे.डहाके यांना आजवर अनेक वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या ‘शुभवर्तमान’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला (१९८७). त्यांच्या ‘शुनःशेप’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला... २००९ साली डहाके यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक (

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.