उत्तरकांड - लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
सीतेने सांगीतलेली तिच्या आयुष्याची कथा. तिच्या दृष्टिकोनाने उलगडलेलं रामायण.
पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी जमिन नांगरतांना सापडलेल्या या कन्येला वाढवतांना जनक राजाने कोणताही आपपरभाव केला नाही. सुखी जीवनासह चांगले शिक्षणही दिले. ती ज्या कोणाशी विवाह करेल तो शस्रनिपूण असावा म्हणून अत्यंत अवघड प्रण तिच्या स्वयवंरात ठेवला.
रामाशी लग्न होईपर्यंत सीतेचे सुखी समाधानी ऐशआरामी जीवन रामासोबत वनवासाला जायचं या एका निर्णयाने ढवळून निघालं. सतत आकरा वर्षे पती आणि दिर या दोन्ही पुरुषांच्या सहवासात तिच्या मानसिक कुचंबणेचा विचार रामायणात नाही. धर्म आणि वचनाच्या प्रभावात गुंतलेल्या रामाच्या दृष्टीने सोबत असलेली सीता आणि लक्ष्मण सारखेच. परंतु वनवासाच्या अखेरीस रावणाला पराभूत करून सीतेला सोडवल्यावर तो तिच्या पावित्र्यावर शंका घेऊन स्वीकार करायला नकार देतो.
रावणाशी युद्ध माझ्या वंशातील स्रीचे अपहरण केले म्हणून त्याला शिक्षा देणं गरजेचं होतं असं राम म्हणतो तेव्हा लक्ष्मण रामाला समजवतो. सीतेचा स्विकार करण्यासाठी भाग पाडतो.
पुढे आयोध्याला आल्यावर लोकापवदापायी राम लक्ष्मणाकरवी सीतेला जंगलात सोडतो. ती वाल्मिकीऋषींच्या आश्रयास जाते. त्यावेळी तिच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात...
कोणता राम खरा....
पती प्रेमाबरोबरच वात्सल्याची ही उणीव भासून देणारा राम, सीतेला सोडेल पण सत्याला सोडणार नाही असं म्हणणारा राम....
पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या अहिल्याचा स्विकार करण्यासाठी उद्युक्त गौतम ऋषींना उद्युक्त करणारा राम...
प्रजेने बोट दाखवलं म्हणून गर्भार पत्नीचा त्याग करणारा राम, की अश्वमेध यज्ञात सीतेच्या सुवर्ण प्रतिमेला शेजारी बसवुन धर्म कार्य करणारा राम....
कोणता राम खरा...??
अश्वमेध यज्ञाचा घोडा लव कुशाने आडवल्यावर भरलेल्या धर्म सभेत ही मुलं रामाचीच आहेत म्हणून त्यांना युवराज्यभिषेक झाला पाहिजे असा निर्णय झाल्यावर
ही मुलं माझी आहेत, महाराजांची नाहीत. महाराजांनी माझा त्याग केला तेव्हाच उदरातील अभ्रकांचाही त्याग झाला.आता या मुलांवर कसा काय अधिकार पोहोचतो.....
असे कडाडून सांगणारी सीता.....
एस एल भैरप्पांनी चमत्काकृतींना पुर्णपणे फाटा देऊन पात्रांना मानवी पातळीवर वागवतांना कोणत्याही प्रकारच्या अभिनिवेषापासून दुर असुनही हे रामायण अस्वस्थ करीत राहते.