मार्क इंग्लिस - डॉ. संदीप श्रोत्री.
ही कहाणी आहे एका वेड्या जिद्दीची, दुर्दम्य साहसाची, हिमशिखरांनी त्याचे पाय हिसकावून घेतले त्याच हिमशिखरावर कृत्रिम पायांनी चढाई करण्याची.....
१९८२ साली माउंट कुक शिखरचढाईच्या वेळी एका हिमवादळामध्ये तो एका सोबत्यासह अडकला.त्यांनी एका बर्फाच्या गुहेचा आसरा घेतला. बेस कॅंम्पला रेडिओ द्वारे संदेश पोहोचवला त्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली गेली. एका हेलिकॉप्टरने त्यांना शोधून काढले. अन्न पाणी औषधांचे कीट टाकले गेले. दुर्दैवाने त्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.परत प्रयत्न सूरू झाले.अखेर अनेक अडचणी व अडथळे पार करून तब्बल चौदा दिवसांनी त्या दोघांची सुटका करण्यात आली. त्यानंतरचे अनेक महीने त्याला हाॅस्पिटलमध्ये काढावे लागले कारण हिमदंशाने दोन्ही पाय गुडघ्याखाली कापावे लागले होते.
त्याच्या पत्नीने सर्वार्थाने त्याची सेवा केली. त्याच्या मनावर आलेली निराशा दूर करुन नवी दिशा दिली. त्यानेही जिद्दीने अभ्यास करून जीवरसायनशास्त्रातील सर्वोच्च पदवी घेऊन ख्राईस्टचर्च वैद्यकीय केंद्रामध्ये रक्ताच्या र्करोगाच्या गुणसूत्रांविषयी संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली.
मोंटाना मार्लबरो या जागतिक दर्जाच्या वाईन तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये संशोधक म्हणून नोकरी करतांना त्याने तयार केलेल्या विशिष्ट वाईनला जागतिक पातळीवर पुरस्कार मिळाला.
पण तो समाधानी नव्हता. उंच उंच बर्फाच्छादित डोंगर जणू काही त्याला खुणावत होते. अपघात होण्याअगोदर तो माऊंट कूक राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक होता. आणीबाणीच्या प्रसंगी अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका करण्यासाठी धावणे हे महत्वाचं काम होतं त्याच्याकडे. आता त्याने बर्फावर कृत्रिम पायांनी स्कीइंग करायला सुरुवात करुन अनेक स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कार मिळवले. सिडनी पॅरालिम्पिक मध्ये सायकलिंगमध्ये रौप्यपदक कमवले. आणि मग केली चढाई न्युझीलंड मधील सर्वोच्च शिखर माउंट कुक वर जिथे त्याने पाय गमावले होते.
माउंट खूप च्या शिखरावर उभे असताना त्याच्या आशा, आकांक्षा, महत्वकांक्षेला नवीन पंख मिळाले होते, त्याला आता वेध लागले होते जगातील सर्वोच्च ठिकाणी पोहोचायचे.
माउंट एव्हरेस्ट वर, ते ही कृत्रिम पायांनी....वयाच्या पन्नाशी नंतर...!
जिथे निसर्ग धडधाकट माणसाचीही अत्यंत कठोरपणे परीक्षा घेत असतो. तिथे मार्कला कृत्रिम पायांनी चालायचं होतं. जे कधी खराब व्हायचे, कधी तुटायचे, तर कधी त्यामुळे त्वचा घासून संसर्ग व्हायचा. काही वेळा दोन पावलांतील अंतर मैलाएवढं वाटायचं. तरीही पृथ्वीवरच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्याच्या त्याच्या जिद्दी समर निसर्गलाही नतमस्तक व्हावं लागलं.
मार्क इंग्लिश ची यशोगाथा डॉक्टर संदीप श्रोत्री ह्यांनी अत्यंत प्रवाही भाषेत मनोवेधक शैलीत सांगताना वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब साधले आहे. आपण मार्कच्या आसपास वावरतो आहे असच वाटत राहतं. गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या साहित्याची वेगळे परिशिष्ट जोडल्यामुळे आपण कुठेही अडखळत नाही.
मार्क इंग्लिस च्या या एव्हरेस्ट मोहिमेचे चित्रीकरण डिस्कव्हरी चॅनेलवरून पुढे नंतर ‘एव्हरेस्ट बियाँड दि लिमिट्स’ नावाच्या मालिकेतून दाखविले गेले.