रेणुका.. एक परिक्रमा
डाॅ. अनिता गुप्ते
आपली संस्कृती हजारो वर्षे पुरातन आहे. या काळातील पुराण ग्रंथात वास्तव अवास्तवाची सरमिसळ झालेली आहे. ह्यातून एक व्यक्तिरेखा निवडून त्यावर कांदबरी लिहिणे तसे आव्हानात्मकच.
पुराणातील पात्रांवर कादंबरी आपल्या साहित्यात आता नवीन नाही परंतु ती अगदीच वास्तवाला धरुन नसली तरीही वास्तवाच्या जवळपास असावी,अतार्किक नसावी ही अपेक्षा असते. जी ही कादंबरी वाचतांना पुष्कळशी पुर्ण होते असे जाणवते.
एकवीरा, अंबा, यल्लम्मा या नावाने ओळखली जाणारी रेणुका देवी आपले आराध्य दैवत आहे. तिची ही चरित्रात्मक कादंबरी.
कथा, दंतकथा, अख्यायिका पुरातन ग्रंथाच्या संदर्भातून आकारलेलं चरित्र.
मातापुरच्या प्रसेनजित राजाची ही राजकन्या बालपणी अत्यंत खोडकर, सख्या सोबत्यांना दमवणारी, तरीही मनमिळावू, सगळ्यांवर प्रेम करणारी आहे. वाघाच्या जखमी झालेल्या बछड्याची प्रेमाने सुश्रुशा करून त्याला पाळणारी आहे. शिक्षण पूर्ण होऊन आल्यावर अगस्ती ऋषींनी मदतीसाठी प्रसेनजित राजाची सेना मदतीसाठी बोलवल्यावर त्यासोबत रेणुका ही गेली आणि युद्धात मदत केली. त्यावेळी ती रणचंडीका होते.
परशुरामाच्या जन्माच्या वेळी किंवा ती पाय घसरुन पडल्यावर डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर उपचाराच्या वेळी, मसुरिका ( देवी..?) सारख्या रोगप्रसाराला रोखण्यासाठी प्रतिबंधक करण्यासाठी रोगग्रस्त स्रावाचे निरोगी लोकांमध्ये संक्रमित करुन जिवितहानी रोखली. ( लसीकरण?) ह्यातून त्यावेळचे वैद्यक शास्त्र मनावर अत्यंत प्रगत होते हे वाचकांच्या मनावर बिंबवणे कौतुकास्पद आहे.
बालपणी वाघाचं पिल्लू पाळणे, नाग साप हाताळणे हे आदिवासी, भिल्ल मित्रांच्या शिकवणीने सहजसाध्य आहे हे ती समजावून सांगते.
जमद्गनी ऋषींशी लग्न झाल्यावर सगळ्या राजवैभवाचा त्याग करुन त्यांच्या सह वैरागी जिवन जगते.
जमद्गनी ऋषींचं हा अवतार आपल्याला चकित करणारा आहे. कधीही क्रोधित न होणारे, मीतभाषी, सर्व विकारांवर विजय प्राप्त केलेले, अत्यंत संयमी...
खिळवून ठेवणारं हे चरित्र वाचतांना लेखिकेने कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य घेतले त्याला काहीच हरकत नाही.कारण ही कादंबरी आहे....
काही शब्द अवजड वाटले तरीही लेखिकेचं भाषा प्रभुत्व मान्य करावे लागेल कारण लेखिका तब्बल पावशतकापासुन विदेशात राहतात.