द सेव्हन्थ स्क्रोल - विल्बर स्मिथ अनुवाद, बाळ भागवत.
ही एक साहसी शोध कथा आहे.
चार हजार वर्षांपूर्वी लिहिलेलं कोडं सोडवण्यासाठी राॅयन आटापिटा करते आहे. ती ताइताच्या वंशावळीतली आहे ज्याने चार हजार वर्षांपूर्वी फेरोच्या कबरीच्या सुरक्षिततेसाठी चक्रव्यूह रचला आहे.
ताईता.. हकीम कवी शिल्पकार तत्वज्ञ होता. फेरो मेमाॅसचा अत्यंत विश्वासु होता.
ड्युराइड अल् सिमा आणि त्याची इंग्लिश -इजिप्तशियन माता-पिता असलेली पत्नी रॉयन यांना योगायोगानेच अत्यंत हुशार आणि कावेबाज ताईताने फेरो मॅमोस आणि त्याचा अफाट खजिना कबरीमध्ये पुरून ठेवल्याचे वर्णन असलेल्या पेपायरसच्या गुंडाळ्या त्यांच्या हातात पडतात. त्याचा अभ्यास करणेही जिकीरीचे ठरते कारण ते काव्यात गुंफलेलं कोडं आहे.
हस्तलिखितांचा अभ्यास करीत असतांनाच अचानक झालेल्या हल्ल्यात तिचा पती मारला जातो. ती कशीबशी जीव वाचवून इजिप्त सोडून इंग्लंडला जाते. एका विख्यात पुराणवस्तू संशोधकाच्या मदतीने कबरीची शोध मोहीम राबवते. हा त्यांचा शोध नाइल नदीच्या अफाट प्रवाहापासून इथिओपियाच्या दऱ्याखोऱ्यांत पोहोचतो.
तो खजिना फक्त स्वत:साठी मिळवण्याच्या लालसेने पछाडलेले ताकदवान लोक पेरोच्या गुप्त खजिन्यामागे लागल्यावर अत्यंत हिंसक असा पाठलाग सुरू होतो.
इथिओपियाच्या डोंगर दर्यात, नाईल नदीच्या अफाट प्रवाहात चार हजार वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरीची जागा शोधण्यासाठी ताइताने घातलेलं कोडं सोडवण्यासाठी बध्दीमत्ता पणाला लागली होती.. सोबत प्राण सुध्दा....
पानापानाला उत्कंठा वाढतांना वाचक या जंजाळात गुरफटला जातो. ताइताच्या कोड्याचं कौतुक करीत असताना राॅयनच्या बुध्दीमत्तेची प्रशंसा करावीशी वाटते.
मुळ कथा कितीही थरारक असली तरीही तो थरार अनुवादित करतांना काहीसा फिका पडण्याची शक्यता असते. या कादंबरीचे अनुवादक बाळ भागवत ह्यांनी ही शक्यता मोडीत काढली आहे.
वाचतांना काही वेळा द ममी या चित्रपटाची आठवण येते.