द गाॅड ऑफ स्माॅल थिंग्ज -
अरुंधती राॅय.
अनुवाद अपर्णा वेलणकर.
१९९७ सालचे बुकर पुरस्कार मिळालेल्या या कादंबरीच्या उत्कृष्ट अनुवादासाठी अपर्णा वेलणकर ह्यांना २००४ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
साठ सत्तरच्या दशकातील कालखंडात केरळ मधल्या आयमेनेम मध्ये एकाच कुटुंबाभोवती कथानक फिरत राहते. त्यावेळचा जातीभेद, कम्युनिस्टांचे आंदोलन,मोर्च्याच्या वेळी त्यांनी सधन वर्गाला दिलेला त्रास वाचतांना अस्वस्थता येते.
कमीतकमी पात्रे असली तरीही केंद्र स्थानी आहेत ते राहेल आणि इस्था हे जुळे भाऊ बहीण. अगोदर पासून शांत असलेला इस्था वाढत्या वयात हळूहळू मौन होत गेलेला, आणि मुलींनी कसं वागावं हे न कळलेली राहेल...बाप नसुनही आपलं बालपण स्वच्छंदी पणाने जगणारे. त्यांची तरुण आई भावनांचा कोडमारा दडपणारी. त्यांच्या अवतीभवती असलेल्या इतर व्यक्तिरेखांच अस्तित्व तेवढ्याच ठसठशीतपणे जाणवत राहते.
अरुंधती राॅय यांचे वादविवादाशी जुने नाते आहे. ते का.... हे वाचतांना समजते.
प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, अशा अनेक भावभावनांचे पदर उलगडतांना दडपलेल्या भावनांच्या अनुभुतीचे मुक्त प्रगटीकरण काही वेळा झडप घातल्यासारखे अंगावर येते.
पुरुषी शरीराच्या गरजा समजून घेऊन गुपचूप त्या भागवण्याची व्यवस्था करणाऱ्यांचा समजूतदारपणा स्त्रीच्या शारीरिक गरजांचा प्रश्न आल्याबरोबर नैतिकतेच्या टोकदार जाणिवेने संतापून भडकून उठतो. हे सांगतांना अरुंधती राॅयचा बंडखोरपणा जाणवतो.
त्याचसोबत त्यांनी पेरलेल्या उपमांनी त्यांच्या प्रचंड शब्द सामर्थ्याची ओळख होते. ते ही त्यांनी लिहिलेल्या पहिल्याच कादंबरीतून.