द ब्रेडविनर

द ब्रेडविनर - डेबोरा एलीस 
अनुवाद अपर्णा वेलणकर

युद्धाचे निखारे,आगीचे लोळ, रानटी तालिबान्यांचा अमानुष हैदास, बॉम्बच्या धमाक्यांनी  उध्वस्त झालेले इमारतीचे सांगाडे, दगड मातीची ढिगारे, बेचिराग भूमीवर भुकेल्या आजारी शरीराच्या झुंडी, जन्मल्यापासून घराच्या बाहेरच न पडलेली, पायाचे सांधे आखडून लोळा गोळा झालेली फिकुटलेली मुलं.....सुन्न  करून टाकणार क्रूर पशुत्व... 

परवाना... लहानशी मुलगी, लिहायला वाचायला शिकलेली. तिचे स्फोटात एक पाय गमावलेलेअब्बू लोकांना पत्र, चिठ्ठी वाचून लिहून द्यायचे. त्यातून जे पैसे मिळतील त्यातच भागवायचं, घरातली एक एक वस्तू विकता विकता शेवटी लाकडी पायही विकावा लागला. आई शिक्षिका होती.आईची मैत्रीण विरामावशी तीसुद्धा शिक्षिका होती फुटबॉल खेळायला शिकवायची. पण तालिबान्यांनी सगळ्या शाळा बंद पाडल्या होत्या. 

अचानक एका दिवशी तालिबान्यांनी अब्बूला पकडुन नेलं. का..? तर ते इंग्लडहून शिकुन आलेले होते,  इतरांनाही शिकवायचा प्रयत्न करायचे. घरात राहिल्या चार स्रीया, ज्यांना पुरुषाच्या सोबतीशिवाय घराबाहेर पडताच येणं शक्य नव्हतं. पुरुष म्हणून घरात रांगतं बाळ होतं फक्त. 

संपलेलं अन्नधान्य मोठमोठे प्रश्नचिन्ह उभे करीत होतं. 

परवानाच्या आईने तिचे केस कापून बॉम्बस्फोटात मेलेल्या मोठ्या मुलाचे कपडे घालून मुलगा बनवून अब्बूचंच काम करायला पाठवलं. किमान पोटाचा तरी प्रश्न सुटणार होता.....
रस्त्यावर काही बाही विकणाऱ्या परवानाला मुलाच्या वेशात तिची शाळेतील  मैत्रीण शौझिया भेटते.ती चहाच्या दुकानात काम करते. 
छातीचे उभार स्पष्ट होण्याअगोदर तीला काबुलहुन पळून फ्रांन्सला जायचं आहे......



या मालिकेतील दुसऱ्या पुस्तकात परवानाचा जगण्या मरण्याच्या सीमारेषेवचा प्रवास आहे.


 मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी तिची आई बहिणींसह जिथे गेली तिथेही तालिबान्यांनी हल्ला केल्यावर परवाना आईला शोधण्यासाठीअब्बूसह निघाली खरी पण रस्त्यातच अब्बूची प्राणज्योत मालवली. ज्या घरी आसरा मिळाला ते लोक तिला विकणार हे समजल्यावर ती पळून जाते. बाॅम्ब वर्षावात उजाड झालेल्या आडवळणाच्या गावात एकमेव जीवंत असलेला तान्हा मुलगा सापडतो. अकाली प्रौढ झालेली परवाना त्यालाही सोबत घेते. त्याचं नाव ठेवते हसन. एका गुहेतला लंगडा आसीफ, पुढे विराण गावातली लैला.... आठ दहा वर्षांची ही मुले एकमेकांच्या सोबतीने उपाशी तापाशी वाट फुटेल तसा प्रवास करीत असतात. 

तिसऱ्या भागात शौझियाची गोष्ट.


 परवानाची मैत्रीण, मुलगा बनलेली मुलगी. जिला फ्रान्सला जायचं होतं. पण विरामावशी सोबत काबुलहुन पाकिस्तानात पोहोचलेली शौझिया निर्वासित शिबिरातून पळते, पेशावरच्या गल्लीबोळात  काम मागता मागता भिकाऱ्याचं जगणं जगते. सोबतीला असतो तिचा कुत्रा जास्फर. एका दिवसात काही वर्षांचे अनुभव घेणारी.. पोलिसांनी तिची जमापुंजी बळकावल्यावर वांझोटा अक्राळस्तेपणा करणारी, सहृदय इंग्रज कुटुंबाच्या प्रेमात गुदमरलेली..... 
निर्वासित शिबिरासाठी धान्याचे गोदाम लुटण्याच्या प्रयत्नात पाय मोडून घेणारी..... 


वर्षानुवर्ष माणसांची जीवनेच्छा शोषून घेत जगणंच मृतवत करणाऱ्या विखारी युद्धाचा हा क्रूर चेहरा आपण पाहिलेला नाही. डेबोरा एलीस ने हा चेहरा जगाला दाखवला. आणि अपर्णा वेलंकरांनी अत्यंत समर्थपणे तो मराठीत आणला.

आजही अफगाणिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या पाकिस्तान रशिया इराण वगैरे देशात लाखो निर्वासित अफगाणी माणसं किडे मुंग्यासारखे जिवंत आहेत. अफगाणिस्तान मधून तालिबानी राजवटीचे उच्चाटन झालं असून रानोमाळ विखुरलेले निर्वासित नव्या अशाने आपल्या मातृभूमीकडे परतू लागले आहेत.

या  पुस्तकातून लेखकाला जो नफा मिळाला तो त्यांनी रस्त्यावर राहणाऱ्या जगभरातल्या निराधार मुलांना मदत करणाऱ्या स्ट्रीट किड्स इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेला दान केला आहे. 

डेबोरा एलीस ला जगभरातल्या वाचकांनी विचारलं, परवानाचं पुढे काय झालं  ? 
त्याचं उत्तर म्हणून चौथा भाग लिहिला........ 

माय नेम इज परवाना


‘अल् कायदा’नं २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवल्याने चवताळलेल्या अमेरिकेनं बदला घेण्यासाठी जगातल्या प्रगत राष्ट्रांची एकजूट करून अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं. तालिबानच्या मुसक्या आवळल्या गेल्या. २००५ मध्ये अफगाणिस्तानात नवं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. नवी राज्यघटना मंजूर करून लागू झाली. − तरीही युद्ध संपलं नाहीच. कारण  तालिबानी प्रवृत्ती संपली नव्हती. 
या देशातल्या स्त्रिया आणि मुलांचं आयुष्य तर अधिकच वैराण. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या हिंसाचाराचा सामना करत रोज आपला जीव वाचवण्याची कसरत करतच जगावं लागतं.  त्यांच्यासाठी मुलांसाठी परवानाच्या अम्मीने शाळा सुरू केली. परवानाही शाळेसाठी झटू लागली. 
अधुनमधून धमक्या मिळत होत्या. 

दररोजच्या अडीअडचणीवर मात करीत कसबसं वर्षे पार पडल्यावर मात्र शिक्षकांची मुलांची संख्या रोडावू लागली. 
मात्र मिळणाऱ्या  धमक्यांमध्ये वाढ होऊ लागली.

परवाना लढत राहिली. अम्मी गेल्यावर सुध्दा......

कित्येक वर्षांच्या युद्धग्रस्ततेतून आलेली राजकीय-सामाजिक अस्थिरता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई ही दुय्यम दर्जाची‚ उपभोगासाठी निर्मिलेली वस्तू असते; तिला पुरुषाच्या आज्ञा पाळण्यापलीकडे स्वतःच्या मताचा अधिकार नाही‚ असं मानणाऱ्या पारंपरिक विचारसरणीचा घट्ट करत नेलेला पगडा. कायदे आहेत; पण त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता जवळपास शून्यच. अशा परिस्थितीत स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळी अफगाणिस्तानात सुरू आहेत. मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा जाळल्या जातात‚ स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून मारलं जातं... तरीही हे प्रयत्न थांबलेले नाहीत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.