( ३ जुन १८९२ - ३१ ऑक्टोबर १९८६ )
वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या लेखन करू लागल्या होत्या. ‘मराठा मित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी घरच्यांचा व समाजाचा विरोध डावलून लग्न केले.
१९१०मध्ये त्यांची पहिली कथा ‘शारदाबाईंचे संसारशिल्प’ ‘मासिक मनोरंजन’मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी ‘मासिक मनोरंजन’मध्येच त्यांचा ‘स्वच्छता’ हा निबंध प्रसिद्ध झाला.
विवाहानंतर पती शिवरामपंत शिर्के यांच्या साहित्यक्षेत्रातील वावरामुळे आनंदीबाईंचा अनेक नामवंत साहित्यिकांशी परिचय होऊन मैत्री झाली. १९२८मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘कथाकुंज’ प्रकाशित झाला.पुढे ‘कुंजविकास’, ‘जुईच्या कळ्या’, ‘भावनांचे खेळ व इतर गोष्टी’ (कथा), ‘साखरपुडा’ हे कथासंग्रह ‘रूपाळी’ ही कादंबरी व बालसाहित्याच्या दालनात ‘कुरूप राजकन्या’, ‘तेरावी कळ व इतर गोष्टी’, ‘वाघाची मावशी व इतर गोष्टी’ हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. निबंध, कथा, बाल-साहित्य, स्त्री-साहित्य, अनुवादित साहित्य, आत्मवृत्त अशी बहुविध साहित्यनिर्मिती आनंदीबाईंनी केली.
स्त्रियांशी निगडित अशा सामाजिक समस्यांचे चित्रण, पुरोगामी विचारसरणी, मराठा समाजातील स्त्रियांची स्थिती, गुजरातमधील सामाजिक वातावरण, जुन्या मराठी भाषेतील शब्द व म्हणींचे वैपुल्य ही त्यांच्या रचनेची वैशिष्ट्ये होती.
अनेक गुजराती पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले आहेत.
‘सांजवात’ हे त्यांचे आत्मचरित्र १९७२ साली, म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी प्रकाशित झाले.
१९३६मध्ये जळगाव येथे भरलेल्या अ.भा.मराठी साहित्य सम्मेलनाच्या स्वागताध्यक्ष, तसेच १९३८मध्ये पुणे येथे झालेल्या अ.भा. मराठा महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या. मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी उत्तम कथासंग्रहासाठी ‘आनंदीबाई शिर्के’ पारितोषिक दिले जाते. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)