मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिल आणि खरं प्रेम राहिल ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ – सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई – या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत.
वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली. तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना मिळाली.
गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अनेक गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे ‘वादळवारं सुटलं गं’ ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही होत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली.संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर शांता शेळके यांच्या कवितेत आढळते. शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्टे होत. १९९६ मध्ये आळंदी येथे भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)