बिलाॅंगिंग

पुस्तकाचे नाव - बिलाॅंगिंग
लेखिका - समीम अली
अनुवाद - सिंधू जोशी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस





स्कॉटलंड मध्ये एका मुस्लिम कुटुंबातील एका छोट्या मुलीने मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणा-या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची,  स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची सत्यकथा. 

बालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अधूनमधून वडील भेटीला यायचे. आई मात्र कधी दिसली नाही. आपल्याला अनाथालयात का राहावं लागतं हे तिला समजायचं नाही.पेगी ऑंटी तिथल्या सगळ्या मुलींची चांगली काळजी घ्यायची. 

अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा तिला कधी एकदा स्वत:च्या घरात जाईन असं झालं. ती आली मात्र एका अत्यंत घाणेरड्या घरात; जिथं तिला तिच्या लहान वयाला न झेपणारी कामे सतत करावी लागत. तिच्या जन्मदात्रीनेच तिचा अनन्वीत छळ आरंभला. या सर्वाला आपण स्वत:च जबाबदार आहोत असे लहानगी समीम समजू लागली. स्वत:च स्वत:ला शारीरिक इजा करून घेऊ लागली. नकळत आईची तुलना पेगी ऑंटीशी करतांना तिला परत अनाथालयात जावसं वाटे. 

पण ती आईबरोबर पाकिस्तानात जायचं ठरल्यावर कदाचित आत्ताच्या त्रासदायक जीवनापासून सुटका होईल असे तिला वाटले. पण  तेथे पोहोचल्यावर मात्र तिला कळून चुकले की तिच्या आईने तिला सुट्टीवर नेलं नव्हते. समीमचे एका अनोळखी पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न लावण्यात आले.त्या वेळी ती फक्त तेरा वर्षाची होती. रोज रात्री तो तिच्यावर शारीरिक अत्याचार करायचा. 

दिवस गेल्यावर तिला परत ग्लासगोत आणण्यात आले; ते केवळ कुटुंबाकडून होणारा छळ सोसण्यासाठी. मुलाला जन्म दिल्यावरही तिच्यावर घरातल्या सगळ्या कामाची जबरदस्ती केली गेली. ती भावाच्या दुकानात दिवसभर काम करायची तेव्हा घरी तिच्या मुलाला उपाशीपोटी ठेवलं जायचं, एवढ्याशा दिड दोन वर्षांच्या मुलाला मारहाणही व्हायची हे करणारी तिची सख्खी आई होती. 

मग तिच्या आयुष्यत आलेल्या असगरने तिची मदत केली. 

खरं प्रेम म्हणजे काय याची जाणिव झाल्यावर स्वत:च्या लहान मुलाला घेऊन तिने घरच्या हिंसाचारापासून स्वत:ची सुटका करून घेतली. स्वत:च्या घरचा भयानक अनुभव ती मागे ठेऊन आली असा तिला विश्वास होता. परंतु तिच्या पळून जाण्याने तिच्या कुटुंबाच्या झालेल्या बेइज्जतीच्या परिणामांना तिला तोंड द्यावे लागेल याची कल्पना तिला कशी असणार? या सगळ्या संकटाचा सामना करतांना असगर धीरोदात्तपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. 

सध्या नवरा आणि स्वत:च्या दोन मुलांबरोबर समीम अली मँचेस्टरला राहते. स्थानिक राजकारणात तिचा सक्रीय सहभाग आहे. मॉस साईड या संस्थेत ती समुपदेशनाचे काम करते. बळजबरीने लावल्या गेलेल्या लग्नांविरूद्ध ती सतत आवाज उठवत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.