क्षण क्षण आयुष्य
सेकंड फ्लोअरला लिफ्ट मधून बाहेर पडतानाच त्याला समोर डॉ. मकवाना दिसले. त्याच्या भावाच्या रूम मधूनच ते येत होते. त्यांना बघून तो थबकला.
त्याच्याकडे बघून डॉक्टर हसले, मनात असूनही त्याला हसता आलं नाही, मनाचा प्रत्येक कोपरा उदासीने व्यापलेला होता.
हेच डॉ. मकवाना उद्या त्याच्या भावाचं ऑपरेशन करणार होते.
" गुड इव्हिनिंग रंजन, रात्री थांबणार आहेस का ? तशी गरज नाहीये. आम्ही सगळे आहोत तुझ्या भावाची काळजी घ्यायला. राहिला तरी मी हरकत घेणार नाही. "
" उद्याचा दिवस कोणता आहे हे माहित आहे पण कसा आहे हे माहित नाही ! " खोल गेलेल्या आवाजात तो उत्तरला.
" असा नर्वस होऊ नकोस, बघच तू.... उद्या ऑपरेशन नंतर तुझा भाऊ एकदम खडखडीत बरा होईल अगदी पूर्वीसारखा. "
डॉ. मकवाना आश्वासक सुरात बोलत होते, " जो माणूस फ्रंटवर एकदा नव्हे अनेकदा मृत्यूशी शेकहँड करून आलाय तो काय असा किड्यामुंग्यासारखा मरायला ? तो सोल्जर आहे रंजन, याही परिस्थितीत सोल्जर सारखाच वागतोय, थोडासुद्धा घाबरलेला दिसला नाही मला. त्यालाच भेटून येतो आहे आत्ता. ऑपरेशन करण्याअगोदर पेशंटची मानसिक तयारी कितपत आहे याची चाचपणी करीत होतो. त्याच्याशी बोलताना मला एक सारखं जाणवतोय की कदाचित माझंच डायग्नोसिस चुकतंय की काय. .. "
" मी सोल्जर नाही डॉक्टर, मृत्यूशी कधीच आमना सामना झाला नाही माझा. त्यामुळे कदाचित मी घाबरत असेल. पण दादाने माणसं किड्या मुंग्यांसारखी मारताना उघड्या डोळ्यांनी बघितली असेल... शिवाय त्याला वाटत असावं की मी आता मोठा झालोय, कमावता झालोय, मला त्याच्या आधाराची गरज नाही,म्हणून तो बेडर झाला असावा."
" म्हणजे तू गृहीत धरलय की ऑपरेशन फेल होणार"
" तसं काही नाही पण मी घाबरलोय. वडील असतानाच्या आठवणी फारशा नाहीत, त्यांच्या जागी मला दादाचाच चेहरा दिसतो. त्यानेच मला जगाची ओळख करून दिली. "
"तू त्या सोल्जर चा भाऊ शोभत नाही तुझ्यापेक्षा तुझी वहिनी कितीतरी धीराची आहे. तुझ्यासारखी निराश झालेली नाही ती. सोल्जर ची बायको शोभते खरी ! "
त्याच्याच्याने पुढे बोलवलं नाही.
" चल, लावतोस बेट उद्याचं ऑपरेशन फेल झालं तर मी प्रॅक्टिस सोडून देईल आजवर कमावलेलं नाव पैसा सगळं सोडून संन्यास घेईल. "
तो कसंनुसं हसला.
" दॅट्स लाईक अ गुड बॉय ! " डॉक्टर त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.
" विश यू ऑल द बेस्ट ! " चेहऱ्यावर ओढून ताणून हास्य आणून तो म्हणाला.
" थँक्स ! " त्याचा हात दाबत डॉक्टर मकवाना म्हणाले, " तसा मला कॉन्फिडन्स आहे मीच जिंकणार, बाय द वे भाऊ झोपला असेल तर त्याला डिस्टर्ब करू नकोस. आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनातली निराशा काढून टाक. विश हिम लॉंग लाइफ..गुड नाईट '!
डॉक्टर गेल्यावर त्याला जाणवलं आपलं मन हलकं झालंय, निवळून गेलंय. तो रूम मध्ये शिरला, भाऊ झोपला होता.
स्वातीवहिनी खिडकीशी उभी राहून बाहेरच्या अंधारातलं जग बघत होती. त्याची चाहूल लागल्यावर ती वळली,
तिच्या डोळ्यांच्या कडेला साचलेलं पाणी त्याच्या नजरेतून सुटलं नाही. परत त्याच्या मनावर उदासीची जळमटं चढायला लागली.
कॉटवर दादाचा नुसतेच चेहरा दिसतोय अन्यथा त्याच्या शरीराचा मागमुसही नव्हता. फक्त एक चादर पसरलेली आहे असं वाटलं त्याला. एकेकाळचं देखणं वास्तुशिल्प काळाच्या थपडा सहन करीत भगना अवशेषात शिल्लक असल्यासारखं.
" जेवून आलास ना तू ? "
"अं.. हो.. " भानावर येऊन तो उत्तरला. खोटं बोलला होता. सकाळी माईंनी जबरदस्तीने दोन घास खायला लावले तेवढेच. वहिनी ही जेवली नव्हतीच. स्टुलवर टिफिनबॉक्स तसाच पडलेला दिसला.
' गुड्डी त्रास देत नाही ना? "
तुझ्यासारखीच समजूतदार आहे ती, काहीच हट्ट करीत नाही, काही मागत नाही, शहाण्यासारखी वागते, असं बोलावंसं वाटलं त्याला. पण काही न बोलता दिवसभर ढोर मेहनत करून थकलेल्या कामगारासारखा बाजूच्या खुर्चीवर बसला.
" रंजन, कोणत्यातरी मल्टिप्लेक्स ला तिसरी मंझिल लागलाय,
कोणीतरी सांगत होतो. हे घरी आले की सीडी आणूया. जुन्या गाण्यांचा फार वेड आहे ह्यांना."
त्याने मान वळवून दुसरीकडे बघायचं नाटक केलं खरं पण वहिनीला त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसल्याशिवाय राहिलं नाही.
" रंजन, गुड्डी वाट बघते आहे ना ह्यांची, माई यांच्या वाटेवर डोळे लावून बसल्या आहेत ना. .हे बरे होतील, नक्की बरे होतील..अगदी पूर्वीसारखे.., तुझी चेष्टा करतील पोरगी बिरगी गटवली की नाही विचारतील, ट्रीप अरेंज करतील, जुन्या गाण्यांवर पायाने ठेका धरतील. सगळं काही अगदी पूर्वीसारखं होईल, आपले जुने सुखाचे दिवस परत येतील रे वेड्या, पण प्लीज. . तू असं रडू नकोस, किमान माझ्यासाठी तरी, तुला रडताना बघितल्यावर माझा ही धीर खचतो रे.. " वहिणीचे शब्द घशात अडकू लागले. डोळे भरून आले.
" डॉक्टरांनी लावलेली बेट जिंकावी सगळी जिंदगी देऊन टाकेल त्यांना. . "
" माझ्याशीही बेट लावली डॉक्टरांनी. आयुष्यात पहिल्यांदा वाटतं आपण हरावं, हरल्यावरच जिंकण्याचा आनंद लुटता येईल आपल्याला.. "
त्याने डोळे पुसले घड्याळात बघितलं एक वाजत आला होता सहा वाजता ऑपरेशन सुरू होणार होतं.
एकदा ग्राउंड वर परेड करताना चक्कर आली त्याला. धाडकन खाली कोसळला, बेशुद्धच पडला..इतरांनी तोंडावर पाणी वगैरे मारून शुद्धीवर आणलं, डॉक्टरांकडे नेलं, व्यवस्थित तपासून झाल्यावर त्याने डॉक्टरांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली..
कधी कधी अचानक डोकं दुखतं इतकं की डोकं फोडून टाकावसं वाटतं. फार वेळ नाही..जेमतेम पाच एक मिनिटं..पण तेवढा वेळ डोकं दुखण्याऐवजी मरण बरं..असं वाटू लागतं. नॉर्मल वर आल्यावर काही वेळापूर्वी झालेल्या असह्य वेदनांचा काहीच मागमुसही नसतो. अधून मधून डोकं दुखण्याच्या वेळी चक्करही येतात सहा-सात महिन्यापासून असं होत होतं यावेळी ग्राउंडवर झालं म्हणून सगळ्यांना समजलं.
त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या, ब्लड यूरिन कार्डिओग्राम सिटीस्कॅन एक्स-रे सगळं झालं. अनेक मशीन समोर त्याला उभा आडवा करण्यात आला. मनातल्या मनात तो धास्तावून गेला..थोडा वेळ असे वेदनांनी डोकं ठणकत म्हणजे इतका मोठा गंभीर आजार असतो का..!
सगळे रिपोर्ट आल्यावर त्याला जबरदस्ती मेडिकल लिव्ह घ्यायला सांगून पुढच्या ट्रीटमेंटसाठी विख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकवानांकडे पाठवण्यात आलं.
पार वैतागून गेला तो. .!
दोन पाच मिनिटांचा हे दुखणं सोडलं तर नॉर्मल आहे ना मी मग कशाला हा पसारा. ..काही गंभीर आजार असेल तर स्पष्ट सांगून टाका ना, काहीही ऐकायची तयारी आहे पण नाही बसलेत आपलं घोळवित..
त्याचवेळी त्याच्या हातात रिटायरमेंट ची ऑर्डर पडली त्याला सक्तीने निवृत्त करण्यात आलं होतं मेडिकल बेसवर.
खूप खवळला तो आपण निरोगी असून आपल्याला कसलाही आजार नाही. आपण कोणाच्यातरी डोळ्यात सांगतोय म्हणून आपल्याला रिटायर्ड करण्यासाठी डिपार्टमेंट गेम केला आहे असं वाटत होतं त्याला रागाच्या भरात ऑफिसरशी भांडला ही.. म्हातारा झालोय का मी ? चला..माझ्यासोबत पळा दहा किलोमीटर, विन पॉईंटला सगळ्यांचे अगोदर पोहोचेल, झालंच तर येतांनाही परत दहा किलोमीटर पळत येईल दम सोडणार नाही....
शेवटी थकून भागून घरी आला.
डॉ. मकवानांना भेटला.
परत सगळ्या टेस्ट.
ब्रेन ट्युमर. .... आर्मी हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांची शंका
खरी ठरली.
मेंदूला एका ठिकाणी गाठ आलीये ऑपरेशन करावंच लागेल.
मेंदू वरचे ऑपरेशन पुष्कळदा अयशस्वी ठरतात किंवा माणूस आयुष्यभरासाठी विकलांग होतो. असं कुठेतरी त्याच्या वाचनात आलं होतं.
हृदयात धडाधड स्फोट होत राहिले.
आपण मरणार. ..नक्की मारणार...
घाबरलो. .. मृत्यूला घाबरलो. .. फ्रंटवर असताना जगण्याची आसक्ती सोडून द्यायचो. परत यायची शाश्वती नसायची, नक्की मरणार अशी खात्री असूनही कितीदा तरी मृत्यूच्या जबड्यात जाऊन सही सलामत परत आलो त्यावेळी कधीच मृत्यूची भीती वाटली नाही मग आता का घाबरतोय आपण ? यापूर्वीही मृत्यू फक्त हुलकावणी देऊन निघून गेला, तसंच याही वेळेला होईल.३६ म्हणजे काही मरण्याचा वय नाही. मरण यायचं असेल तर कुठे येईल फ्रंटवर, एक्सीडेंट मध्ये, ऑपरेशन टेबलवर..कुठेही...आपण अमर पट्टा घेऊन आलेलो नाही. आज नाहीतर उद्या, केव्हा तरी तो येणारच ना..आपण आपलं तयारीत राहिलेलं बरं..!
कितीही झालं तरी तो एक सोल्जर होता मृत्यूला त्याने अनुभवलेलं होतं पटापट माणसं मरताना बघितलं होतं नजर मेली होती मन खंबीर झाला होतं. आता तर तो स्वतःहून मृत्यूला आलिंगन द्यायला तयार होता.
माई आता म्हाताऱ्या झाल्यात. आपण काय आणि रंजन काय त्यांना दोघेही सारखेच. रंजन सुखात ठेवीन त्यांना. नाही तरी घरापासून आपण दूरच राहिलेलो आहोत. स्वाती धीरोदत्तपणे सहन करील सगळं. बाप बनवून गुड्डीला वाढवील. फारसा त्रास होणार नाही. पेन्शन येईलच, शिवाय पीएफ ग्रॅज्युटी वगैरे सगळे पैसे मिळतील. रंजनही अंतर देणार नाही म्हणा, गुड्डी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हळवा आहे तो, फार मनाला लावून घेईल. पण काळाच्या ओघात सगळं विसरेल लग्नानंतर स्वतःच्या संसारात रममाण होईल.
सगळी तडफड शांत झाली. मनाची ऊलाघाल संपली. मृत्यूचे स्वागत करायला सज्ज झाला तो. परिस्थितीचं योग्य मूल्यमापन केल्यानंतर उगीच त्रागा कशाला..?
दुसऱ्याच क्षणी वेगळा विचार उद्भवला. ...
जिवंत राहिलो.. तर...
कदाचित शरीर लोळागोळा होऊन पडेल. गुड्डी जवळपास फिरणार सुद्धा नाही. स्वाती करेल सफाई सगळ्या उत्सर्जनाच्या घाणीची. मास्क लावून वास सहन करेल. कदाचित....! आणि नाही केलं तर...माई नक्की करतील,आई आहे ना..! रंजन एखादी नर्स ठेवील आपल्या देखभालीसाठी....किती दिवस.. किती महीने...
महत्त्प्रयासाने त्याने डोक्यातले सगळे विचार बाजूला केले.
तो स्वतःशीच उदासवानं हसला.
उद्याचा दिवस निर्णायक आहे. डॉक्टरांनी स्वातीशी बेट लावलीयं, आपण पराभूत व्हावं असं तिला वाटतंय, रंजनलाही तसंच वाटतं, अरे..काय जीणं हे.. पराभव मान्य करायला तयार आहेत ! तो सुरजित. . पाकिस्तान्यांच्या हातात सापडल्यावर स्वतःच्या हाताने छाताडात सुरा खुपसून घेतला. मेला, पण हरला नाही ! आणि हे वेडे. .सोल्जरच जगणं काय असतं हे सोल्जरच्या सोबत राहूनही कधी समजू शकले नाही, वाईट वाटतं ते एवढेच.
मघाशी स्वाती म्हणत होती, तिसरी मंझिल ची सीडी घरी गेल्यावर बघू, घरी कशाला... इथेच आणा... सगळे मिळून बघू.. रमून जाऊ आपण, हे रडत बसतील.
काहीच सांगायला नको, झोपेच़ नाटक बरं, सगऴ व्यवस्थित पार पडलं तर हसतांना बघू त्यांना. रडके उदास चेहरे नको बघायला.
ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा विझला तेव्हा पाच वाजून गेले होते. सकाळी सहा वाजता सुरू झालेला ऑपरेशन तब्बल आकरा तास चाललं होतं. डॉ. मकवाना थकलेल्या शरीराने ओढलेल्या चेहऱ्याने बाहेर आले. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खेळलेले आहेत याची जाणीव होती त्यांना. हसून रंजन कडे बघत म्हणाले " तसं ऑपरेशन सक्सेस झाले पण पेशंट शुद्धीवर येईपर्यंत फार काही सांगता येणार नाही."
नजरेतली उत्सुकता विझली, मनात देवाची आळवणी सुरू झाली.
स्ट्रेचरवरून ऑपरेशन थिएटर बाहेर येतानाचा त्याचा देह बघून रंजनला भडभडून आलं. स्वातीने हुंदका दिला, त्याच्या दोन्ही बाजूला स्टँडवर बाटल्या उलट्या लटकवलेले होत्या.त्याच्या नळ्या हिरव्या चदरीखाली कुठेतरी त्याच्या देहात खूपसलेल्या होत्या. ऑक्सिजन सिलेंडरच्या नळ्या नाकात घुसवलेल्या...नाकावरचा रबरी फुगा फुगतोय..कमी होतोय..परत फुगतोय..
डोक्याला बांधलेल्या भल्यामध्ये बँडेज मधून त्याचे मिटलेले डोळे तेवढे दिसत होते.
आय सी यु च्या बाहेर दोघं उभे होते एकमेकांच्या नजरा चुकवीत, सेकंदा मागून सेकंद पसार होत होते मिनिटं मागून मिनिटे सरकत होतो एक एक तास पलटत होता. रात्र काजळत होती.
रंजनने काहीच खाल्लेलं नव्हतं. स्वातीने तर सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. झोप येण्याचा प्रश्न ही नव्हता. घरी माईंनी सगळे देव पाण्यात ठेवले होते.
पहाटेच्या सुमारास अचानक आय सी यु तील लगबग वाढल्यासारखी वाटली. रेसिडेन्सीअल डॉक्टर खूप घाईने आत गेले होते.
रंजन चरकला...
थोड्याच वेळात डॉक्टर मकवाना येताना दिसले. रंजन कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ते आत गेले. स्वाती भिंतीला टेकून उभी होती पण तिच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी रंजनला दिसले. किमान या क्षणी तरी तो कोणालाही धीर देऊ शकत नव्हता...
पुष्कळ वेळानंतर डॉक्टर मकवाना बाहेर आले. स्वातीकडे दुर्लक्ष करून रंजन च्या खांद्यावर थोपटल्यासारखं करीत म्हणाले, " सकाळपासून व्रतस्तासारखे उभे आहात, जा तुम्ही दोघेही काहीतरी खाऊन घ्या, थोडी विश्रांती घ्या, "
रंजन चे ओठ थरथरले,
" तो कोमात गेलाय. " मंद आवाजात डॉक्टर म्हणाले. " काही मिनिटे, काही तास, काही दिवस...सांगू शकत नाही. जोपर्यंत त्याचा श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करणार. फिफ्टी-फिफ्टी चान्सेस अजूनही आहेत देवावर विश्वास ठेवा पोरांनो..! "
डॉक्टरांसोबत असलेली नर्स एकदम स्वाती कडे धावली. ती खाली कोसळत होती. रंजन थिजलेल्या डोळ्याने तिच्याकडे बघत होता.
विश हिम लॉन्ग लाइफ...हे कसलं लॉंग लाईफ, क्षणाक्षणाला मारणारे हे भिक्कारडं लाईफ..त्याला असं जगवण्यापेक्षा मारून टाका. तुम्ही हरलात तरी मी म्हणणार नाही प्रॅक्टिस सोडा, संन्यास घ्या..एवढंच म्हणेन, त्याला असं थोडं थोडं करून मारू नका. त्याला मुक्ती द्या, या क्षण क्षण आयुष्यातून त्याला मुक्त करा. ही तडफड सोल्जरला सहन होणारी नाही....
डॉक्टरांनी हात पसरवले आणि गुडघे दुमडून खाली कोसळणाऱ्या रंजनला सावरले. त्याची शुद्ध हरपायला लागली होती.
रंजनने गाडीचा दरवाजा पकडून ठेवला. स्वाती पुढच्या सीटवर बसली. दरवाजा बंद करून रंजनने ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली. हाॅस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडतांना वाॅचमनने उत्साहाने हात हलवला. रंजनने गाडी स्लो केली. मागच्या खिडकीतून इवल्याशा हाताने पाकीट वाॅचमनच्या हातावर ठेवून गुड्डी पप्पांच्या कूशीत शिरली.
" चल दादा, माई घरी वाट बघत असतील. "
रंजनने गाडी रस्त्यावर आणून स्पीड वाढवला.
जवळपास दोन महिन्यानंतर तो घरी चालला होता. डोक्यावरची जखम बरी झाली होती. मन प्रफुल्लित होते........
प्रविण कलंत्री
भगूर, नाशिक
9850795407
"