📚 हीज डे
स्वाती चांदोरकर
सध्या एकूणच भिन्न लैंगिकतेचा स्वीकार करण्याच्या चळवळी सुरू आहेत. पूर्वी भारतीय समाजात तृतीयपंथीयांना योग्य स्थान होतं. ते भिकारी नव्हते. पण ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे हा समाज तोडला असं पुस्तकाच्या ओघात आलं आहे. हिजडे हा शब्द सुद्धा "हिज डे " ह्या इंग्लिश वाक्यातून ब्रिटिश काळात तयार झालेला आहे असा एका हिजड्याच्या तोंडाचा संवाद आहे.
जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीरातले बदल त्यांना जाणवत राहतात. आपण सर्वसामान्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांचं जगणं अवघड होऊन जातं. त्यांच्या घरातल्या लोकांनाही हे सत्य स्वीकारणं कठीण जातं असे लोक मनाचा कोंडमारा सहन करीत जगतात मग केव्हातरी हिजड्यांच्या संपर्कात आले की स्त्री म्हणून जगण्याचा हा मार्ग कळतो आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पासून आपोआपच बाजूला पडतात. त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रस्थापित करायची असते. नैसर्गिक अन्यायामुळे जो देह मिळाला आहे तो नकोसा वाटू लागतो मग लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी कितीही क्लेश मनस्ताप सहन करण्याची तयारी ठेवतात. जीवंत राहण्यासाठी मग त्यांना वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. प्रसंगी देहविक्रय ही करावा लागतो मग त्यातून होणारे भयंकर रोग,
त्यांचही शोषण होत असतं. त्यांचे गुरू त्यांच्याच कमाईवर मोठेपणा गाजवत असतात. हे सगळं अंगावर काटा आणतं.
कादंबरीच्या अखेरीस निवेदकाची सारी अलिप्तता मानवी पातळीवर येते. आपल्या घरात तर हे जग निर्माण होणार नाही ना.. या भयाने आत लागलेला धक्का एक वेगळा परिमाण देतो.
तृतीयपंथांचे हेच जग, या वेदना आपल्यासाठी अनोळखी असतात. ह्यांचं जगणं समजावून घेण्यासाठी लेखिकेने पराकाष्टा केली आहे. पांढरपेशा समाजातील एका स्त्रीने तिच्याच समाजाने वाळीत टाकलेल्या अशा समुदायाच्या संपर्कात अनेक दिवस घालवणं ही सोपी गोष्ट नाही.
ज्यांच्याशी निसर्गाने वेगळा खेळ खेळला त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ही कादंबरी वाचल्यानंतर नक्कीच बदलतो.
या कादंबरीला प्रवीण दवणे यांची प्रस्तावना आहे.
त्यांच्या मते "हीज डे" ही मराठीतील नव्हे तर भारतीय भाषेतील सर्वोत्कृष्ट कादंबरीच्या परंपरेत मानदंड व्हावी अशी कादंबरी आहे.
असे असले तरी लेखिकेच्या प्रथमपुरुषी निवेदन शैलीत कथानकाच्या ओघात निवेदक पात्र अचानक बदलतं तेव्हा थोडं अडखळल्यासारखं होतं. हा एक शुल्लक दोष दुर्लक्षित केला तर कादंबरी वाचनीय आहे.