लेखांक ७ : भारतीय समाजविज्ञान कोश
ज्ञानकोश : मराठी
लेखक - जगतानंद भटकर ( संपादक, समीक्षक. भारतीय जागतिक साहित्य)
सर्वसाधारणपणे सर्वविषय संग्राहक ज्ञानकोश त्या त्या भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध असतात. विषय संग्राहक कोश मात्र त्या त्या विषयाच्या व्याप्तीनुसार ठराविक विषयतज्ञ आणि अभ्यासक यांच्यामध्येच प्रसिद्ध होतात.
मराठी भाषेत भारतीय समाजविज्ञान कोश सामाजिक शास्त्रे या विषयांना वाहिलेला ज्ञानकोश मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विषय संग्राहक असूनही अभ्यासकात तो विशेष प्रसिद्ध आहे. सातत्याने समाजविश्व ढवळणाऱ्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांतील घटकांची माहिती या कोशात आली आहे.
महाराष्ट्रातील थोर विचारवंत स.मा.गर्गे या कोशाचे संपादक होत. सोबत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग.प्र.प्रधान,शिवाजीराव भोसले या सारख्या मान्यवरांनी या कोशासाठी सल्लागार म्हणून कार्य केले आहे. महाराष्ट्रातील शेकडो प्राध्यापक,पत्रकार आणि विचारवंत यांच्या चिकित्सक आणि तटस्थ लेखन समीक्षणातून हा कोश सिद्ध झाला आहे.
सदाशिव मार्तंड तथा स.मा.गर्गे हे सापेक्षी संपादक. इतिहास आणि मराठी वैचारिक साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली आहे. गर्गे यांनी स्वतः या कोशाचा प्रारंभिक आराखडा तयार केला. पुढे महाराष्ट्रातील विचारवंत, लेखक आणि विविध संस्था हे महत्त्वाचे घटक त्यांच्या कार्याशी जोडले गेले. या कोशाचा पहिला खंड १९८६ मध्ये प्रकाशित झाला होता. २५ वर्षाच्या अथक प्रयत्नांतून सर्व पाच संहिता खंड प्रकाशित झाले. सहावा पारिभाषिक शब्दसंग्रही सोबतच प्रकाशित करण्यात आला आहे. अलीकडे २०१७ मध्ये अद्ययावत नोंदींसह पुरवणी खंड म्हणून सहावा संहिताखंड प्रकाशित झाला असून याअद्ययावत खंडातील परिभाषा घेवून अद्ययावत असा पारिभाषिक शब्दसंग्रहही २०१७ ला प्रकाशित करण्यात आला आहे. या कोशाची ही नवी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहेत.
राजकीय क्षेत्रामध्ये अनेक संस्थात्मक, विधी आणि संविधानिक संकल्पना या संदर्भात अनेक वादविवाद होत आहेत. वाढत राजकीय चर्चा आणि पेच आणि या साठी आवश्यक मुलभूत आणि पायाभूत राजकीय घटकांचे ज्ञान अनेकांना हवे असते. अर्थशास्त्र हा तर अधिक गतिशील असणारा विषय होय. ज्ञानाच्या रोजच्या प्रस्फोटातून एक नवे अर्थशास्त्र उदयास येत आहे. या गतिमान विषयाचा आवाका अनेक अभ्यासकांना कवेत घेणे गरजेचे असते. प्रशासकीय व्यवस्थांनाही अर्थशास्त्रीय अभ्यासाची नितांत गरज असते. राजकारण आणि अर्थकारण या दोन्ही बाबी सामाजिक अभिसरणाला सहज गती देत असतात. त्यामुळे अशा सामाजिक विषयातील घटकही अभ्यासणे गरजेचे असते.
मराठी भाषेमध्ये या तिन्ही भाषेत असणारे लेखन मर्यादित असण्याचा तो काळ होता. याच दृष्टीने अर्थशास्त्र,राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयातील नोंदी घेवून हा कोश पूर्ण करण्यात आला आहे. सिद्धांत, व्यक्तिचरित्र, महत्त्वाच्या घटना, अभिजात ग्रंथ घटकांत या कोशातील नोंदींची वर्गवारी करण्यात आली आहे. लेखकाच्या संशोधनाचा विषय लक्षात घेवून त्यानुसारच या खंडातील लेखन सोपविले आहे. लेखनात सुटसुटीतपणा आहे. तटस्थता जपलेली आहे. विषय मांडणीत खोली आहे; पण त्याला सर्वसाधारण पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकार ही राज्यशास्त्र या विषयातील नोंद समकालीन संविधानिक वाद विवादात पुरेसे संदर्भ वाचकांना निश्चित पुरविते. अभिनव भारत,अंतरिम अर्थसंकल्प,असहकार,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा अनेक नोंदी या कोशाच्या खंडांमध्ये पहावयाला मिळतात. समकालीन राजकीय,अर्थशास्त्रीय घडामोडीमधील विविध संकल्पना मराठी भाषेतून आणि समर्पक शब्दात मांडलेल्या असल्याने हा कोश पत्रकार,संशोधक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकल्पना मांडण्यासाठी मराठी परिभाषा खुपदा उपलब्ध नसते. येथे कोशकार आणि लेखकांनी या कोशाच्या निमित्ताने मराठी भाषेला या तीन महत्त्वाच्या विषयासंदर्भात नवीन परिभाषा मराठी भाषेला दिली आहे.
लेखक - डॉ जगतानंद भटकर ( संपादक समीक्षक. भारतीय जागतिक साहित्य)