(८ जूलै १९१६ - १ जुन १९९८ )
मराठी कादंबरीकार व कथा, चरित्रे, लघुनिबंध इ. अनेक साहित्यप्रकार हाताळणारे सव्यसाची लेखक.दांडेकरांनी लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या शंभरांहून अधिक भरेल. त्यात धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास इ. विविध विषयांवरील आणि कथा, कादंबरी, चरित्र इ. साहित्यप्रकारांतील लेखन आढळते. दांडेकरांना शिवकालीन किल्लेकोट पाहण्याचा आणि छायाचित्रणाचा विलक्षण छंद आहे. त्यांतूनच त्यांचे दुर्गदर्शन हे पुस्तक लिहिले गेले. दुर्गदर्शनाबरोबरच त्यांनी महाराष्ट्रदर्शनही घडविले आहे. आपल्या शिवप्रेमातून कादंबरीच्या रूपाने शिवकालाचे व शिवकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. बया दार उघड, हरहर महादेव, दर्याभवानी, झुंजारमाची, हे तो श्रीची इच्छा हे कादंबरीपंचक या मालेतील आहे. कादंबरीलेखनापेक्षा संस्कृतिचित्रणावर दांडेकरांचा येथे कटाक्ष आहे. दांडेकरांनी जगन्नाथपंडिताच्या आणि गीतगोविंदकार जयदेवाच्या प्रणयजीवनावरही कादंबरीलेखन केलेले आहे.
लेखन–वाचन व भ्रमण हाच दांडेकरांचा छंद आहे. स्वैर मनस्वी भ्रमंतीतून व निसर्गाच्या सहवासातून मिळविलेले विविध जीवनानुभव ते रसाळपणे मांडतात. त्यांचे मन वर्तमानापेक्षा भूतकालीन संस्कृतिविशेषांत अधिक रमते त्यांवर भाष्य करते. भारतीय वेदान्ताचे आणि संतसाहित्याचे संस्कार त्यांच्या लेखणीवाणीवर दृढपणे उमटलेले आहेत.
स्मरणगाथा हे त्यांचे आत्मचरित्र.स्मरणगाथेस १९७६ ची उत्कृष्ट मराठी साहित्यकृती म्हणून पारितोषिक देऊन साहित्य अकादेमीने गौरविले आहे .
( संदर्भ - विश्वकोश, गो म कुलकर्णी)