विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे-


 ( १२ जुलै १८६४ - ३१ डिसेंबर १९२६ ) 

मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या शीर्षकाचे अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड त्यांनी संपादून प्रसिद्ध केले(१८९८ – १९१७). ह्यापैंकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. राधामाधवविलासचंपू आणि महिकावतीची बखर हे दोन जुने ग्रंथ त्यांनी अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये संपादून छापले व त्यांनाही मोठ्या विवेचक प्रस्तावना जोडल्या. 

ज्ञानेश्‍वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, निङ्त विचार, सुबंतविचार, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहतकाल असे काही त्यांनी संपादिलेले व लिहिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिद्ध झाले. मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश इ. ग्रंथ त्यांच्या मृत्यूंनतर प्रसिद्ध होऊ शकले. राजवाड्यांच्या लेखांचे आणि प्रस्तावनांचे काही खंड शं. ना. जोशी आदींनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. धुळ्याच्या संशोधकच्या अंकांमधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे.

राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. अस्सल आणि अमूल्य अशी कागदपत्रे त्यांनी देशाच्या सर्व भागांतून, शहरांतून व खेड्यांतून अखंड भ्रमंती करून जमविली.पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनीच १९१० मध्ये स्थापना केली.स्वभाषेच्या आणि स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यास संघर्षाला प्रवृत्त करणे, हीच आपल्या कार्याची दिशा त्यांनी पक्की केली होती. 

आयुष्यभर त्यांनी एवढा व्यासंग केला पण आपले सर्व संशोधन आणि चिंतन त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून आणि फक्त मराठीतूनच व्यक्त केले. त्यांच्या संशोधनाचा आवाका फार मोठा होता आणि त्यांनी केलेली कामगिरी भरीव झालेली आहे, हे संशयातीत आणि वादातीतच ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.