Encyclopedia of Environmental Science

लेखांक ९ : Encyclopaedia of Environmental  Sciences
ज्ञानकोश : इंग्रजी 


लेखक - डॉ. जगतानंद भटकर 
संपादक समीक्षक भारतीय जागतिक साहित्य

पर्यावरणाचा  सखोल आणि विश्लेषक अभ्यास मांडणारा एक व्यावसायिक विश्वकोश. 

भारतीय पार्श्वभूमीवर संपादित केलेला पर्यावरणशास्त्र या विषयावरील Encyclopaedia of Environmental  Sciences हा आठ खंडीय इंग्रजी भाषेतील कोश सखोल आणि विश्लेषक आहे. मुकेश शर्मा, सिद्धार्थ गौतम या पर्यावरणविदांनी हा कोश संपादित केला आहे. नवी दिल्लीतील विस्टा इंटरनॅशनल पब्लिशिंग हाउस या संस्थेने या कोशाची पहिली आवृत्ती २००९ मध्ये प्रकाशित केली आहे. मानव आणि त्याचा इतिहास हा पर्यावरण या प्राथमिक घटकानेच संयोजित केला आहे. पर्यावरणाने दिलेल्या साद - प्रतिसादातूनच मानव पुढे आला आहे. मानवाने जेव्हा जेव्हा संयमाने या सादाला आपल्या जीवनात सामावून घेतले तेव्हाच मानवी जीवनाला स्थिरता- स्थायित्व लाभले आहे. वातावरणाने आखून दिलेली रेषा अर्थात पर्वताची पदरेषा,सागराची तटरेखा, नदीची पूररेषा, जंगलांची वनरेषा आणि वातावरणाची वातरेषा जेव्हा मानवाने ओलांडली किंवा तसा प्रयत्न केला त्यावेळी मानव आणि पर्यावरण हा संयोग संघर्षात बदलला आहे.

१९७२ ला  पहिली जागतिक पर्यावरण परिषद झाली. तेथून गतीने जगभरात पर्यावरणाचा अभ्यास सुरु झाला. वातावरणातील वाढलेले तापमान म्हणजे ग्लोबल वार्मिंग या संकल्पनेभोवती पर्यावरणतज्ञ एकवटले. १९८७ मध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोनछिद्र आढळले. त्यानंतर पर्यावरणातील या बदलाचा गतीने अभ्यास व्हायला लागला. पर्यावरण बदल ही समस्या ग्लोबल वार्मिंग - जागतिक तापमानवाढ याच एकाच घटकाशी वारंवार जोडली जाते ; मात्र पर्यावरण बदलाचे हे चित्र अफाट आहे. माती, पाणी, हवा, ध्वनी आणि निसर्ग निर्मितीशी निगडीत प्रत्येक घटकावर पर्यावरण बदलाचा प्रभाव पडलेला आहे.

वाढत्या औद्योगिकिकरणाने पर्यावरणाचा नाश होतो आहे; त्यामुळे पर्यावरण वाचवायचे असेल तर औद्योगिकिकरणावर निर्बंध आणावेत असा विचार प्रारंभी आणि अलीकडेही अनेक जागतिक व्यासपीठावर मांडला गेला आहे. त्यामुळेच औद्योगिकिकरणाच्या नफेखोर आक्रमकतेने ग्लोबल वार्मिंग हा घटकच समाजाच्या विचारविश्वावर लादला आहे. मात्र या पलीकडेही पर्यावरणाचे अनेक सूक्ष्मतम प्रश्न आहेत त्यावर पर्यावरण या स्वतंत्र विद्याशाखेतून सखोल संशोधन होत आहे आणि लेखन होत आहे. मुकेश शर्मा आणि सिद्धार्थ गौतम Encyclopedia of Environmental  Sciences यांनी संपादित केलेला हा कोश त्याच विद्याशाखीय प्रयत्नाचा आणि संशोधनाचा भाग आहे. 

एकूण आठ खंडांमध्ये हा कोश पुढीलप्रमाणे विभागला आहे. खंड.१ - Bio-Medical Waste Management, खंड.२- Ecosystem and Environment,खंड.३- Energy and the Environment, खंड.४ - Environmental Disasters, खंड.५ - Environmental Pollution Control, खंड.६- Environmental Waste Management, खंड.७ - Global Climate Change ,खंड.८ Wildlife and Natural Resource Conservation. कोशामध्ये घटकनिहाय नोंदी घेवून त्या वर्णानुक्रमे देण्याची पद्धत असते. या कोशात मात्र मुख्य विषयाखाली येणारे विषय प्रकरणनिहाय मांडले आहेत.


मराठी आणि हिंदी भाषेमध्ये पर्यावरण या विषयावर विपुल लेखन झाले आहे. इंग्रजीभाषेमध्ये मात्र पर्यावरण हा विषय घेवूनअधिक सखोल आणि अधिग्राह्य असे कोशग्रंथ तयार झालेले आढळतात. Gale Change learning या जागतिक प्रकाशन संस्थेने  Environmental Encyclopedia हा द्विखंडात्मक सुमारे २००० हजार नोंदींचा कोश प्रसिद्ध आहे. मात्र यातील नोंदी या माहितीपर आहेत विश्लेषक नाहीत. तुलनेने शर्मा आणि गौतम यांनी संपादित केलेला हा कोश विश्लेषक आणि सखोल माहिती पुरविणारा आहे. पर्यावरणीय आपत्ती, उर्जा आणि पर्यावरण, जीवसृष्टी आणि पर्यावरण, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे नव्याने निर्माण होणारे पर्यावरणीय विषय या कोशात आले आहेत. पूर,भूस्खलन,चक्रीवादळ, उष्णतामान आणि वायूप्रदूषण या आजच्या मानवी जीवनाला रोज छळणाऱ्या बाबी होत. अशा अतिसंवेदनशील विषयावर तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय अभ्यासपूर्ण लेख या कोशात आले आहेत. या कोशातील प्रकरणांची मांडणी ही समस्या निवारणासाठी काही सूत्र हाती यावीत या अंगाने केलेली आढळते. 

पर्यावरणाचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि पर्यावरण समस्यांवर कार्य करणारे धोरणकर्ते यांसाठी हा कोश अत्यंत उपयुक्त आहे. अलीकडे वाढीव खंडांसह हा कोश प्रकाशित झाला आहे. 


डॉ. जगतानंद भटकर
संपादक समीक्षक भारतीय जागतिक साहित्य. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.