फिडेल कॅस्ट्रो - अतुल कहाते
एका साखर जमिनदाराचा मुलगा, बालपणी शिकणं अवघड म्हणून शिक्षिकेला मारुन पळून जाणारा फिडेल कॅस्ट्रो हवानाच्या काॅलेजमध्ये गेल्यावर मात्र हुशार मुलांत गणला गेला. सगळ्या खेळात भाग घ्यायचा. तिथे त्याचे नेतृत्व गुण दिसू लागले. तो विद्यार्थ्यांचा नेता बनला. भरपूर वाचन करून त्याने जागतिक राजकारणाचाही अभ्यास केला. क्रांती ची तयारी तिथूनच सुरु झाली होती. डोमिनिकन रिपब्लिक मधली लष्करी राजवट उलथवण्याच्या सशस्त्र उठावात भाग घेतला होता. उठाव फसला पण धडा शिकता आला. देशावरील अमेरिकन पकड केवळ साखरेपुरतीच मर्यादित नसून इतरही क्षेत्रात अमेरिकन भांडवलदार आपले पाश देशाभोवती घट्ट आवळत आहेत, अप्रत्यक्ष पणे क्युबावर अमेरिकेचे वर्चस्व होते. सारे राजकीय पक्ष अमेरिकन उद्योगपतींच्या खिशात जाऊन बसले होते, देशाचे अध्यक्ष अमेरिकेपुढे लोटांगण घालीत होते. फिडेल कॅस्ट्रो ने संघटना वाढवायला सुरुवात करुन आर्थिक मदत मिळवून संघटनेला सशस्त्र बनवले. सुरुवातीला फिडेल ने सगळी पैशांची, शस्रांची जमवाजमव करायची आणि काहीतरी कारणांमुळे सगळं वाया जायचं. परत शून्यापासून सुरुवात करायला लागायची. पण निराश न होता तो प्रयत्न करीत राहीला. अमेरिकेच्या हातातलं बाहुलं बनलेल्या सरकारशी गनिमी काव्याने लढुन करून सरकार पाडले. देशाची सुत्रे हातात घेतली. या प्रवासात साथ दिली चे गव्हेरा ह्याने. मुळचा अर्जेंटिनाचा अर्नेस्ट हे त्याचं नाव. दम्याचा त्रास असुनही क्रांती साठी अनेक हालअपेष्टा भोगल्या. गनिमी काव्याने लढणारी संघटना उभी करुन क्रांतीला गती दिली.
आणि फिडेल कॅस्ट्रो स्वतःच हुकूमशहा बनला.
अगोदर फिडेल विचार करतांना कृतीवर भर देणारा परिणामांची पर्वा न करणारा होता. सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यावर मात्र तो सर्वांगीण विचार करुन निर्णय घेऊ लागला. संताप आवरू लागला.
कॅस्ट्रोवर एकाधिकारशाहीचे आणि तो स्वत: हुकूमशहा असल्याचे बरेच आरोप करण्यात आले. क्यूबामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा ढोल अमेरिकेनं खूप मोठ्या प्रमाणावर वाजवला. यात काही प्रमाणात तथ्य आहे. कॅस्ट्रोच्या आयुष्यातले हे काळे डाग आहेतच, पण तो पूर्णपणे काळाही नाही.
तो वारंवार अमेरिकेला वाकुल्या दाखवत राहिला. अमेरिकेची झुंडशाही, अमेरिकेचा साम्राज्यवाद, तिची अन्यायी हाव या सगळ्या गोष्टींना तो उघडपणे विरोध करत राहिला. असं असूनही, जुन्या अनेक लढाऊ नेत्यांसारखा किंवा अलीकडच्या काळातले सद्दाम हुसेन, कर्नल गद्दाफी यांच्यासारखा मृत्यू कॅस्ट्रोच्या वाट्याला आला नाही. अमेरिकेनं कॅस्ट्रोला नेस्तनाबूद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याला ठार मारण्याच्या प्रयत्नांपासून ते क्यूबाची आर्थिक आणि राजकीय कोंडी करण्यापर्यंत अनेक गोष्टी अमेरिकेनं करून बघितल्या. कॅस्ट्रो कशालाच बधला नाही. क्यूबा नावाच्या एका छोट्याशा देशाला अमेरिकी साम्राज्यापासून स्वतंत्र करून, या देशाचं नेतृत्व तो जवळपास पाच दशकं अपूर्व धैर्यानं करत राहिला.
फिडेल च्या सरकारात चे गव्हेरा अगोदर राष्ट्रीय बॅकेचा अध्यक्ष नंतर उद्योग मंत्री झाला. त्याने एकदा भारताचा अधिक्रुत दौरा केला होता.
पुढे सगळं सोडून लॅटिन अमेरिकेतील देशांत क्रांतीची चळवळ वाढवण्याचे उद्दिष्ट होतं जे अर्धवट राहिले. बोलिव्हिया मध्ये तो मारला गेला.
क्युबा मधील क्रांती व फिडेल कॅस्ट्रो एक क्रांतिकारक व हुकूमशहा कसा होता हे ही दोन्ही पुस्तकातून समजते.
फिडेल कॅस्ट्रो ह्या अतुल कहाते लिखित पुस्तकातून फिडेल कॅस्ट्रो चे चरित्र उभे राहते तरी फिडेल चे आणि क्रांती या अरुण साधू लिखित पुस्तकातून क्युबन क्रांतीचे धागे दोरे गवसतात