हिराबाई पेडणेकर

हिराबाई पेडणेकर

 
( २२ नोव्हेंबर १८८६ - १८ ऑक्टोबर १९५१ ) 

देवदासी समाजातून आल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या नजरेतून बघितले गेले.

 गिरगावातल्या गांजा वाली चाळीत राहत असताना तिथे त्या  गाण्यांच्या बैठकीचा कार्यक्रम करायच्या ते गाणे ऐकायला नामवंतही यायचे. 

सातवी पर्यंत शिकलेल्या हिराबाईंना मराठी व संस्कृत उत्तमरीत्या येत होते. त्याशिवाय हिंदी, बंगाली, इंग्लिश या भाषांचा काही अभ्यास त्यांनी केला होता. त्या उत्तम कविताही करत असत. "मनोरंजन' आणि "उद्यान' या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यात त्यांनी "माझे आत्मचरित्र' नावाची जी लघुकथा लिहिली होती, त्यामुळे त्यांचा अधिक बोलबाला झाला.. 

हीराबाई पेडणेकरांनी लिहिलेल्या नाटकांपैकी जयद्रथ विडंबन (१९०४) व संगीत दामिनी (१९१२) या नाटकांचा विशेष बोलबाला झाला. एका पौराणिक कथानकाच्या आधारे त्यांनी जयद्रथ विडंबन हे नाटक लिहिले होते व त्यावर देवल शैलीच्या नाट्यलेखनाचा प्रभाव होता. ते नाटक व नाटकातील पदांचे नाट्यक्षेत्रातील त्या वेळच्या मान्यवरांकडून कौतुक झाल्याने एक मोठे स्वतंत्र नाटक लिहावे, असे हिराबाईंच्या मनाने घेतले ते म्हणजे, संगीत दामिनी. हिराबाईंनी लिहिलेले "संगीत दामिनी' हे नाटक कोणतीही नाटक कंपनी करण्यास तयार होईना. कारण कनिष्ठ कुलीन लेखिकेचे नाटक रंगमंचावर कसे आणावे, असा प्रश्न त्यावेळच्या प्रस्थापित नाटकमंडळींना पडलेला! शेवटी ही गोष्ट मामा वरेरकरांच्या कानी गेली. त्यांनी "ललितकलादर्श' या नाटकमंडळीचे चालक व प्रखर अभिनेते केशवराव भोसले यांना हे नाटक करण्याविषयी गळ घातली. ती भोसले यांनी मान्य केली.

हिराबाई कोणत्या कुळातल्या आहेत, हे न पाहता त्यांचे नाटक करण्याचा निर्णय घेऊन केशवराव भोसले यांनी आपले पुरोगामित्व कोणताही गाजावाजा न करता सिद्ध केले. अशाप्रकारे हिराबाई यांचे नाव महिला नाटककार म्हणून मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरले गेले. या नाटकाचे पुस्तक १ ऑक्टोबर १९१२ रोजी प्रसिद्ध झाले. हिराबाई पेडणेकर या मराठीतील आद्य महिला नाटककार, असे पूर्वी सांगितले जात असे. मात्र संशोधनाअंती  सोनाबाई केरकर या मराठीतील आद्य स्त्री नाटककार ठरल्या.

हिराबाई पेडणेकर हा मराठी नाट्यसृष्टीतील असा अाविष्कार होता की, जो काही काळच तेजाने तळपला व नंतर प्रसिद्धीच्या झोतापासून इतका दूर गेला की, त्यांची आठवणही खूप कमी लोकांनी राखली. नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याबरोबरच्या सहवासानंतर हिराबाईंनी कौटुंबिक स्थैर्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील पालशेत गावच्या कृष्णाजी नारायण नेने या गृहस्थांशी घरोबा केला. कृष्णाजी नेने यांची हिराबाईंशी पहिल्यांदा ओळख १९१५मध्ये झाली. हिराबाई यांनी आधी "नायकिण' या अर्थाने जे आयुष्य व्यतीत केले होते, अशी नेने यांची जी समजूत होती, त्या आयुष्याची सावली नेने यांना नको होती. त्यामुळे मागचे सर्व आयुष्य त्यागून एक साध्या राहणीची स्त्री म्हणून हिराबाईंनी आपल्याबरोबर आयुष्य व्यतीत करावे, अशी नेने यांनी असलेली इच्छा हिराबाईंनीही मानली.

हिराबाई पेडणेकरांच्या आयुष्यातील घटनांनी प्रेरित होऊन वसंत कानेटकरांनी "कस्तूरीमृग' हे नाटक लिहिले. त्यात अंजनी ही नायिका हिराबाईंचे प्रत्यक्ष रूप आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांनी "व्यक्तिरेखा' या आपल्या पुस्तकामध्ये हिराबाईंचे समग्र आयुष्य प्रत्ययकारी शब्दांत रेखाटले आहे.
 ( संकलित  ) 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.