📚द स्कार्लेट लेटर - नेथनिएल हाॅथाॅर्न
अनुवाद - प्रायश्चित्त - श्री. ना. पेंडसे
१८५० साली ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर नेथनिएल हाॅथाॅर्न ह्यांचे साहित्य खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मुद्रीत झालेली ही पहिली कादंबरी होती. फक्त दहा दिवसात अडीच हजार प्रती विकल्या गेल्या होत्या. द स्कार्लेट लेटर ही कादंबरी श्री. ना. पेंडसे ह्यांनी प्रायश्चित्त या नावाने मराठीत अनुवादित केली
सतराव्या शतकात राजसत्ता व धर्मसत्ता प्रबळ होती. त्यावेळी गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी सगळ्या लोकांसमोर शासन दिले जाई त्या काळातील हे कथानक.
दोन वर्षांपूर्वी हेस्टर प्रेन च्या पतीने तिला ह्या शहरात पाठवले. त्यांना इथे स्थायिक व्हायचं होतं. तो त्याची कामे संपवून मागोमाग येणारच होता पण रेड इंडियन्सच्या टोळीत अडकल्यामुळे लवकर येता आलं नाही. हेस्टर दोन वर्षे पतीपासून दुर राहीली तरी तिने बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे ती व्यभिचारी ठरली.
तिला भर चौकातील चौथऱ्यावर उभे केले गेले. कोणालाही सहानुभूती वाटत नव्हती.
धर्मगुरुंनी तिला प्रियकराचं नाव विचारलं. ती मुक राहिली. ह्या पापकर्माची शिक्षा म्हणून तिला वाळीत टाकलं. तिच्या गळ्यात लाल रंगातलं ए अक्षर सगळ्याना दिसेल असं घालून राहायचं होत. त्या गर्दीत तिचा पती तिला दिसला. तो जेव्हा तुरुंगात वैद्यकीय उपचारासाठी भेटला तेव्हा त्याने आपली ओळख उघड न करण्याचं वचन तिच्याकडून घेतलं. तिने त्यालाही बाळाच्या बापाचं नाव सांगीतलं नाही. तोच आता त्याचा शोध घेणार होता.
आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर विश्वास होता, ती व्यभिचारी नसल्याची खात्री होती.ती कोणा उच्च पदस्थाच्या दबावाला बळी पडली असेल अशी त्याची धारणा होती.
वैद्यकीय व्यवसाय करीत तो त्याच शहरात स्थिरावला तेव्हा तिला शिक्षा देणाऱ्या धर्मगुरुंची वारंवार बिघडणाऱ्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तो त्यांच्यासोबतच राहिला.
ती मुकपणे गळ्यात अडकवलेलं लाल रंगाचं ए चिन्ह शरीरावर बाळगत बाळाचं संगोपन करु लागली.वीणकाम करून ती उदरनिर्वाह करायची. आपल्या बाळाला, मुलीला मोठं करणे हेच जीवन ध्येय समजून ती तिरस्कृत, अपमानित जीवन जगत होती. तिचे वीणकाम चांगले असल्याने कामाची प्रशंसा होऊन पैसेही जास्त मिळायचे. हे जास्तीच्या पैशात ती गरजुंना मदत करु लागली. हळू हळू तिच्याबद्दल जनमानस बदलत गेलं. आता ती एक परोपकारी दयाळू स्री म्हणून ओळखली जाऊ लागली.अनैतिक वागणुकीचं प्रतिक बनलेलं, तिच्या शरिरावर अडकवलेल्या लाल रंगातील ए या अक्षराचीही ओळख वेगळी होऊ लागली.
आणि सात वर्षांनंतर तिच्या पतीला समजले. तो कोण होता...?
एकाच वेळी एकापेक्षा जास्त लोक प्रायश्चित्त घेत होते. न्यायवयवस्थेने लादलेलं प्रायश्चित्त ती घेत होती पण नियतीनेही अजून काही व्यक्तिंना ह्याच गुन्ह्याचे प्रायश्चित्त घ्यायला लावले.
सतराव्या शतकातील समाजव्यवस्थेचं, त्याकाळी समाजातील स्रीचे स्थान, धर्माचे वाढते प्रस्थ, ह्याचे परिणामकारक चित्रण दिसते.