लेखक - रंगनाथ पठारे
साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिक जगताचे वेगवेगळे प्रवाह, लेखकांची गटबाजी, नवोदित लेखकासाठी मिळणाऱ्या संधी, प्रस्थापित लेखकांची महत्वकांक्षा, राजकीय हस्तक्षेप ह्याचे परिणामकारक चित्रण ह्यात जाणवते. तत्कालीन साहित्य जगताचे हे प्रतिबिंब समजता येते.
कानवडे हा प्राध्यापक कवी. साहित्य प्रेमी असल्याने कथाकथन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, ह्याच सोबत लिहिणाऱ्या मुलांना दर रविवारी एकत्र करून लिहिलेलं, वाचलेल्यावर चर्चा घडवून आणायचा. एखद्या नवोदित लेखकाने लिहिलेल्या साहित्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगायचा. हे साहित्य संवाद ह्या नावाने नियमित होऊ लागल्यावर जिल्हा पातळीवर साहित्य संमेलन घ्यायचा विचार एकाने सुचवल्यावर कानवडेने वर्गणी जमवून प्रसंगी स्वखर्चाने ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करुन अनेक लेखकांना बोलवून यशस्वीही केले.
रावसाहेब निकम हे प्रस्थापित ग्रामीण साहित्य लेखक. ते या संमेलनात आले होते. हे जर दरवर्षी नियमित चालू ठेऊ शकलो तर व्यापक पायावर ग्रामीण साहित्याची चळवळ उभी राहील हे सांगीतल्यावर कानवडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला तयार झाला. ह्या संमेलनासाठी निधी उभा करण्याची जबाबदारीही त्यांनीच घेतल्यावर सगळी सुत्रे रावसाहेबांकडे जातांना बघून कानवडे निराश होऊ लागला.
रावसाहेब ग्रामीण साहित्यिकांचा गट बांधताहेत. ही वाड्मयीन वर्तुळातील अफवा खरी असावी असे त्याला वाटू लागले.
अशातच रावसाहेबांनी साहित्य संमेलनाचे स्थान स्वत: ठरवले नंतर कानवडेला सांगीतलं. ह्या संमेलनाची सगळी व्यवस्था गोदानगरचे आमदार बघणार होते. संमेलनाचं हे पाचवं वर्षे होतं. ह्याचं आयोजन मागच्याच वर्षी आपल्या हातातून सुटून रावसाहेबांच्या हातात गेलंय या जाणीवेने तो अजूनही निराश होतो. या संमेलनात दलित साहित्यिकांना आमंत्रण असावे ह्या त्याच्या म्हणण्याला रावसाहेबांचा विरोध होता.
्
पारनेरकर हा पत्रकार. रावसाहेबांचा विद्यार्थी. त्यांच्याच शिफारशीने नौकरीला लागलेला. ह्या संमेलनाच्या त्यांची मुलाखत घेतो. शेवटी वैयक्तिक म्हणून एक प्रश्न विचारतो, ग्रामीण लेखकांच्या घडणीसाठी आपण जो प्रयत्न करता आहात तो कोणत्या प्रेरणेने, उमेदवारीच्या काळात जो संघर्ष करावा लागला त्याच्याशी काही संबंध आहे का,
रावसाहेब त्यावेळेस हा प्रश्न टाळतात.
कथानकाच्या ओघात रावसाहेबांचा बालवयापासूनचा जीवनपटही उलगडत जातो. शाळेत असतानाच त्यांचे लेखन प्रभाव पाडू लागले होते. त्यांनी लिहिलेले निबंध शाळेच्या वर्गात वाचले जाऊ लागले. वाड्मय ह्या प्रकाशन संस्थेद्वारे त्यांचे लेखन प्रकाशित होऊ लागले त्याअगोदरचा त्यांचा संघर्ष. त्यानंतर वाड्मय शिवाय इतर प्रकाशनातून प्रकाशित होणारी त्यांची पुस्तके. मिळत जाणारी प्रसिद्धी. बदलत्या परिस्थिनुसार व मिळणाऱ्या यशामुळे त्यांचा वाढत अहंकार, नवोदित साहित्यिकांची त्यांच्याकडून होणारी हेटाळणी ह्याचसोबत त्यांची कौटुंबिक परिस्थिती. त्यांची एक बहिण, दिवसभर राबणारी, रात्री दारुड्या नवर्याचा शिव्यांसोबत मार खाणारी. काही दिवस त्यांच्या घरात राहते. पण परत जाते. मनात असुनही ते तिला आपल्यासोबत ठेवू शकले नाही ह्याची बोच.
पुढे प्रत्यक्ष संमेलनात आपापसांत झालेली खडाजंगी, आमदारांनी आपल्या भाषणात ग्रामीण साहित्यिंकावर केलेली आक्रमक टिका. आम्ही सहकाराने ग्रामीण क्षेत्रात केलेले बदल न दाखवता ग्रामीण सिहित्यिक अजुनही खलनायकी पाटील रंगवतात. संमेलनाच्या अध्यक्षांनी संयमाने दिलेले या टिकेला उत्तर...
काहींनी ग्रामीण, दलित, नागरी साहित्याच्या वेगळ्या प्रवाहाची मांडणी तर कोणी असे कोणतेही प्रवाह वेगळे न करता मराठी साहित्य म्हणून एकत्रित विचार होण्याची केलेली भलामण.
ह्या कादंबरीचा मुख्य प्रवाह साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य जगताचे वेगवेगळे चांगले वाईट प्रकार व प्रवाह, संमेलनात होणारी गटबाजी अधोरेखित करणे हाच आहे असे वाटते.