द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे -
लेखक - ऑस्कर वाइल्ड
अनुवाद वि. शं. ठकार
कला, सौंदर्यशास्र, समाजशास्त्र या विषयावरील लेखन करणारे कवी, नाटककार म्हणून ऑस्कर वाइल्ड सुपरिचित असले तरीही मुख्यतः द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे या कादंबरीचे लेखक म्हणूनच प्रसिद्ध आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडमधील सुखासीन सरदार, उमरावांच्या काळातील सामाजिक परिस्थितीत दाखवणारी ही कादंबरी १८९१ मध्ये प्रकाशित झाल्यावर तिने प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
डोरियन ग्रे दिसायला अत्यंत सुंदर असलेला विशीचा तरुण.
त्याचा मित्र असलेला चित्रकार बेसिल अत्यंत सुंदर दिसणाऱ्या डोरियन ग्रे चं चित्र काढून त्याला भेट देतो. लाॅर्ड हेन्री हा डोरियनला म्हणतो की तुझं वय वाढत राहिल पण हे सुंदर चित्राचे तारुण्य कायम राहिल. डोरियनची इच्छा ह्याच्या उलट असते. नेमकं तसच होतं..डोरियनला चिरतारुण्याचे वरदान मिळते जे त्याला त्या वेळी लक्षात येत नाही.
हेन्रीशी झालेल्या चर्चेमध्ये त्याला इंद्रिय सुखासिनतेची भुरळ पडते. त्यासाठी नैतिकते कडेही दुर्लक्ष होते. डोरियन एका नाटकात काम करणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. एका प्रयोगात अत्यंत वाईट अभिनय केल्यामुळे डोरियन तिला सोडून जातो त्यामुळे ती आत्महत्या करुन स्वत:ला संपवते तेव्हा डोरियन विव्हळ होतो..पण तेवढ्यापुरताच. तेव्हा त्या चित्रातला डोरियनचा चेहरा थोडा विद्रुप झालेला असतो.
या प्रसंगानंतर सुरू होते डोरियनची आत्मिक अधोगती…काही लोकांच्या विनाशाला, आत्महत्येला तो कारणीभूत ठरतो…व्यसनं आणि स्त्रियांच्या मोहपाशात गुरफटतो…चिरतारुण्याचा वर मिळाल्यामुळे ही अधोगती चालूच राहते…इतकी की तो बेसिलचाही खून करतो…त्याच्या या अधोगतीचे पडसाद त्याच्या चित्रावर उमटतात… काळानुसार केलेल्या प्रत्येक पापाचे परिणाम त्याच्या चित्रावर होत राहतात. त्याच्या शरीराचं वय न वाढता चित्रातल्या डोरियन चे वय वाढत राहते.आणि त्या चित्रातल्या डोरियनचा चेहरा दिवसागणिक क्रुर होत राहतो.
माणसाचं बहकणारं मन आणि त्याची सद॒विवेकबुद्धी यांच्यातला संघर्ष वाचतांना आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.ह्या कादंबरीचा शेवटही तेव्हढाच अद्भुत आहे.
वास्तवता आणि अद्भुतरम्यता, कोमलता आणि क्रौर्य याचं विलक्षण मिश्रण या कादंबरीत आहे.
मनोवास्तवाचे प्रभावी चित्रण केले असल्यामुळे ही कादंबरी स्थळकाळाच्या सीमा ओलांडून जगभर लोकप्रिय झाली.