( २० आक्टोबर १९१६ - २९ ऑगस्ट १९६९ )
हे शाहीर, कामगार पुढारी, स्वातंत्र्य सैनिक, अभिनेता असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. आचार्य अत्रे म्हणायचे, "अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोषी ह्यांची जिवंत बेरीज." यांच मुळ नाव मेहबूब शेख पटेल. त्यांना विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. इप्टा या डाव्या विचारांनी चालत असलेल्या सांस्कृतीक मंचाची प्रेरणा घेत कॉम्रेड अमर शेखांनी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली होती. यामध्ये कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, शाहीर द. ना. गव्हाणकर यांची जबरदस्त साथ लाभली. अमर शेखा यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून प्रभावी भूमिका केल्या. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कन्या मलिका अमर शेख यांनी संकलीत केलेले साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केले. ( संदर्भ - विकिपीडिया)