( १५ नोव्हेंबर १९४८ - ११ जुलै २००३ )
आपल्या कालखंडात लेखनाद्वारे तरुण पिढीला भुरळ पाडणारा किंबहुना एका पिढीला वाचतं करणारा अत्यंत लोकप्रिय असलेला परंतु दुर्दैवाने समीक्षकांकडून दुर्लक्षित झालेला लेखक.रहस्यकथा,गूढकथा,डिटेक्टिव्ह कथा,लघु कथा,एकपात्री प्रयोग,सामाजिक कथा आणि इतकेच नाही तर ऐतिहासिक कथा सुद्धा सुहास शिरवळकरांनी लिहील्या. त्यांची तीनशे पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.दारा बुलंद,मंदार पटवर्धन,फिरोज इराणी आणि बॅरिस्टर अमर विश्वास ही तर वाचकांसाठी खास लोकप्रिय पात्र होती.या पात्रांचे कोणतेही नवीन पुस्तक लायब्ररीत आले की वाचकांच्या त्यावर उड्या पडायच्या.आणि पुस्तक वाचल्याशिवाय सुहासजींच्या चाहत्यांना चैन पडत नसे.सुहास शिरवळकरांनी प्रत्येक कादंबरी लिहितांना प्रसंगांचे वर्णन इतके सुंदर केले आहे की ही व्यक्ती इतके वेगवेगळे प्रसंग कसे रंगवू शकते हे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. छोटी छोटी सुटसुटीत वाक्यरचना , संवादात्मक शैली, प्रचलित शब्दांचा वापरांमुळे त्यांचे लेखन कधीही कंटाळवाणे वाटत नसे. 'दुनियादारी' ही सुहास शिरवळकरांची सर्वात लोकप्रिय कादंबरी.ही कादंबरी कितीदाही वाचली तरी नेहमी फ्रेश वाटते. या कादंबरीवर सिनेमा ही आला आहे.
त्यांच्या समांतर या कादंबरीवर आलेली वेब सिरीज प्रचंड गाजली.
स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्या म्हणण्यानुसार “सुशिंची पुस्तके पंचवीस तीस वर्षे जुनी असूनही जी ऑडीओ बुक प्रकाशित झाली आहेत ती श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध असून, दर आठवड्याला निवडल्या जाणाऱ्या, सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या कादंबऱ्यामध्ये पहिल्या ३ क्रमांकात अग्रणी असतात.