पुस्तकाचे नाव 📚 - मुक्तांगणची गोष्ट
लेखक - अनिल अवचट
पु लं देशपांडे ह्याच्या अर्थ सहाय्यावर सुरू झालेल्या अवचट पती पत्नीनी उभ्या केलेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा हा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास...
कौटुंबिक मित्राचा मुलगा ब्राऊन शुगरच्या आहारी गेल्यावर त्याच्यावर उपचार होत असतांना या संदर्भात माहिती गोळा करून संशोधन करून अनिल अवचटांनी गर्द हे पुस्तक लिहिले. त्यानंतर त्याच्यकडे व्यसनाधीन मुलांचे पालक मदतीसाठी येऊ लागले.त्यांच्यावर उपचार होण्यासाठी त्यांच्या सायकॅट्रिक असलेल्या पत्नी सुनंदाताई या मुलांना उपचारासाठी ससुनमध्ये सायकियाट्री विभागात पाठवू लागल्या. काही दिवसातच तिथल्या डाॅक्टरांचा फोन आला. आम्हाला हे झेपत नाही, मुलं पाठवू नका.
पु लं देशपांड्यांनी एक लाख रुपये देऊन ह्या मुलांसाठी काही तरी करा असे सुचवल्यावर मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र पुण्यातील मेंटल हाॅस्पिटलच्या एका इमारतीत सुनंदाताईंनी ऊभे केले. झीरो बजेटच्या नावाखाली सरकारने हात झटकून टाकले. सुरुवातीला पु लं नी सगळी मदत केली. मुक्तांगण हे नाव सुध्दा त्यांनीच सुचवले. केंद्र सरकारची ग्रॅंट मिळेपर्यंत आर्थिक मदत पु लं कडूनच झाली.
सुरुवातीला सरकारकडून व सरकारी नौकरशाही कडून खूप त्रास सहन करावा लागला. मजेशीर गोष्ट म्हणजे काही राजकीय नेत्यांकडून तसेच काही सरकारी अधिकाऱ्यांकडून मदतीचे सहकाऱ्यही खुप मिळाले.
सुरुवातीला मेंटल हाॅस्पिटलची इमारत अगदी नाममात्र भाड्याने मिळालेली होती. तरीही एका अधिकाऱ्याने मुक्तांगणला नियमानुसार भाडे भरण्याची नोटीस पाठवली. पुलंनी शरद पवारांना पत्र पाठवताच ही नोटीस रद्द झाली.
सेक्रेटरी लेवलचे आयएएस अधिकारी खूप मदत करायचे पण क्लार्क त्यांना सांगायचं आपल्याला हे करता येणार नाही नियमात बसत नाही तिथं गाडं ठप्प व्हायचं पण त्यापुढे जाऊन जर कोणी छडा लावलाच तर तसा नियम वगैरे काही नसायचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे उघडकीला आणले तरीही क्लार्क निर्विकारच असायचा. का... तर, मुक्तांगण कडून कोणतीही चिरीमरी मिळायची नाही म्हणून नाहक त्रास देत राहायचं.
पुढे केद्र सरकारची ग्रॅंट सुरु झाल्यावर या निगरगट्ट नौकरशाहीने माघार घेतली.
रुग्ण येऊ लागले, बरे होऊ लागले अशातच शासनाने सुनंदाताईंची बदली केली तेव्हा लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी ह्यांनी आरोग्य मंत्र्यांना फैलावर घेताच बदली कॅन्सल झाली.
असे अडथळे येत जात राहिले. पण मुक्तांगण खचलं नाही.
वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्तरातील रुग्ण आले. त्याच्याबाबतीत मुक्तांगण मध्ये कोणताही दुजाभाव झाला नाही. एका श्रीमंत घरातील तरुण मुक्तांगण ने इतका प्रभावित झाला की नंतर तो तिथेच पडेल ते काम करु लागला.
तरुण किंवा कमी वयातली मुले व्यसनाधीन का होतात तर आई वडिलांच्या अपेक्षांचे ओझे, प्रेमभंग, नौकरीचं टेन्शन, रोज संध्याकाळी बाप ड्रिंक घेतो म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून....अशी अनेक कारणात दडलेली मानसिक कुमकुवता. रुग्णांची खरी परिक्षा असायची ती विड्राॅवल काळात. म्हणजे व्यसनमुक्तीच्या पहिल्या टप्प्यात. हा काळ दोन चार दिवसांपासून दोन तीन आठवडेही असू शकायचा. या काळात काही रुग्ण हिंस्र व्हायचे. त्यावेळी सगळ्यांचीच कसोटी लागायची.
व्यसनमुक्त झाल्यावर परत जातांना त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रुंसह कृतज्ञतेचे भाव असायचे. त्यासमोर कोणत्याही पुरस्काराची किंमत किरकोळ भासावी.
जे जे हाॅस्पिटल व ठाणे मेंटल मधले सरकारी व्यसनमुक्ती केंद्र बंद पडले कारण वार्डबाॅईजच रुग्णांना दारू पुरवायचे.
मुक्तांगण चा रूग्ण बरे होण्याचा दर सत्तर टक्के होता. बरे झालेले पुष्कळसे रूग्ण नवीन रुग्णांना समुपदेशन करीत. घरी गेलेल्या रुग्णांचा फाॅलोअप घेत.
सुनंदा ताईंनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले. आठवड्यातून एकदा रुग्णाला भेटायला त्याचे कुटुंबिय यायचे तेव्हा छोटेसे कार्यक्रम आखले जायचे. भुमिकांची आदलाबदली होऊन पतीने पत्नीची भुमिका करायची पत्नीने पतीची. त्यादिवशी विषय दिला होता पगाराचा पहिला दिवस. आयत्या वेळी सुचेल तो संवाद. लाथेने दार उघडून झिंगत यायचे वस्तूंची खोटीखोटी फेकाफेक करायची, तोंडाने शिव्यांचा पट्टा....बायको झालेला नवरा आजीजिने..."अहो हळू बोला शेजारी ऐकताहेत" मग त्यावर शेजाऱ्यांना एखादी शिवी ते पाहताना बाकीचे सगळे असून बेजार व्हायचे पण दर महिन्याला हे खरे घडणारे नाटक नवऱ्याला कळायचे की त्यावेळी बायकोची काय अवस्था झाली असेल. एका आई मुलाला असेच नाट्य करायला लावले मुलगा नंतर म्हणाला मला आईचे दुःख पहिल्यांदा कळले ते सांगून कळले नसते पण या काही मिनिटांच्या परकाया प्रवेशामुळे ते कळलं.
अशा नाटकांमुळे रुग्ण स्लीप व्हायचं प्रमाण कमी झालं.
एकंदरीत मुक्तांगणचा वाचन प्रवास भारावून टाकणारा आहे. व्यसनाधीन रुग्णांच्या कुटुंबियांचा छळ आणि आक्रोश वाचतांना मन पिळवटून जाते. स्लीप, रिलॅप्स झालेले रुग्ण बघून हताशाही दाटून येते.
पु लं ची दानशुरता आणि सुनंदाताई व अनिल अवचट ह्यांनी लावलेलं हे रोपटं आता विशाल वटवृक्षासारखं झालंय. मुक्तांगणची आता स्वत:ची इमारत आहे. तरीही मनातून वाटत असते... समाजाला ह्याची गरज कमीत कमी असावी.
परंतू.................