व्हाईट मुघल्स

पुस्तकाचे नाव -  📚 व्हाइट मुघल्स
लेखक - विल्यम डॅलरिंपल
अनुवाद - सुधा नरवणे



हैद्राबाद येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या रेसिडंन्सीचा अधिकारी मेजर जेम्स ऑचिल्स कर्कपॅट्रिक आणि एक घरंदाज मुस्लिम तरुणी खैरुन्निसाची खरीखुरी प्रेम कथा. 

अठराव्या शतकातील या आंतरवंशीय प्रेमकथेचा पहिला धागा  हैद्राबाद मधील एका जुन्या इमारतीत हाती आल्यावर लेखकाने शोध घ्यायला सुरुवात केली आणि चार वर्षांच्या संशोधनातून ही सत्यकथा वाचकांसमोर आणली. 

दोघांच्या वयात मोठे अंतर असुनही आणि  खैरुन्निसाचा निकाह ठरलेला असुनही खैरुन्निसाच्या आईकडूनच या प्रकरणाला खतपाणी घातले गेले. निजामाच्या दरबाराकडूनही पाठिंबा होता त्याची राजकीय कारणे वेगळी होती. अधूनमधून दोघांच्या गाठीभेटी होत होत्या. जेम्सने तिच्यावर बलात्कार केला, तिच्या मामाचा खून केला अशा अफवाही पसरल्या. कंपनी सरकारने या प्रकरणाची पुर्ण चौकशी केली तेव्हा ह्यात कसलेही तथ्य आढळले नाही. जेम्स ने मुस्लिम रितीरिवाज व पोशाख घालायला सुरुवात केली होती. मुस्लिम धर्म स्विकारून लग्नाच्या वेळी जेम्स निजामाचा दत्तक पुत्र झाला तर खैरुन्निसा पंतप्रधानांची मुलगी झाली. त्यावेळी ती पाच महिन्याची गरोदर होती. 
त्यानंतर त्यांना अजून एक अपत्य झालं. 

जेम्स कर्कपॅट्रिकला अगोदरच्या पत्नी कडून एक मुलगी होती जी इंग्लंड मध्ये होती. भविष्याचा विचार करून त्याने ह्या मुलांनाही इंग्लंडला आपल्या वडिलांकडे पाठवलं. 

दुर्दैवाने जेम्स कर्कपॅट्रिकचे आजारपणामुळे अकाली निधन झाल्यावर खैरुन्निसावर दु:खाचा डोंगर कोसळला त्यावेळी तिला हेन्री रसेलने आधार दिला. जो जेम्स कर्कपॅट्रिकचा सहाय्यक होता. पण दुसऱ्या मुलीशी लग्न करून त्याने खैरुन्निसाला एकटं पाडलं. 

खैरुन्निसासाठी नौकरी सोडण्याची जेम्स कर्कपॅट्रिकची तयारी होती. हेन्री रसेलने नौकरी टिकवण्यासाठी खैरुन्निसाला सोडलं. 

वैधव्यकाळात खैरुन्निसाला प्रथम बदनामीला तोंड द्यावे लागले‚ जेम्स कर्कपॅट्रिकने तिच्यासाठी ठेवलेल्या मालमत्तेपासून तिला बेदखल करण्यात आले. हद्दपार व्हावे लागले आणि अखेर परित्यक्तेचे जीवन कंठावे लागले. ती मृत्यू पावली ते शारीरिक विकाराने हे जितके खरे तितकेच हृदयभंग‚ उपेक्षा आणि दुःखामुळेही तिची जीवनेच्छा संपुष्टात आली असेल.
तिला मृत्यूपूर्वी आपल्या दोन्ही मुलांचे काढलेले तैलचित्र बघण्याची ईच्छा होती. जी पुर्ण होऊ शकली नाही. पुढे अनेक वर्षांनी खैरुन्निसाची इंग्लंड मध्ये राहणारी मुलगी कॅथरीनला अगदी अकल्पित रित्या हेन्री रसेलच्या घरात दिसले. ज्याला कंपनीने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकले होते. 

पुस्तकाच्या सुरुवातीलाच ईस्ट इंडिया कंपनीचे सगळेच अधिकारी व कर्मचारी अगदी कमी वयातच भारतात आल्यावर कसा वर्णसंकर झाला ह्याचे विवेचन केले आहे. त्यावेळी कलकत्त्यात चार हजार युरोपियन पुरुष तर फक्त २५० युरोपियन स्रिया होत्या. 

भारतात आलेले ब्रिटिश लोक इथल्या संस्कृतीकडे जसजसे आकर्षित झाले तसतसे त्यांनी येथील जीवनशैली स्वीकारली. येथील भाषा आणि रितीरिवाज अंगीकारले. त्याचप्रमाणे त्या काळात ब्रिटनमध्ये गेलेल्या हिंदुस्थानी लोकांनीही पाश्चिमात्य जीवनशैली स्वीकारली. स्थानिक लोकात आंतरदेशीय विवाह केले. या काळातील वांशिकता आणि कल्पना याची चाकोरी बाहेरची सरमिसळ, पेहराव आणि जीवनशैली इत्यादी विषयी फारसा कोणी विचारच केलेला नाही. 

ब्रिटिशांना इस्लामपेक्षा हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीशी जवळीक साधने कठीण गेले याचे एक कारण बहुसंख्य हिंदू धर्मीय लोक ब्रिटीशांना अस्पृश्य मानत तसेच त्यांच्याबरोबर खाणे-पिणेही निषिद्ध समजत त्यामुळे त्यांचे एकमेकांशी सामाजिक संबंध मर्यादित राहिले. पण तसे काही मुस्लिम धर्माबाबत झाले नाही. त्यावेळी अनेक ब्रिटिशांनी मुस्लिम मुलींशी लग्न केले. त्यासाठी काहींनी मुस्लिम धर्म ही स्वीकारला. 

हे पुस्तक म्हणजे फक्त जेम्स कर्कपॅट्रिक आणि खैरुन्निसाची प्रेमकथा नसून त्यावेळची सांस्कृतिक व सामाजिक सरमिसळ, राजकीय परिस्थिती, आणि मुख्यत्वे कर्कपॅट्रिक घराण्याचा तीन पिढ्यांचा इतिहास सुध्दा आहे जो जेम्स कर्कपॅट्रिकच्या वडिलांपासून जे कंपनी सरकारचे भारतातील अधिकारी होते तिथपासून त्याच्या मुलांपर्यंत पोहोचतो. जे अगदीच लहान असतांना इंग्लडला गेले होते. ईस्ट इंडिया कंपनीचे अहवाल, इंडिया ऑफिस लायब्ररी मध्ये असलेले दस्तऐवज व पत्रव्यवहार, तत्कालीन पार्शियन व उर्दू साहित्य, ह्याचा अभ्यास करून लिहिलेला आहे.  





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.