लेखक - विश्वास पाटील
काही दशकांपूर्वी एकाच वेळी संगीत, नाट्य, अभिनय, साहित्य असे चौरंगी दर्शन घडवणारी वग नाट्ये काळाच्या ओघात कमी कमी होत आता जवळपास अदृश्य होऊ लागली आहेत. संगीत नाटकासारखा गावखेड्याच्या जत्रांतून सबंध रात्र जागवणारा हा एकेकाळचा लोकरंजनाचा धमाल प्रकार.
बाहेर तंबूकनातीवर पडलेल्या चांदण्यापेक्षाही आतले फडातले चांदणे लाजवाब असायचे. अशा लोकनाट्यातून अभिनयाची उंची गाठणाऱ्या कलावंताचा खुप बोलबाला असायचा. फक्त नावावर गर्दी जमवण्याची त्यांची क्षमता असायची.. ह्या सगळ्यांचे जगणेही तेवढेच अस्थिरतेचे. प्रेम द्वेशाने भरलेली मने, विरोधी फडाच्या तमाशे पाडण्यासाठी केलेल्या युक्त्या, यशोशिखरावर असलेल्या कलावंताची पळवापळव, ह्यातच उमललेल्या प्रेमकथा.. काहींनी लगेच जीव टाकला तर काही अजरामर झाल्या.
वयाचं बंधन झुगारून फक्त कलेसाठी एकत्र आलेल्या दोन जीवांची ही कहाणी वाचकांसमोर जसजशी उलगडत जाते तसतसा वाचक गुरफटत जातो.
नायब तहसीलदार असलेल्या अर्जुनरावांना त्यांच्या आतला कलाकार शांत बसू देत नव्हता. अखेर जमीन जुमला विकून नौकरी सोडून त्यांनी तमाशाचा फड उभारला. त्यांची सोळा सतरा वर्षाची मुलगी रंगकली चार दिवस तमाशा बघायला आली आणि तमाशातच नाचू लागली. तिला बघायला गर्दी होऊ लागली. बाप लेक प्रियकर प्रेमिकाचा अभिनय करु लागले. बघता बघता ही जोडी लोकप्रिय झाली.
बाकेराव बागणीकरचा तमाशाही लोकप्रियतेच्या शिखरावर होता. लावण्या, पाचकळ विनोद वगळून तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित वग खूप लोकप्रिय होता. तो बघण्यासाठी स्रिया सुध्दा यायच्या. प्रयोग संपल्यावर सगळे लोक तुकारामांचा अवतार समजून बाकेरावाच्या पाया पडायचे.
सोळा सतरा वर्षाची रंगकली पन्नाशीच्या बाकेरावाच्या प्रेमात पडली. बापासह सगळ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. वयातील तीस वर्षाच्या अंतराने काय होऊ शकते हे ही समजवून सांगितले. तिने ऐकलं नाही. बाकेरावनेही तिला समजवलं पण तिचा हट्ट कायम होता. तिचं कलावंताचं मन दुसऱ्या महान कलावंतात अडकलं होतं. त्यापायी शरीर सुख किंवा वयातलं अंतर तिच्या दृष्टीने कवडीमोल होतं.
लग्न झाल्यावर रंगकलीच्या बापाचा तमाशा ती नसल्यामुळे हळूहळू बंद पडला. आता बाकेरावाच्या तमाशातली गण गवळण रंगकली बाकेरावाच्या ठसकेबाज संवादाने लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली.
बाकेरावचा भागीदार गगनआप्पा सगळ्या आर्थिक बाबींकडे ध्यान ठेवून होता. मलिदा ओरपत होता. खरं तर मनोमन तो बाकेरावाच्या लोकप्रियतेवर जळत होता. एकदा त्याने रंगकलीशी शारीरिक घसटही केली होती.
वास्तविक बघता बाकेराव आणि गगनआप्पाची सुरुवात रंगकलीच्या वडिलांच्या अर्जुनरावांच्या तमाशापासूनच झाली होती. ह्या दोघांनी नवा फड ऊभा करण्याची बातमी लागल्यावर अर्जुनरावांनी त्यांना मोठी मदत केली होती.
बाकेराव आता संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वग करायच्या तयारीला लागतो. स्वतः वयामुळे संभाजी महाराज शोभणार नाही म्हणून एका तरुण नटाला युवराजला बोलवतो. काही जवळचे लोक त्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. कारण आता रंगकली एका तरुणासोबत प्रेयसीची भुमिका करणार होती.
कथानकाच्या ओघातच बाकेरावचं अभावग्रस्त बालपण, त्याच्या निराधार आईची त्याला मोठं करण्याची धडपड, एका गणेशोत्सवातल्या नाटकात काम केलं म्हणून त्याच्या अनौरस बापाने केलेली हकालपट्टी, नंतर त्याने एकट्याने आपल्या सुरेल आवाजामुळे मिळवलेलं स्थान असं बाकेरावचं आयुष्य उलगडत जातं. गगनआप्पा जरी बाकेरावाच्या नावावर पैसा मिळवत असला तरीही त्याला फसवतच असतो. नंतर नंतर तो बाकेरावला कर्जांच्या विळख्यात अडकून टाकतो.
पुढे रंगकली आणि युवराजच्या एकत्रित सानिध्याने उठलेल्या वावड्या. दोघांकडून नको ते घडणं, रंगकलीचं निघून जाणं, तुकाराम महाराजांच्या भुमिकेत दुसऱ्याला उभं केल्यावर प्रेक्षकांचा राग, बाकेरावचं पुन्हा एकट्याने तमाशा उभा करणं. ह्या नाट्यात वाचक गुंतत जातं. तमाशाचा एक खेळ संपल्यावर दुसऱ्या मुक्कामी पोहचतांनाची धावपळ, लगबग, घाईगर्दी ह्यात होणारी कलावंतासोबत सगळ्यांचीच दमवणूक वाचतांना व्यवस्थापन किती चोख असावे लागते. ह्याचीही जाणीव होते.
आत्ताच्या काळात शहरी भागात तमाशा मंडळाचे नाव क्वचितच ऐकायला येते. ग्रामीण भागात अस्तित्वासाठी झगडणारे काही तमाशा मंडळ मोठ्या मुश्किलीने खर्चाची तोंड मिळवणी करतात. खरं तर लोककला जपवणूक करणारी ही तमाशा मंडळे आपले सांस्कृतिक वैभव आहे. तमाशाला आपलं आयुष्य मानणारे कलाकार म्हणजे रूढार्थाने शाळेत न जाता लोककलेचे मळे फुलवणाऱ्या बागीच्याचे माळी जणू.
तमाशाचं जग कसं असतं, तिथले कलाकार कसे जगत असतात, आपल्या कलेसाठी ते किती आणि कसे कष्ट घेतात, त्यांच्या महत्वकांक्षा काय असतात, त्यांचं कौटुंबिक जीवन कसं असतं ह्याची सामान्यांना माहिती नसते. ही कादंबरी वाचकाला ह्या लोककलावंताच्या जगाची अत्यंत जवळून ओळख करून देते.