पराभूत

सिस्टीम लाॅग आऊट करून तो स्र्कीन कडे बघत राहिला. त्याचे काही सहकारी निघाले होते, काही निघण्याच्या तयारीत होते. तो तसाच बसुन राहिला. माॅनिटरवरचा स्क्रीनसेव्हर वाकुल्या दाखवतोय असं वाटलं. माऊसला हात लावताच स्क्रीन उजळला. त्याच वेळी खांद्यावर झालेल्या स्पर्षाने त्याने वळुन बघीतले, 
अनुप होता, " चल निघू या, "
"हो." बॅग घेऊन तो उठला, अनुप सोबत चालू लागला. 
" संडेचं लक्षात आहे ना... "
" होय रे बाबा, कितीदा आठवण करून देशील. येईन मी,  नक्की  ! "
" ऑफीसमधून तू एकटाच आहे ज्याला मी माझ्या घरच्या फंक्शन ला बोलवलय. अन तु असा औपचारिक पणा  करतोय. " अनुपचा आवाज जरासा चढला. 
" अरे, साॅरी यार, वैतागलो होतो थोडा, जाऊ दे.. चल कॅंटीनला जाऊ. खाऊ काहीतरी, "  त्याने स्वत:ला सावरलं
" नो वे... मला लगेच निघायचयं. उशीरा घरी पोहोचलो तर बायको फाडून खाईल मला. शिवाय आमचे युवराज... तो ही चिडेल. "
"का " त्याने आश्चर्याने विचारलं. 
अरे, त्याच्या बर्थडे म्हणून त्याला खरेदी करायची होती. ऑफिस मुळे मला जमलं नाही, आज जाणार होते. मला घरी पोहोचायला उशीर झाला तर जी काही खरेदी केली असेल ती मला न दाखवता युवराज झोपी गेले तर सकाळी घराला  युध्दभुमीचं रुप येईल. " अनुपच्या स्वरात कौतुक ज्यास्त होतं. " त्याची समजुत घालता येईल कशीतरी. पण बायको रुसली तर... खुप अवघड होऊन जाईल यार ."

ते लिफ्टने खाली आले होते. खिशातली बाईकची चावी चाचपडत पार्कींगकडे जाता जाता अनुप म्हणाला " चल बाय, संडे परवा आहे, विसरू नकोस. "
बाय करुन तो सावकाशीने पार्कींगला आला. बाईकच्या सीट वर बसुन राहीला. घाई फक्त अनुपला होती, घरी त्याची बायको मुलगा वाट बघत होते. त्याला काहीच घाई नव्हती कारण घरी वाट बघणारं नव्हतच कोणी. 

साधारण वर्षभरापूर्वी अनुपशी ओळख झाली होती. एका सेमिनार साठी तो बॅंगलोरला गेला होता. अनुप त्याच्या कंपनीकडून आला होता. दोघेही महाराष्ट्रीयन म्हणून जवळ आले. त्या तीन दिवसात घट्ट मैत्री झाली. अनुप पुण्याचा तर तो नाशिकचा. आठ महिन्यांपूर्वी अनुप अगोदरची कंपनी सोडून त्याच्या कंपनीत जाॅइन झाला होता. अनुपला फ्लॅट बघून देण्यात , स्थिरस्थावर करण्यात त्याने खूप मदत केली होती. दोन महिन्यांपूर्वी अनुपने फॅमिलीलाही आणलं होतं. आई वडील, बायको आणि चार वर्षाचा मुलगा.. अजून भेटता आलं नव्हतं त्यांना. आता मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच अनुपच्या घरच्यांना भेटणार होता. 

अनुप त्याच्या बायकोचं कौतुक करतांना कधी थकायचा नाही. लग्नाच्या वेळी ती कोणत्यातरी शाळेत शिक्षिका होती. लग्नानंतर दोन वर्षांनी दिवस गेले तेव्हा तिने चक्क नौकरी सोडून दिली होती. तिने हे केलं, ते केलं, बाजारहाट करतांना किंवा कोणतीही खरेदी करतांना कशी घासाघीस करते, माॅलमध्ये कधीच खरेदी करीत नाही, सगळ्या नातेवाईकांनचे वाढदिवस लक्षात ठेऊन फोन करते, आई आजारी असतांना स्वतः जाऊन आई बाबा दोघांनाही जबरदस्तीने घेऊन आली. इथे त्यांची सगळी काळजी घेते. वगैरे वगैरे खूप काही सांगत राहायचा. 
हे सगळं ऐकतांना तो मनातल्या मनात खिन्न व्हायचा, कुठेतरी मंजुशी तुलना करायचा. 

आर्थिक सुबत्तेत तो मन:शांती हरवून बसला होता. 

बाईकची चावी लावतांना त्याने मोबाईल काढला. नोटिफिकेशन्स बघितले. बाबांचे दोन मिस्डकाॅल आणि मंजुंच्या मेसेज शिवाय बाकी सगळे सोशल मिडियाचे होते. 
घरी जातांना जेवण घेऊन जा. मला यायला उशीर होईल. तू जेवुन घे. मी आल्यावर बघेन. असा किंवा याच अर्थाचा मेसेज असणार होता मंजूचा. त्याने बाबांना फोन करायला प्राधान्य दिले. 
"कसा आहेस? " बाबांचे कातर शब्द कानावर पडताच न कळत तो शहारला. जवळपास दोन आठवडे त्याने फोन केला नव्हता. 
" मी बरा आहे बाबा, थोडी कामाची धावपळ चालू आहे. ओव्हर टाईमला थांबावं लागतय. आई कशी आहे.? सगळं ठिक ना..? "
खुप दिवसात तुझा फोन नाही. आज राहावलं नाही बघ. आणि आज रविवार आहे वाटलं म्हणून फोन केला. नंतर लक्षात आलं. " बाबांच शेवटचं वाक्यातले शब्द ओशाळलेले होते. त्याला कसंतरीच वाटलं. जवळपास दहा वर्षे... तो त्यांच्यापासून दूर होता. महिना दोन महिन्यातून दोन दिवस गावी जाऊन दोन दिवस राहत होता. वर्षभरातून एक दोनदा ते ही यायचे महिना दोन महिने राहायच्या तयारीने. पण आठ दिवसात कंटाळायचे. त्या आठ दिवसात एकदाही मंजू सलग अर्धा तास सुध्दा त्यांच्या समोर नसायची. आई पण वैतागायची. तो मात्र दोन दिवस सुटी घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आणायचा. त्या काही दिवसात त्याला व्यवस्थित घरचा स्वैयंपाक खायला मिळायचा. आईच बनवायची. 
"बाबा, तब्येत बरी आहे ना तुमची? "
"ठिक आहोत आम्ही दोघही, तुझीच काळजी वाटते रे...! "
" पुढच्या रविवारी येतो मी. थांबणार नाही लगेच निघेल. "
"कशाला वणवण करतो. असा घाईने येण्यापेक्षा न आलेला बरा. ठिक आहे, ठेवतो मी. रविवारी करतो परत मग बोलू निवांत. "
फोन कट झाला. 

बाबा पंचाहत्तरीत होते. अजूनही काटक होते. चार वर्षांपुर्वी त्यांची एक्काहत्तरी साजरी केली होती. सगळे नातेवाईक बोलवले होते. किती प्रसन्न दिसत होते दोघेही. त्या कार्यक्रमातही मंजुने नातेवाईकांशी बोलण्यात जितका वेळ घालवला होता त्याहीपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्यात घालवला होता. काही मित्र, मैत्रीणींचे, पुष्कळसे तिच्या ऑफिसचे. 
मंजुचा मेसेज बघून त्याचा अपेक्षा भंग झाला नाही. त्याने बाईक स्टार्ट केली. 

शाळेत असतांना तो फार हुशार वगैरे नसला तरी अभ्यासात बरा होता. घरच्या परिस्थितीमुळे नेहमीच त्याला सेकंड हॅन्ड पुस्तकांवर अभ्यास करावा लागला होता. जोपर्यंत सगळे काका एकत्रित होते  तोपर्यंत फारसं काही वाटलं नाही पण वाटण्या झाल्यावर मात्र आई-वडिलांना फार काटकसर करावी लागत होती. वावर आकसलं होतं. भावांचे मदतीचे हात सुध्दा. दिवाळीला एक नवा ड्रेस आणि शाळा सुरू झाल्यावर एक ड्रेस. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेल्यावर मात्र मामा त्याला तो जे मागील ते घेऊन द्यायचा, खेळणी कपडे वगैरे...  तो कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला पहिला मोबाईल मामाने घेऊन दिला होता. 

जसजसा तो मोठा होत गेला तसतशी त्याला आर्थिक परिस्थितीची जाणीव व्हायला लागली. पैशाची किंमत कळायला लागली. शेतीचे उत्पन्न अत्यंत बेभरावशाचं असायचं, त्यामुळे मित्राकडे आहे म्हणून मलाही हवे हा हट्ट त्याने बंद केला. 
त्याच्या मित्राच्या घरी अभ्यासाला जाणं त्याला सोयीस्कर वाटायचं. तो जे गाईड्स वगैरे घेऊ शकत नव्हता. ते सगळं मित्राकडे होतं. अधे मधे चहा, खाणं मिळायचं ते वेगळं.त्याचा काॅलेजमध्ये जाणारा मोठा भाऊ रमेशदादा सुटीच्या दिवशी घरी असला म्हणजे त्यांना अभ्यासाला मदत करायचा. तालुक्यात काॅलेज करतांना एका अकाउंटंट फर्म मध्ये पार्ट टाईम काम करायचा. ह्या दोघांशी सहज गप्पा मारत जगात काय चाललय, आपण काय करायला पाहिजे हे समजावून सांगायचा. अधुन मधून एखादं माहितीपर उद्बोधक छोटेखानी पुस्तक वाचायला द्यायचा. व्यवस्थित शिक्षण घेतलं तरच तुम्ही जगात टिकाल हे गळी उतरवायचा. त्यामुळे ह्याने अभ्यासाशिवाय इतर गोष्टी सोडून दिल्या. त्या वर्षी पहिला नसला तरीही शाळेत तो तिसरा आला आणि एस एस सी च्या परीक्षेत बोर्डात चमकला. 

शाळेच्या सुट्यांमध्ये रमेशदादाच्या सल्ल्यानुसार त्याने काॅम्प्युटर क्लास लावला होता. त्यामुळे तालुक्याच्या शहरात काॅलेजला जाऊ लागल्यावर लगेच रमेशदादाने त्याला स्वावलंबी बनवलं आता तो वेगवेगळ्या फर्मचे अकाउंटचं जाॅबवर्क करायला सुरुवात केली होती. काम भरपूर प्रमाणात वाढलं होत म्हणून त्याला मदतनीस पाहिजे होता. रमेशदादाला मदत करतांना अकाउंटचं काम शिकायला मिळालं. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्याचा काॅलेज शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न मिटला. याहुनही मोठी गोष्ट म्हणजे आता तो आत्मविश्वासाने वागू लागला. अगोदरचा बुजरेपणा नष्ट झाला. आयुष्याला निश्चित अशी दिशा मिळाली होती. शिक्षण घेतल्याशिवाय प्रगती होणार नव्हती. प्रगती शिवाय पैसा मिळणार नव्हता. 
" मी साॅफ्टवेअर इंजिनिअर बनणार. तुझ्यासाठी एक मस्त  अकाउंटचं एप्लिकेशन बनवीन. आणि आई बाबांसाठी मोठ्ठ घर..." रमेशदादाने त्याच्या पाठीवर थाप मारली. 
स्वतः केलेली कमाई आणि मिळालेल्या स्काॅलरशिप तो जेव्हा साॅफ्टवेअर इंजिनिअर बनला तेव्हा बाबांनी गावभर पेढे वाटले होते. पण त्याने अगोदर रमेशदादाचे पाय धरले. अडिअडचणीच्या प्रसंगात त्याला मोठा आधार वाटायचा रमेशदादाचा. नंतर देवाच्या पाया पडून आई बाबांच्या पाया पडला होता. 

पहिल्या नौकरीसाठी जास्त वणवण करावी लागली नव्हती त्याला. त्याच सुमारास बहिणीचं लग्न ठरलं. एकदम धुमधडाक्यात नसलं तरीही बाबांनी व्यवस्थितपणे सगळं केलं होतं. त्याचाही मोठा हातभार लागला असल्यामुळेच बाबांनी हात आखडता घेतला नव्हता. 

त्यानंतर काही दिवसांनी तो नेहमीप्रमाणे ऑफीसला गेला तेव्हा त्याच्या इनबॉक्स मध्ये त्याला धक्का देणारा मेसेज होता. 
काॅस्ट कटिंग म्हणून कंपनीने बराचसा स्टाफ कमी केला त्यात तो ही होता. एक महिन्याने तो बेकार होणार होता. त्या विमनस्क अवस्थेत परत घरी येत असतांना त्याचा एक्सीडेंट झाला. विचारांच्या नादात एका कारचा धक्का लागला. कार वाला भला माणूस होता. ताबडतोब हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेला. हात मोडण्यावर निभावलं होतं पण ऑपरेशन करावं लागलं. आठ दिवस हाॅस्पिटलमध्ये राहावं लागलं होतं. आई बाबा ताबडतोब आले होते. सोबत रमेशदादासुध्दा होता. नौकरी सुटलेली, शिल्लक संपत आलेली.., मेडिक्लेम होता म्हणून हॉस्पिटलच्या खर्चाचा ताण फारसा जाणवला नाही. 

त्या आठ दिवसात भरपूर वाचन, चिंतन मनन करण्यात त्याने वेळ घालवला. हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आई बाबा त्याला घेऊन गावी आले. येण्यापूर्वी त्याने एक एफडी मोडली. दोन एक महिन्यात नौकरी मिळाली नसती तर अजून राहिलेल्या एफडी मोडाव्या लागणार होत्या. 

रमेशदादाशी चर्चा करतांना पुर्ण विचाराअंती त्याने रमेशदादानेच जुळवून आणलेल्या लग्नाच्या प्रपोजलला नकार दिला. शिक्षिकेला असा कितीसा पगार मिळणार होता.... ? 
रमेशदादाने त्याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला होता, फार चांगली माणसं आहेत, तिला मी लहान असल्यापासून बघतोयं, अशी मुलगी कदाचित परत भेटणार नाही. वगैरे वगैरे... आयुष्यात पहिल्यांदा त्याने कशाही साठी रमेशदादाला ठामपणे नकार दिला होता. खरं तर रमेशदादाने दोघांची भेट घडवून आणली होती. मुक्तपणे चर्चा करण्याची, मनातल्या कल्पना व्यक्त करण्याची संधी दिली होती. ती गेल्यावर कितीतरी वेळ तिचा नादमय आवाज कानात रुंजी घालत होता. हाॅस्पिटलमध्ये रिकाम्या वेळात त्याने आयुष्याबद्दल जे काही ठरवायचं त्यात पैसा फार महत्वाचा होता. आवाज नाही. 

त्याने वेगवेगळ्या कंपन्यांना रिझ्यूम पाठवायला सुरुवात केली. डिग्री आणि अनुभवाच्या जोरावर त्याला मुंबईत एका मल्टीनॅशनल कंपनीत लागला. चौकस बुध्दी, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तो आता कंपनीसाठी महत्वाची ऍसेट झाला होता. अनेकदा विदेशी ही जाऊन आला होता. गावी आई बाबांसाठी मोठं घर बांधलं होतं. 

मुंबईच्या मल्टीनॅशनल कंपनीत नौकरी लागल्यावर दिड वर्षात त्याचं लग्न मंजुशी झालं. त्याच्या बहिणीच्या सासरकडच्या दुरच्या नात्यातली ननंद. चांगली शिकलेली होती. मुंबईतच एका साॅफ्टवेअर कंपनीत नौकरीला होती. दिसायलाही छान होती. तिचं  सॅलरी पॅकेज चांगलं होतं हे महत्वाचं ठरलं.


सुरुवातीचे काही महिने फार व्यवस्थितपणे गेले. आई बाबा आल्यावर काही वेळा एखादा दिवस ती सुटी टाकून घरी थांबायची. त्यांना हवं नको बघायची. पण लवकरच सुट्या मिळेनाशा झाल्या. तो मात्र सुटी घ्यायचाच. आईबाबांना बाहेर फिरायला घेऊन जायचा. नंतर नंतर आईबाबांच्या मुक्कामाचे दिवस कमी कमी होत दोन भेटींमधलं अंतर वाढत गेलं. ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या वाढत असल्यामुळे त्यालाही कमी वेळ मिळायचा. त्यामुळे त्याने जास्त चौकश्या केल्या नाही. मंजुची आईबाबांच्या प्रती वर्तणूक बदलत चालली आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. 

दोन वर्षांनी जेव्हा मंजूने तिच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितले तेव्हा तो हरखून गेला. काय करू काय नको असं त्याला झालं होतं. रात्री खूप उशीरापर्यंत तो मंजूशी भविष्यातल्या योजना रंगवत होता. " 
हवं तर नौकरी सोडून दे आत्ता, बाळ जरा समजदार झालं की परत दुसरी एखादी नौकरी मिळेलच की"
"अशी नौकरी आणि असं पॅकेज परत मिळणार नाही. त्यामुळे नौकरी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. हा.. दोन तिन महिन्याची सुटी काढू शकेल फारतर... "
त्याचा थोडासा हिरमोड झाला होता पण अजून वय आहे तोवरच करीअर आहे ह्याची जाणीव ठेवून मंजुच्या महत्वकांक्षा पुर्ण होवु द्यायच्या असं त्याने ठरवलं. 

पुढच्या काही दिवसातच स्कुटरवरुन पडण्याचं निमित्त झालं. पाय फ्रॅक्चर झाला. आणि पोटलाही मार बसला होता त्यामुळे अबाॅर्शन करावं लागलं. त्यावेळी कंपनीच्या कामासाठी तो काही दिवसांसाठी चेन्नईला गेला होता. 
बाळाच्या आठवणीतून  सावरायला दोघांनाही वेळ लागला होता. 

त्यानंतर त्याने फ्लॅट विकून रो हाऊस घेतलं. शिफ्टिंगच्या वेळी सगळी कागदपत्रे लावतांना कपाटाच्या तळातील कप्प्यातली फाईल त्याच्या हाती लागली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. रागाच्या भरात त्याने मंजूला फोन लावला. ती मिटींगमध्ये बिझी असल्याचा मेसेज मिळाल्यावर आईला फोन करून जे घडलं होतं, किंबहुना मंजुने जे घडवून आणलं होतं ते सगळं सांगीतलं. ऐकल्यावर आईला मोठा धक्का बसला होता पण ती समजवत राहीली. कधी न कधी तिला तिची चुक उमजेल.. 

मंजु स्कुटरवरुन पडली बिडली नव्हती. तिला आई व्हायचच नव्हतं. मैत्रिणीच्या नातेवाईक डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलमध्ये हे घडवून आणून त्याची फसवणूक केली होती. 
शांत व्हायला फार प्रयास करावे लागले होते. मनात असूनही केवळ आईने समजावले म्हणून त्याने हे मंजूला कळू दिले नाही. घटस्फोट द्यायच्या विचारात होता तो. ती प्रमोशनच्या पायऱ्या वेगाने चढत होती. 

दोन वर्षे झाली होती. एका घरात असुनही ते दोघे सोबत नव्हते. मंजू स्वतःच्या विश्वात रममाण होती. तो मनातल्या मनात चडफडत होता. फक्त आणि फक्त आईसाठी म्हणून तो आलेला दिवस ढकलत होता. असं कुठपर्यंत चालणार ह्याची कल्पना नव्हती. 


हातातलं गुलाबी कागदात गुंडाळलेला प्रेझेंट बाॅक्स सांभाळीत तो अनुपच्या फ्लॅट समोर आला. आतून पोरांच्या मस्तीचा आवाज येत होता. 
"तिथेच काय घोटाळतो आहे.. ये.. आत ये..! "
अनुप त्याला बघून ओरडत पुढे आला. "एकटाच आलास, वहिनी नाही आल्या..? "
"ती मिटींगमध्ये अडकलीय. त्यामुळे नाईलाज झाला." तो ओशाळवाणं हसत म्हणाला. 
आत मध्ये लहान मुलांची गर्दी होती. मोठी माणसं कोणीच दिसत नव्हते. 
"चल, आतल्या रुम मध्ये, बाबांशी ओळख करुन देतो." म्हणत अनुप त्याला आतल्या रुम मध्ये घेऊन आला. 
"आई, काही पाहिजे असेल तर मला आवाज द्या. तुम्ही पलंगावरून खाली उतरायचं नाही. "
दुसऱ्या रुम मधून आलेला आवाज त्याला थोड विचलित करून गेला. कुठेतरी ऐकल्यासारखा. 

अनुपच्या बाबांजवळ दोन जण बसलेले होते. त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे होते.त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर अनूप म्हणाला,  "युवराजांच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रांशिवाय इतरांना बोलवलच नाही. पोरांना मनसोक्त धिंगाणा घालता यावा म्हणून आम्ही आत बसलोय. शिवाय इथे माझे कोणी नातेवाईकही नाहीत. " असं म्हणत त्याने त्याच्या बायकोला हाक मारली. पाण्याचा ट्रे हातात घेऊन येणऱ्या अनुपच्या बायकोकडे बघताच तो मनातल्या मनात चरकला. 
"पाणी घ्या भाऊजी. आणि एकटेच आलात का ? वहिनींना का नाही आणलं? " मन मोकळे हसत तिने विचारलं. 
त्याच्या चेहऱ्यावर औपचारिक हास्याचा मुखवटा होता पण आतल्या आत तो कोसळत राहिला.. 
ही तिच होती. ज्या कुटुंबाला रमेशदादा चांगलं ओळखत होता. त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी रमेशदादाने एका हाॅटेल मध्ये त्यांची गाठ घालून दिली होती. 

दोन तासांनी तो अनुपच्या घरातून निघाला. तेव्हा त्याच्या मनात खळबळ माजलेली होती. हे दोन तास अत्यंत तणावात गेले होते. आयुष्यात आपण ह्यापूर्वी भेटलो आहोत हे तिने जाणवू दिलं नव्हतं. कदाचित विसरली असेल. मग त्यानेही ओळख दाखवली नाही. मनातल्या भावनांचं कोणालाही मागमूस लागू दिला नव्हता.   

आता बाहेर आल्यावर मात्र चेहऱ्यावरचा मुखवटा गळून पडला होता. आता जो चेहरा दिसत होता तो मर्मघात होऊन पराभूत झालेल्या एका स्वप्नाळु योध्याचा. ज्याची जीवनासक्ती कोणी तरी शोषून घेतली होती. 































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.