दशोराज्ञ

पुस्तकाचे नाव - दशोराज्ञ
लेखिका - डॉ. क्षमा शेलार

डॉक्टर, आपण सर्वच बाबतींत दशोराज्ञ उत्तम लिहिलं आहे. असा क्लिष्ट विषय अन् त्याला हात घालण्याचे धाडस करून या वैद्यकीय पेशातल्या व्यक्तीने त्रेतायुगाची आणि ऋग्वेदाची सर्जरी करून ज्या सर्जनशीलतेनं लिहिलं आहे, त्याला तोड नाही....... ! 

अशोक समेळ


ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात काही मोजक्या ऋचांमध्ये उल्लेख असलेलं ‘दाशराज्ञ युद्ध’ यावर ही कादंबरी बेतलेली आहे. ताम्रयुग आणि लोहयुग ह्यांच्या संधिकालातलं हे महायुद्ध आहे. ॠग्वेदातला काही त्रोटक उल्लेख सोडला, तर त्याचे संदर्भ फारसे आढळत नाहीत. हे आहे भारतीय इतिहासातील पहिलं ज्ञात महायुध्द ! 

यात जी गोष्ट आहे, ती पंचनद प्रदेशातल्या राजा सुदासाची आणि त्याची पत्नी सुदेवीच्या प्रजाहितदक्ष पणाची, युध्दकौशल्याची. गर्वोन्मत्त , तामसी, अहंकरी ऋषी विश्वामित्र तर क्रोध, अहंकार ह्यावर विजय मिळवणारं आणि ब्रम्हतेजाने अवघ्या आर्यावर्ताला दिपवून टाकणारे ज्ञानी ऋषी वसिष्ठ यांच्यामधला संघर्ष. 

पंचनद राज्यातील प्रजाजन वसंतोत्सव साजरा करीत असतांना ऋषी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली अश्वमेध यज्ञाचे आयोजन यशस्वी रीत्या पार पडले. यज्ञाच्या प्रभावाने सगळे वातावरण शुचिर्भूत आणि सुस्नात झाल्यासारखे पवित्र वाटत होते. उजळून गेले होते.

यज्ञसमारंभाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विद्वान-विद्वतींचा वादसंवाद आयोजित केला होता. ज्ञानविश्वात ध्रुव ताऱ्याप्रमाणेच अढळ स्थान असणारे भृगु, अंगीरस, अत्री, जमदग्नी ह्यांसारख्या समस्त ऋषिश्रेष्ठांच्या उत्तमोत्तम शिष्यांनी तिथे वर्णी लावली होती. तसेच ‘वादे वादे तत्वबोधः जायते।‘ ह्या उक्तीप्रमाणे त्या वादविवादातले ज्ञानकण वेचण्यासाठी जिज्ञासूंनी प्रेक्षागृह खच्चून भरले होते. राजा सुदासचे पीता वयोवृद्ध दिवोदासांच्या इच्छेनुसार शास्त्रार्थाचे आचार्यपद वृध्द वसिष्ठ भूषवत होते. खरे तर वसिष्ठाचे वर्चस्व मान्य करणे विश्वामित्रांना अंतर्यामी कठीण जात होते, परंतु केवळ दिवोदासांचा मान राखायचा म्हणून विश्वामित्र मौन होते.

आणि या महासभेतील चर्चेत ऋषी वसिष्ठ पुत्र शक्ती ने वादविवादात ऋषी विश्वामित्रांना निरुत्तर करताच शास्त्रार्थ  मनाविरूद्ध घडल्याने संतापलेल्या अवस्थेत ते त्यांच्या शिष्यवृंदासह आपल्या स्थानी निघून गेले होते.नंतर राजा सुदासने ऋषी विश्वामित्रांची माफी मागून त्यांचा क्रोध शांत केला होता. विश्वामित्रांच्या आणि आपल्या विचारधारेत खूप मोठा फरक होत होता, हे त्याला आधीही अनेकदा जाणवले होते. ते आपल्या साम्राज्य विस्ताराच्या महत्वाकांक्षेच्या आड येऊ शकतात असे वाटत होते. अशातच त्या दोघांमध्ये एकदा भर सभेत झालेल्या वादात संतापी ऋषी विश्वामित्रांकडून राजा सुदासचा घोर अपमान झाला. राजा सुदासने पुरोहित पदावरून ऋषी विश्वामित्रांची मुक्तता करून त्या पदावर ऋषी वसिष्ठांची नेमणूक केली. हा अपमान मात्र ऋषी विश्वामित्रांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, ते राजा सूदासला त्यांची क्षमायाचना करण्यास भाग पाडणार होते, त्यासाठी ते पंचनद राज्यावर आक्रमण करणार होते. यासाठी त्यांनी दहा राजांना उद्युक्त केले होते. त्यापैकी दोघे राजा सूदासची पत्नीचे बंधू होते. 

मग सुरु होतो दोन विषम शक्तिंमधला थरारक संघर्ष. राजा सुदासचं सैन्य होतं सहा हजार तर ऋषी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली लढणाऱ्या दहा राजांचे सैन्यबळ होते सहासष्ट हजार.. संख्या आणि सामर्थ्य दोन्ही बाबतीत कमतरता असलेल्या सुदासने शरणागती पत्करणं यातच शहाणपण होते. परंतु राजा सुदास क्षत्रिय असल्याने लढणं त्याचा धर्म होता. आणि तो अत्यंत स्वाभिमानी व शक्तिशाली होता. 

फार पूर्वी रामायणाच्याही काही हजार वर्षांपूर्वी झालेलं या युध्दाबद्दल जनमानसात अगदी तोकडी किंबहुना काहीच माहिती नाही. मूळ संदर्भ अतिशय कमी असूनही कल्पना आणि सत्य एक विशिष्ट संतुलन राखत एक एक घटना वाचकांच्या समोर येतात. उत्सुकता वाढवणारं वेगवान कथानक वाचकाला गुंतवून ठेवतं. भाषाशैली आकर्षक असून शब्दभांडार अगदी शुध्द आहे. जे कालसुसंगत वाटते. 












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.