तंतू

पुस्तकाचे नाव - 📚 तंतू 
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास तीन दशकाचा कालपट या कादंबरीत व्यापलेला आहे. लेखकाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतांना स्वतंत्र भारताचे जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नभंगांच्या वेदना ह्यात अधोरेखित होतात. 

स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत जाणारे राहणीमान, ढासळती नितीमत्ता, राजकीय वरदहस्ताने होणारा भ्रष्टाचार, ह्याचे जळजळीत चित्रण केले आहे. 

रविंद्र एक इंग्रजी वृत्तपत्राचा संपादक. त्याच्या मूळ गावी एका मंदिरात तीन मूर्ती चोरीला गेल्याची बातमी समजल्यावर तो स्वतःहून चौकशीसाठी म्हणून आपल्या गावी जातो तेव्हा त्याला समजते की  तो लहान असताना त्याच्या आजोबांनी गावासाठी जमीन दान देऊन त्यावर दवाखान्याची इमारत बांधून दिली होती. त्यावेळी तसा शिलालेख सुध्दा होता. पण आता शिलालेखानुसार आरोग्य मंत्री व स्थानिक खासदारांनी ही हाॅस्पिटलची इमारत लोकार्पण केली होती. हे दान रविंद्रच्या आजोबांनी केलेलं आहे हे गावातील जुन्या जाणत्या लोकांना माहीत असूनही कोणीही विरोध केला नाही कारण सत्तेवर असलेल्यांशी वैर कसे घेणार.... 
रविंद्र विषण्ण होतो. तिथे त्याचा जुना मित्र भेटतो जो गुरुकुल पध्दतीने सेवाभावी शिक्षकांच्या शाळा चालवत असतो. 
रविंद्रचा मुलगा शाळेत मित्रांसोबत चोऱ्या करतांना, बार मध्ये कॅब्रे बघतांना पकडला जातो तेव्हा रविंद्र मुलाला ह्याच शाळेत घालतो. 
ह्या शाळेसाठी ज्यांनी जमीन दान दिली होती त्यांच्या आमदार मुलाला आता ही जमीन परत पाहिजे म्हणून तो हेतूपुरस्कर त्रास देत असतो. शाळेच्या संगीत शिक्षकाला विनाकारण मारहाण होते. 
याबाबत रविंद्र लेख लिहून आवाज उठवतो तेव्हा त्याला अनेक राजकीय नेत्यांचे "समजावण्याचे" फोन येतात. 

अशा प्रसंगातून वाचकाला बदलत्या काळाची चाहूल लागते. 

रविंद्रची पत्नी कांती दिल्लीला जाते. सरकारी नौकरीत असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने गारमेटचा व्यवसाय सुरू करते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांच्या मागण्या पुरवाव्या लागतात. मोठी ऑर्डर मिळवण्यासाठी एकाशी आलेले शरीर संबंध हे त्यावेळची अनैतिकता दाखवतात. 

रविंद्रचा मुलगा काॅलेजमध्ये जातो तेव्हा कांतीने दिलेल्या भरपूर पाॅकेटमनीमुळे तो वाहवत जातो. रविंद्र पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करतो पण न ऐकता ती मुलाला मोटरसायकल घेऊन देतो. पुढे तो मुलींच्या प्रकरणात अडकतो तेव्हा त्याची आई पैसे देऊन त्याला सोडवते आणि परदेशी पाठवते. 

आता रविंद्रवर बातम्या प्रसिद्ध करतांना सरकार विरोध सौम्य करण्याच्या सूचना मिळतात. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा हा संकोच बघून तो नोकरी सोडण्याचा विचार करतो कारण त्यांच्या राष्ट्रीय संपादकाने अगोदरच याच कारणाने नोकरी सोडून दिलेली असते. 

राजकारणाबरोबरच संगीत, शिक्षण, पत्रकारिता, व्यापार व्यवसाय वगैरे कितीतरी क्षेत्र कवेत घेऊन हे कथानक समकालीन कथा वास्तूला कलात्मक पातळीवर घेऊन जाते आणि थाबते ते आणिबाणी घोषित झाल्यावर. रविंदसह त्याचे अनेक समविचारी मित्र मंडळी जेल मध्ये असते. 

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, आयुष्य उधळवले त्यांच्या वेदना, देशासाठी, समाजासाठी धडपडणारे काही ध्येयवादी जे आपल्या परीने बदलवण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांची होणारी कुचंबणा, बदलत्या सामाजिक जाणीवा, कौटुंबिक नातेसंबंधांची कोलमडून पडणारी चौकट, जातीभेद, राजकीय एकाधिकार शाही, त्यातून निर्माण होणारे भ्रष्टाचारी, ऐहिक उपभोगासक्त तरुण वर्ग, स्वत:ला मुक्त समजणारी स्री ह्या सगळ्याचा या पटावर ठसठशीतपणे आलेख आहे. मानवी स्वभावाचे अनेक पैलू व कांगोरे आपल्याला उलगडत जातात. 

आत्ताची परिस्थिती बघता असे वाटते की, एक आवर्तन पुर्ण होते आहे. 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.