मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करणारे मधुकरराव कवी आणि ललित निबंधकारही होते. ‘एक घोडचूक’ या लेखसंग्रहात ते म्हणतात, ‘व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने वगैरे लिहीत असतानाच काही प्रकारचा उपद्व्याप मी अधूनमधून केला. आपल्यातल्याच काहींनी त्या प्रकाराला वात्रट लेखन हे नाव दिले.त्यांचे तीन कवितासंग्रह महाराष्ट्र सरकारची बक्षिसे लागोपाठ पटकावून गेले. ‘वंदे वंदनम्’ या त्यांच्या लेखसंग्रहातील पैसा कसा खावा, माझे मंत्रिमंडळ, मुंबईतील बशी, वंदे मास्तरम् हे लेख विनोदी व रोजच्या अनुभवविश्वातले असून वाचकाचे सहज मनोरंजन करतात.
केचे यांची कविता दुर्बोध व जटील नसून साधी, सौम्य व सहज आहे. ओवी, अभंग या पारंपरिक छंदांचाही त्यांनी वापर केला आहे. विदर्भातील गावे, माणसे आणि तिथल्या परिसराचे मार्मिक निरीक्षण खास वैदर्भी बोलीतून प्रस्तुत केले आहे. ‘पुनवेचा थेंब’ व ‘आसवांचा ठेवा’ यांतील कवितांमध्ये प्रतिमांचे नाविन्य आहे.‘दिंडी गेली पुढे’ (१९५९) हा पहिला कवितासंग्रह होय. संतांच्या कवितेचे संस्कार असूनही त्यांच्या कवितेत आधुनिक मानवाची निराशा, ईश्वराविषयी शंकाकुलता, ऐहित प्रेरणांशी चालेलला संघर्ष या गोष्टी अधोरेखित होतात.
‘पालखीच्या संगे’ (१९६५), ‘आखर आंगण’ (१९६७), ‘एक भटकंती’ (१९६८), ‘एक घोडचूक’ (१९७३), ‘वंदे वंदनम्’ (१९७९) हे ललित निबंधसंग्रह; ‘चेहरेमोहरे’ (१९६९), ‘वेगळे कुटुंब’ (१९६५) हे व्यक्तिचित्रसंग्रह; ‘झोपलेले गाव’ (१९७८), ‘माझी काही गावं’ ही प्रवासवर्णने, आणि ‘मोती ज्यांच्या पोटी’ ही कादंबरी असे साहित्य त्यांच्या नावावर आहे. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)