पुस्तकाचे नाव - भंडारभोग
लेखक - राजन गवस
लोकसंस्कृतीच्या नावावर आजही आपल्या समाजात श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा जास्त पसरवली जाते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी व्यक्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ राजन गवस यांनी चौंडकं या कादंबरी द्वारे मांडल्यानंतर एका जोगत्याची होरपळ त्यांनी भांडारभोग या कादंबरीतून मांडली आहे.
देवदासी प्रमाणे जोगते ही देवाला सोडलेले असतात.
आजारपणामुळे मारायला टेकलेला तायाप्पा गावातील डॉक्टरांच्या वैद्यांच्या औषधोपचाराला त्याचा आजार दाद देत नसल्यामुळे त्याच्या काळजीपाई हवालदिल झालेले त्याचे कुटुंबीय "बाहेरचं" काही झालंय का हे बघण्यासाठी डोंगरावरच्या देवी यल्लमाच्या भक्तापर्यंत पोहोचतात. आणि तायाप्पाच सगळं आयुष्य बदलून जातं.
जोगत्या झाल्यावर पायाच्या अंगावर पातळ चोळी केसांचा अंबाडा गळ्यात कवड्यांची माळ त्याला बंधनात बांधून टाकल्यासारखं वाटतं.सुरुवातीला लाज वाटते म्हणून घराबाहेर न पडणारा तायाप्पा नंतर काही जोगतींनीसोबत जोगवा मागत फिरु लागतो. पुढे पुढे तायाप्पा नव्या जीवनाच्या शैलीत ढळत गेला. रोज जोगवा मागणं, जोगे जो व्यक्तींच्या मळ्यात मिसळणे हे इतके नित्याचे झाले की तो घरादारापासून दूर होऊ लागला. हातात परडी घेऊन जोगवा मागणारा तायाप्पा एका नव्या विश्वात रममान होत होता.
हळूहळू स्त्री वेशधारी तायाप्पा आपले पौरुषत्व गमावू लागतो.लग्नकार्य पूजा समारंभ अशा कार्यक्रमात तायप्पा एक नाच्या म्हणून समोर येतो. हे सर्व चालू असतानाच तायप्पाची भेट मोरे मास्तरांशी होते. ते जोगते, देवदासी यांच्या भल्यासाठी, मदतीसाठी झटत असतात. तायप्पाच्या मदतीने ते सगळ्यांना संघटित करून त्यांना उतारवयात सरकारी मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करतात. पण सगळे व्यर्थ जाते. सगळेजण तायप्पावरच उलटतात. त्याला शिव्या शाप देतात. एका जोग्याचा मृत्यू तायप्पाला या घटनांमधून बाहेर काढतो. ज्या प्रवाहात आपण आहोत तोच प्रवाह म्हणजे जोगते आणि जोगतीनी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देतात हे समजून चुकते.
देवदासी ही कोणाच्यातरी आधाराने किंवा कोणाची रखेल बनून राहू शकते, पण जोगत्याचे तसे नाही . देवदासी मेली तर तिच्या प्रेताला खांदा मिळतो, देवाची दासी म्हणून लोक तिच्या मयतीला येतात. पण जोगत्याची कहाणी वेगळी आहे. त्याला प्रेताला खांदेकरी माणूस म्हणूनही कठीण. मेल्यावरही त्याच्या प्रेताला कायमचा अंधारच असतो.