वि. स. खांडेकर

विष्णु सखाराम खांडेकर 


 प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि स‌मीक्षक. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा स‌मावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत.



 तेजस्वी कल्पनाशक्ती आणि तल्लख विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली आलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली. मराठी कादंबरीला तंत्रमंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय  ना. सी. फडक्यांबरोबर खांडेकरांनाही दिले जाते. मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगांनी स‌मृद्ध व संपन्न केले. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषांत– विशेषत: गुजराती, तमिळ, हिंदी ह्या भाषांत– अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी, रशियन व चेक ह्या भाषांतून झालेली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. अनेकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. १९६१ मध्ये त्यांच्या ययाति  ह्या कादंबरीस महाराष्ट्र स‌रकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. ह्या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते. 

१९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९५७ साली मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांस मिळाले. १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांस ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. १९७० मध्ये त्यांस साहित्य अकादेमीचे फेलो नेमण्यात आले. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.