प्रभा गणोरकर

प्रभा गणोरकर : 


( ८ जानेवारी १९४५). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका. व्यतीत , विवर्त , व्यामोह  हे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर  हा समीक्षाग्रंथ तर बोरकरांची निवडक कविता  , गंगाधर गाडगीळ व्यक्ती आणि सृष्टी  , किनारे मनाचे, शांता शेळके यांची निवडक कविता ,आशा बगे यांच्या निवडक कथा  ही त्यांची संपादने आहेत. वाङमयीन संज्ञा संकल्पना कोश ,  संक्षिप्त मराठी वाड्ःमय कोश  भाग. १ आणि भाग २  ही त्यांची सहसंपादने आहेत. 

एकेकीची  कथा , श्रावण बालकथा   याचे लेखन त्यांनी केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवशक्ती, मी मराठी, सत्यकथा, प्रतिष्ठान, आलोचन, युगवाणी, इत्यादी नियतकालिकातून विपुल प्रमाणात पुस्तक परीक्षणे केली. विविध चर्चासत्रांतून निबंध वाचन केले. जगण्याच्या रुढ वर्तुळाबाहेर जाऊन जीवनानुभव घेणारी त्यांची कविता मानवी संबंधांचा शोध घेते. अस्तित्वशोध हे प्रभा गणोरकर यांच्या कवितेचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून वाटयाला आलेला सनातन संघर्ष व एकटेपण हे व्यतीत  या कवितासंग्रहातील कवितांचे लक्षणीय आशयसूत्र आहे. नवकाव्य परंपरेतल्या अस्तित्ववादाचे परिमाण प्रभा गणोरकर यांच्या कवितेत दिसून येते.

प्रभा गणोरकर यांना बहिणाई पुरस्कार (१९९९), शांता शेळके पुरस्कार (२०१२),महाराष्ट्र शासनाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार (२०१६) आदी पुरस्कार मिळाले आहेत.अमरावती येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे (२०००)अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.