पुस्तकाचे नाव - गोल्डा.. एक अशांत वादळ
लेखिका - वीणा गवाणकर
सुरुकुतलेल्या चेहऱ्याची, काहीसा बाक आलेली, आजी शोभावी अशा म्हातारीच्या चेहऱ्यावरील मवाळ प्रेमळ भावास तडा देणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे तोंडातली सिगरेट आणि राजकारणातला बेधडकपणा. गोल्डा मायर म्हणजे जागतिक राजकारणाच्या पुरुषकेंद्री पटावरील पोलादी महिला.
मुळची यक्रेनी यहूदी. सामाजिक छळवादाला कंटाळून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या कुटुंबाची परिस्थिती उत्तम नसली तरीही उपासमारही नव्हती. अर्धवेळ नौकरी करून शिक्षण पूर्ण करतांना गोल्डाला यहूदी चळवळ आकृष्ट करू लागली. फक्त अकराव्या वर्षी शाळेतील मुलांसाठी पुस्तके मिळवुन देण्यासाठी समीती बनवनाऱ्या गोल्डाकडे असलेल्या अंगभूत नेतृत्व गुणांमुळे ती सार्वजनिक जीवनात यशाची एक एक पायरी चढत पुढे जात राहिली.
स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आल्यावर स्वतंत्र इस्रायलच्या पहिल्या जाहीरनाम्यावर सही करणारी गोल्डा मोजक्या व्यक्तींपैकी एक होती. पुढे ती पंतप्रधान पदावर पोहोचली. अत्यंत कठीण परिस्थितीत गोल्डाला नेतृत्व करावे लागले. सीमेभोवती असलेले सगळे अरब देश विरोधात असताना व त्यांना सोवियत युनियनची शस्त्रांची मदत असतानाही देशाची आर्थिक घडी विस्कळीत न करता त्यांच्यासमोर उभे राहणे या कसोटीस गोल्डा पुरेपूर उतरली.
खरे तर तिची शारीरिक अवस्था खराब होती. इतर काही आजारांसह कॅन्सरही तिला छळत होता. पण आपली दुखणी तिने कधीच सार्वजनिक होऊ दिली नाही. मंत्री पदावर असतांना घरी आलेल्या सहकाऱ्यांना व अभ्यागतांना ती स्वतः काॅफी बनवून देत असे. ती पंतप्रधान असतांनातर किचन कॅबिनेट खूप गाजलं होतं. रात्री मंत्री मंडळ घरी स्वयंपाक करणाऱ्या गोल्डाला मदत करीत चर्चा करायची. सगळी साधकबाधक चर्चा झाल्यावर जेवणाच्या शेवटी निर्णय व्हायचा जो दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर व्हायचा. खूप सार्या धोरणात्मक निर्णयांवरची साधकबाधक चर्चा गोल्डाच्या घरातील किचनमध्येच झाली होती.
मंत्रिमंडळातील गोल्डाचे एक सहकारी जे पुढे पंतप्रधान झाले ते गोल्डाची तीन रूपे सांगायचे, एक गोल्डा..शांत समाधानी असे तेव्हा तिचं वर्तन एखाद्या राणीला शोभेसे असे, दुसरी गोल्ड..जेव्हा ती नाखुश चिडलेली असे तेव्हा एखाद्या हडळी प्रमाणे वागे, आणि तिसरी गोल्डा.. ती जेव्हा संतापलेली असे तेव्हा चेटकिनच व्हायची तिची, बराच काळ डुख धरून ती बदल घ्यायची.
अशी ही गोल्डा मायर, एका सामान्य कुटुंबातली मुलगी ते इस्रायल या सतत युध्दग्रस्त देशाची पंतप्रधान.. जगातील सगळ्या ज्यूंचा विचार करणारी. पंतप्रधान असतांनाही अपरात्री घराबाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना स्वतः काॅफी बनवून देणारी.. पोलादी महिला..!