पुस्तकाचे नाव - मृत्यूशी शर्यत
लेखक - बाॅ रिफेनबर्ग
अनुवाद - प्रसाददत्त गाडगीळ
पैकी पहिल्या मोहिमेत मॉसन इतिहासातील सर्वांत मोठ्या आणि कठीण स्लेजिंग प्रवासाचा नेता होता. या मोहिमेत त्याचं दल दक्षिण चुंबकीय ध्रुवाच्या परिसरात पोचणारं पहिलं दल ठरलं.
दुसऱ्या मोहिमेत – जिची निर्मिती, विकास तसेच नेतृत्व मॉसनने केले – अन्य कुठल्याही मोहिमेच्या तुलनेत अन्टार्क्टिकच्या सर्वाधिक भूभागात संशोधनकार्य झाले आणि तेही कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्या मोहिमेत ३ तळ, किनाऱ्यावरच्या दलाचे ३२ सदस्य, ७ मोठे स्लेजिंग प्रवास आणि मोठा सागरी संशोधन कार्यक्रम यांचा अंतर्भाव होता.
तरीही जी मोहीम केवळ साहसविरहित वैज्ञानिक कार्यक्रम म्हणून अपेक्षित होती, ती मृत्यू, निर्धार आणि धाडसाची कहाणी ठरली. या मोहिमेला सर एडमंड हिलरी यांनी ‘संशोधन प्रवासाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ बचावकथा’ असं संबोधलं. मॉसनची शेवटची मोहीम त्याच्या आधीच्या मोहिमांच्या मालिकेचा वैज्ञानिक वारसा न ठरता अन्टार्क्टिकवरच्या ऑस्ट्रेलियन दाव्याचा पाया ठरली – आज ऑस्ट्रेलियन अन्टार्क्टिक टेरीटरी म्हणून ओळखली जाते साडेसत्तावीस लाख चौरस मैलांहून अधिक भूमी.
हे पुस्तक म्हणजे मॉसनचे असीम साहस आणि देदिप्यमान कारकिर्दीची कहाणी आहे. मॉसन सुदूर दक्षिणेत नसायचा तेव्हाही तो तिथल्या त्याच्या पुढल्या प्रवासाचे नियोजन करीत असायचा. एवढ्या मोठ्या योजनेसाठी पैसा उभा करायचा, आपल्या वैज्ञानिक संशोधनावर काम करायचा किंवा अन्टार्क्टिकबाबतच्या सरकारी, वैज्ञानिक अथवा धोरणात्मक निर्णयांच्या प्रक्रियेत गुंतलेला असायचा. कालांतराने, अन्टार्क्टिक संदर्भातला जागतिक स्तरावरचा सर्वश्रेष्ठ अधिकारी व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
आज शास्त्रज्ञ, साहसवीर आणि पर्यटकही अन्टार्क्टिक खंडातून आपल्या मर्जीनुसार प्रवास करतात. डेव्हिड अटेनबरो, सर रानुल्फ फिनेस आणि अन्य व्यक्तींनी आपापल्या परीने पश्चिमी जगताला पृथ्वीच्या त्या भागाची ओळख करून दिली; परंतु जेव्हा जगाला त्या भागाची ओळख नव्हती आणि जो कल्पनातीत दुर्गम होता, त्या काळाची जाणीव या पुस्तकाद्वारे आपल्याला होते. इतिहासातील अन्य कोणाही व्यक्तीप्रमाणेच व्यक्तीप्रमाणेच डग्लस मॉसन याने ही कठोर भूमी वैज्ञानिक, भूगोलतज्ज्ञ, सरकार आणि जनता यांच्यासाठी खुली केली.